भराड, गोविंद मारोत
गोविंद मारोत भराड यांचा जन्म बीड जिल्ह्यातील जालना या गावी एका शेतकरी कुुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळ गावी झाले. ते १९५८मध्ये माध्यमिक शालान्त परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी अकोला येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९६२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. त्या परीक्षेत ७व्या क्रमांकाने ते गुणवत्ता यादीत आले होते. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात १९६४मध्ये एम. एस्सी.(कृषी) पदवी प्रथम श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाने मिळवली. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्तीसुद्धा मिळवली.
पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी दोन वर्षे कृषी-अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्यरत राहिले. साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक अशी त्यांची वाटचाल चालू होती. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन प्रकल्प राबवण्यास उद्युक्त केले. त्यांनी संशोधन संचालक म्हणून एक वर्ष काम पाहिले. त्यानंतर त्यांना डॉ.पं.दे.कृ.वि.चे कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९९६-९९ या कालावधीत देशातील निरनिराळ्या महत्त्वाच्या संशोधन संस्थांसमवेत करार करून विद्यापीठात संयुक्तरीत्या संशोधन प्रकल्प राबवले. त्यात भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई व राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था, नागपूर (नेरी) यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे.
डॉ. भराड यांनी पाणलोट क्षेत्रविकासासंबंधात केलेल्या कामामुळे त्यांची खरी ओळख प्रस्थापित झाली. जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्याने महाराष्ट्र शासनाने पर्जन्याश्रयी शेतीसंबंधी एक प्रकल्प वाशिम जिल्ह्यात मानोळी येथे राबवला होता. त्यात डॉ.पं.दे.कृ.वि.ने तांत्रिक मार्गदर्शन करायचे होते. तेव्हा या संपूर्ण प्रकल्पाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी डॉ. भराड यांच्यावर होती. तसेच त्यासंबंधी तांत्रिक माहिती निर्माण करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठावर होती. सूक्ष्म पाणलोट क्षेत्र (मायक्रो वॉटरशेड) कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर निर्माण करून त्यातून तांत्रिक माहिती निर्माण करून, त्याचा प्रत्यक्ष वापर शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात आला.
विदर्भातील काळ्या खोल जमिनीत पारंपरिक मातीच्या ढाळीचा बांध निर्माण करून मृदा व जल संधारण करून त्यांची निगा राखणे जिकिरीचे व खर्चिक काम आहे. त्याऐवजी दक्षिणपूर्व आशियात खस गवताचे जैविक बांध तयार करून मृदा व जल संधारण होऊ शकते ही संकल्पना राबवण्यात डॉ. भराड यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली.
सुरुवातीच्या काळात ही जैविक बांध योजना यशस्वी झाली. त्या संबंधीची माहिती मलेशिया, घाना व थायलंड या देशांमध्ये अहवालाच्या स्वरूपात सादर करण्याची संधीही त्यांना उपलब्ध झाली. त्यांनी या संबंधात केलेल्या कामाची दखल घेऊन जागतिक बँकेने १९९१ व १९९३मध्ये त्यांना रोख पारितोषिक दिले होते, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. त्यांनी १९९४मध्ये पाणलोट क्षेत्रासंबंधी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे सुवर्णपदक आणि १९९७मध्ये इंडियन सोसायटी ऑफ सॉईल कन्झर्वेशनतर्फे सुवर्णपदक देण्यात आले. त्यांचा १९९८मध्ये गवताचे संशोधन व विकास केल्याबद्दलही सन्मान करण्यात आला.
डॉ. बथकल यांनी पाणलोट क्षेत्रावर सुरू केलेले संशोधनात्मक काम पुढे सुरू ठेवून अकोला मॉडेल पूर्णत्वास नेण्यात डॉ. भराड यांचा सहयोग आहे. त्यांनी १९९९मध्ये विद्यापीठातून निवृत्ती घेतल्यानंतर शेतकर्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या संस्था स्थापून शेती सुधारणेचे कार्य सुरू ठेवले. ते विदर्भ विकास मंडळाचेही सदस्य आहेत.