Skip to main content
x

भोसले, शिवाजी जगन्नाथ

पुणे येथील शिवाजीनगर, पुणे परिसरातील सर्वसामान्य लोकांची अडचण विचारात घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपात कर्जपुरवठा करण्याची गरज विचारात घेऊन शिवाजी भोसले यांनी 2 मार्च 1972 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते शिवाजीनगर सहकारी बँकेचे उद्घाटन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कामास सुरुवात केली व आपल्या सहकारातील कामाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी या बँकेत 1972 ते 1997 या प्रदीर्घ कालावधीमध्ये काम करीत असताना बँकेच्या प्रगतीचा ध्यास घेऊन जिल्ह्यात एकूण 14 शाखा सुरू केल्या. बँक ग्राहकांना दर्जेदार सेवा व त्वरित काम होण्यासाठी संपूर्ण शाखांचे संगणकीकरण करून ए.बी.बी. (एनीवेअर बँकिंग) सुरू करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी चांगले पदाधिकारी तसेच कष्टाळू व प्रशिक्षित अनुभवी सेवकांच्या सहकार्याने ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली. त्यांनी शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीवासियांना बँकेचे सभासद करून घेऊन व त्यांची आर्थिक क्षमता विचारात घेऊन पात्र लोकांनी निर्माण केलेल्या सहकारी संस्थेस बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला व त्यांना कायमस्वरूपी घर मिळवून दिले. हे त्यांचे सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे काम गणले जाते. तसेच 1983 मध्ये त्यांनी शेतकी महाविद्यालय मतदार संघात सर्वसामान्य व्यक्तींसाठी 3 सहकारी गृहरचना संस्थांची नोंदणी करून प्रभागातील लोकांना घर मिळवून देण्यात मोलाचे काम केले. तसेच त्यांनी पुणे जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या पुणे जिल्हा मध्य. सह. बँक येथे 1977 ते 1979 तसेच 1986 ते 1996 या कालावधीमध्ये संचालक म्हणून तर 1987 ते 1988 मध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था यांचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांच्या बँकिंग व सहकारातील अडचणी जाणून घेऊन व त्यांचे निराकरण करून पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेमार्फत त्यांना योग्य ती मदत केली.

भोसले यांनी महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील अ‍ॅपेक्स बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर 1976 ते 1978 या काळात संचालक म्हणून काम केले. त्यांनी 1984 मध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना मर्या., थेऊर येथे संचालक म्हणून काम करीत असताना कारखाना परिसरातील शेतकर्‍यांना चांगला ऊस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

पुणे जिल्ह्यातील नागरी बँका तसेच नागरी सहकारी पतसंस्थांचा प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेवर संचालक म्हणून काम करीत असताना नागरी बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार पातळीवर कोणतेही व्यासपीठ नसल्याचे भोसले यांच्या निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी समिती निर्माण करण्याची गरज विचारात घेऊन त्यांनी 1987 मध्ये पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था समितीची नोंदणी केली. नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये वाढत असलेले थकबाकीचे प्रमाण विचारात घेऊन थकबाकी वसुलीसाठी पतसंस्थांना सहकारी कायदा कलम 1991 मध्ये दावा दाखल करून व त्याचा निर्णय प्राप्त करून थकबाकी वसुली करावी लागेल. यासाठी बराच कालावधी जात होता. ही बाब विचारात घेऊन नागरी बँका विविध कार्यकारी सोसायट्या, पगारदार सहकारी संस्था, मजूर सह. संस्था इ. सहकारी संस्थांना लागू असलेला महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार वसुली दाखले मिळण्याची सुविधा नागरी पतसंस्थांनाही उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी आमदार असताना 1989 च्या डिसेंबर महिन्यातील अधिवेशनात सरकारी पातळीवर प्रयत्न करून हा कायदा नागरी सह. पतसंस्थांसाठीही लागू करून घेतला व त्याचा फायदा महाराष्ट्रातील संपूर्ण नागरी व ग्रामीण पतसंस्थांना झाला, हे त्यांच्या कार्याचे मोठे फलित होय. या समितीमार्फत नागरी सह. पतसंस्थातील अधिकारी व पदाधिकार्‍यांना प्रशिक्षण देणे, पतसंस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रतिवर्षी जिल्ह्यातील नागरी पतसंस्थांना भेटी देणे, सहकार विभागातील अधिकारी व जिल्हा बँकेतील अधिकारी यांना एकत्र करून पतसंस्थांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणे व त्यामार्फत त्यांच्या अडचणी सोडविण्याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. सध्या महाराष्ट्रात या पतसंस्थेचे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असून त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार अनिल शिवाजीराव भोसले हे या समितीची धुरा वाहत आहेत.

भोसले 1964 पासून शिवाजीनगर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष म्हणून राजकीय क्षेत्रात काम करीत होते. भोसले यांनी 1968 ते 1992 पर्यंत पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले तर पुणे महानगरपालिकेचे महापौरपदी 1976 ते 1977 या कालावधीत काम केले. तसेच ते दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी छत्रपती मेडिकल ट्रस्ट, उरळीकांचन, सर्वोदय प्रतिष्ठान, पुणे या संस्थांवर संस्थापक व अध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले. त्याचप्रमाणे संचालक मार्केट कमिटी-पुणे, सदस्य; पुणे नगर वाचन मंदिर, पुणे-सदस्य; आळंदी वारकरी संप्रदाय-पुणे, सदस्य; अध्यात्म प्रबोधन संस्था-पुणे या संस्थांवरही त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

महाराष्ट्र राज्यात सहकारी क्षेत्रात शिवाजीराव  भोसले यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे.

- काशीनाथ दंडवते

भोसले, शिवाजी जगन्नाथ