Skip to main content
x

भोसले, शिवाजी अनंत

     हाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, लेखक, तत्त्वचिंतक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून सर्वांना शिवाजी अनंत भोसले ज्ञात आहेत. त्यांचा जन्म कराड जवळच्या कलेढोण या गावी झाला.  त्यांचे वडील अनंतराव भोसले हे थर्ड इअर ट्रेंड प्राथमिक शिक्षक होते. आई अनसूयाबाई कमी शिकलेल्या असल्या, तरी तत्त्वनिष्ठ होत्या.  शिवाजीरावांनी एक दोन वर्षे कलेढोण येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या शालेय शिक्षणाचा पूर्वार्ध विटा या गावी, तर उत्तरार्ध साताऱ्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शाहू बोर्डिंगमध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेचा लाभ घेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. साताऱ्यात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. मुलाने इंजिनिअर अथवा डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. पण शिवाजीरावांचा ओढा कला शाखेकडे होता. त्यामुळे विज्ञान शाखेला प्रवेश घेतला असला तरी मानसशास्त्र, तर्कशास्त्र शिकविणाऱ्या  ना. सी. फडके यांच्या तासाला ते बसू लागले. प्रा. ना. सी. फडके यांच्या सांगण्यावरून ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले अणि त्यांनी पुण्याच्या  वाडिया महाविद्यालयात प्रवेश घेतला. वाडियाचे विद्यार्थी असले तरी ते सर परशुरामभाऊ आणि फर्गसन महाविद्यालयात होणाऱ्या तासांना आवर्जून उपस्थित रहात. प्रा. न. ग. दामले, प्रा. प्र. रा. दामले, प्रा. सोनोपंत दांडेकर, श्री. म माटे, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे अशा नामवंत प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक स्मारक मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर ही वक्तृत्वस्थाने जवळ होती. ना. सी. फडके, श्री. म. माटे, जे. कृष्णमूर्ती, महात्मा गांधी, स्वा. सावरकर या नामवंत व्याख्यात्यांबरोबर वसंत व्याख्यानमालेत होणारी अनेक व्याख्याने ते ऐकत होते. तेव्हापासून शिवाजीरावांच्या भाषेला, बोलण्याला एक लय होती तिला पुढे वक्तृत्वाचे  कोंदण प्राप्त झाले.

      शिवाजीरावांचे वडीलबंधू बाबासाहेब भोसले बॅरिस्टर होते. त्यांच्यासमवेत वकिली करावी म्हणून त्यांनी पुण्याच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. अचूक शब्दांची निवड, वेधक भाषा, तर्कशुद्ध मांडणी या गोष्टी वक्तृत्व साधनेने दिलेल्या होत्याच. पण कामात मन रमत नव्हते. तत्त्वज्ञानाने भारलेल्या शिवाजीरावांना कायदा रूचत नव्हता. वकिलांच्या बैठकीत ते तासन्तास तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचू लागले. अखेरीस त्यांनी एम.ए. (तत्त्वज्ञान) ची परीक्षा दिली. आपण प्राध्यापक व्हावे असे त्यांना वाटू लागले.

      १९५७ मध्ये महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण महाविद्यालय फलटण येथे सुरू झाले. मालोजीराजे निंबाळकर त्याचे संस्थापक होते. कर्मवीर भाऊराव पाटील एम.ए. एलएल. बी. झालेल्या शिवाजीरावांना घेऊन मालोजीराजांकडे गेले आणि म्हणाले, ‘श्रीमंत, माझ्या ज्ञानरूपी वटवृक्षाची एक फांदी मी बरोबर आणली असून ती तुम्हाला देत आहे. तुम्ही ही ठेवून घ्या. या फांदीपासून एक वृक्ष तुमच्याकडेही निर्माण होईल.’ कर्मवीरांचे शब्द खरे ठरले आणि प्राध्यापक म्हणून शिवाजीराव रुजू झाले.

      विषयज्ञानाची समृद्धता, सखोलता, वक्तृत्वाची  अमोघता, अस्खलितवाणी  यामुळे तर्कशास्त्राचा तास सुद्धा अवीट गोडी घेऊन यायचा. वर्गातला तास म्हणजे एक सभाच होती. विद्यार्थी मनोभावे त्या सभेचा आस्वाद घेत होते.

       १९६३ मध्ये प्राचार्य ओक निवृत्त झाल्यानंतर प्राचार्यपदाची धुरा भोसले यांच्याकडे आली. एक रुपया शुल्क भरण्याची ऐपत नसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्राचार्यांनी त्यांचे वक्तृत्व फुलविले. शिकलेले विद्यार्थी त्यांना समारंभाच्या निमित्ताने व्याख्यानासाठी आमंत्रित करीत होते आणि खेडोपाडी त्यांची व्याख्याने होत होती. दळणवळणाची साधने नव्हती. त्यामुळे एकेका व्याख्यानासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागत होते. विवेकानंद जन्मशताब्दी, शिवछत्रपती राज्यारोहण सोहळ्याची त्रिशताब्दी, योगी अरविंदांची जन्मशताब्दी अशी निमित्ते त्यांना मिळून गेली. विवेकानंद शिलास्मारक निर्मितीच्या वेळी त्यांच्या व्याख्यानामुळे काही लाख रुपयांचा निधी जमा झाला. हातामध्ये कोणत्याही स्वरूपाचे टिपण आणि टाचण न घेता, एका लयीत जराही न अडखळता बोलणारा एक चिंतनशील वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक महाराष्ट्रभर पसरू लागला. कॅलिफोर्नियापर्यंतही त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रण आले. जसे बोलणे तसेच लिहिणे त्यामुळे त्यांच्या ग्रंथांना विलक्षण लोकप्रियता लाभली. मुक्तिगाथा महामानवाची, दीपस्तंभ, यक्षप्रश्‍न, देशोदेशीचे दार्शनिक, जागर (खंड १), जागर (खंड २), हितगोष्टी, कथा वक्तृत्वाची  असे अनेक ग्रंथ त्यांच्या चिंतनातून साकारले. नामांतराच्या प्रश्‍नावरून मराठवाडा विद्यापीठ धुमसत होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. आपला कार्यकालही पुरा केला. साताराभूषण, फलटणभूषण, विद्याध्यास, रोटरी जीवनगौरव, शिवभूषण असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई यांनी त्यांना मानपत्र प्रदान केले. पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत सलग अठ्ठावीस वर्षे व्याख्याने देऊन प्राचार्यांनी विक्रम प्रस्थापित केला. वक्तृत्त्वाच्या माध्यमातून समाजमनाची मशागत करणारे ‘लोकशिक्षक’ असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल.

      - प्रा. मिलिंद जोशी

भोसले, शिवाजी अनंत