भट, भा. वा.
रत्नागिरी जिल्ह्यातील सिरगाव तालुक्यात ‘म्हाळुंगे’ हे भट घराण्याचे मूळ गाव. महाळुंगे किंवा पावस अशीही त्याची दुसरी नावे होत. याच त्र्यंबकशास्त्री यांच्या कुटुंबात वि. का. राजवाडे मंदिराचे संस्थापक अॅड. भा. वा. भट यांचा जन्म झाला. त्र्यंबकशास्त्री हे भा. वा. भटांचे खापरपणजे होत. धुळे जिल्ह्यातील सर्व जण अॅड. भा.वा. भटांना ‘तात्यासाहेब’ म्हणत. तात्यांचे प्राथमिक शिक्षण वाईला झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आपले वडील बंधू महादेव यांच्याकडे गेले.
कायद्याच्या परीक्षेत ‘हिंदू लॉ’ या विषयात त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. व्यवसायासाठी त्यांनी धुळ्याची निवड केली. गरताडच्या साठे घराण्यातील सत्यभामाबाईंशी त्यांनी लग्न केले.
१८९९मध्ये ते जेव्हा धुळ्यात आले, तेव्हा मोठ्या भावाने दिलेले रु. ६०, थोडे कपडे व काही भांडी-कुंडी एवढेच त्यांच्याकडे होते. एकार्थाने शून्यातून जग उभारण्याची किमया त्यांनी करून दाखविली.
धुळ्याच्या सार्वजनिक क्षेत्रातले एक मोठे नाव होते, शंकर श्रीकृष्ण देव. श्री. देवांशी परिचय झाल्यावर तात्यासाहेबांनी संशोधन कार्यात कधी उडी घेतली, ते त्यांनाही कळले नाही. समर्थवाङ्मय, समर्थ संप्रदाय व मध्यकालीन साहित्य यांविषयी त्यांची आवड हळूहळू वाढत गेली.
दोन-चार वर्षांतच तात्यांचा जम वकिलीत बसला. त्यांचा स्वभाव मितभाषी होता. अनेक सार्वजनिक संस्थांचे ते पदाधिकारी होते व अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता.
समर्थ रामदासांच्या दासबोधाची एक उत्तम प्रत वि.का. राजवाडे यांच्याकडे आहे म्हणून शं.श्री. देव व तात्यासाहेब भट हे मे १९०३मध्ये सातार्याला श्री. वि. का. राजवाडे यांना भेटले. ही त्यांची पहिली भेट. १९०४मध्ये राजवाडे प्रथमत: धुळ्यात आले. त्यानंतर १९१२-१९१३ सालापासून त्यांचा मुक्काम तात्यासाहेबांकडेच होऊ लागला.
खरे तर इतिहास व इतिहासलेखन हे तात्यासाहेबांचे क्षेत्र नव्हते. पण देव, चांदोरकर व नंतर राजवाडे यांच्या संगतीत राहिल्याने त्यांनाही या विषयाची गोडी लागली व पुढे त्यांनी या क्षेत्रात खूप मोठे कार्य केले.
१९०४ पासून राजवाडे दरवर्षी धुळ्याला येत व येथून पुढे पुणे, तळेगाव किंवा अन्यत: संशोधनाला जात. तटस्थता व नि:पक्षपातीपणा हे तात्यासाहेबांचे दोन मोठे गुण होते. विद्वता, प्रतिभा व परिश्रम त्यांनी स्वत:हून कमावले होते. वि. का. राजवाडे संशोधन मंदिरात राजवाड्यांनी हयातभर खर्च करून केलेल्या सर्व संग्रहाची रचना करणे, तत्कालीन इकॉनॉमिक लायब्ररीचे ग्रंथ मिळवून राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय उभारणे, त्यासाठी बडोद्यातून, काश्मीरमधून ग्रंथ मिळविण्याचे कार्य तात्यासाहेबांनी केले. राजवाडे यांच्या सर्व संग्रहाची नीट व्यवस्था लावणे, हे साधे काम नव्हते. पण तात्यासाहेबांनी ते नेटाने केले.
द्रव्याअभावी सार्वजनिक संस्थांचा कारभार बहुतांशी रडतखडतच चालतो. संशोधन संस्थांची अवस्था तर अधिकच दारुण असते. तात्यासाहेब यांनी राजवाडे मंडळात पीपल्स को.ऑप. बँकेची स्थापना केली. या बँकेचे सर्व भागधारक आपल्याला मिळणार्या डिव्हिडंडचा काही भाग मंडळाच्या संशोधन कार्याला नियमितपणे देतात. पहिल्या वर्षी १७-१८ रु. देऊ शकणारी बँक आता दरवर्षी जवळपास दोन-तीन लाख रुपये या कामासाठी देते. देशात संशोधन कार्यासाठी नियमितपणे एवढा पैसा देणारी दुसरी बँक नव्हती.
संशोधनपर लेखन प्रकाशित होत राहावे, या उद्देशाने तात्यासाहेबांनी ‘संशोधन’ हे मासिक सुरू केले. राजवाडे मंडळात शोधकार्य निरंतर चालावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. ‘संशोधक’ मासिकात त्यांचे जवळपास ३० लेख प्रकाशित झाले. याव्यतिरिक्त त्यांचे ७ ग्रंथ आहेत. त्यांनी राजवाडे यांच्यासोबतच्या २४ वर्षांच्या विद्वतसहवासाची कथा आपल्या इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे चरित्र व राजवाड्यांचा दोन तपांचा विद्वत सहवास’ या आपल्या ६२५ पानी विशाल ग्रंथात शब्दबद्ध करून ठेवली. चरित्रलेखनाच्या दृष्टीने तो स्वैर व पसरट वाटतो, पण वि. का. राजवाडे यांच्यासंबंधीची जास्त प्रामाणिक माहिती देणारा ग्रंथ या दृष्टीने त्याचे मोल अपूर्व आहे. डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात त्याप्रमाणे, ‘मानव्य विद्यांपैकी अशी एकही विद्या नसावी की जिला राजवाड्यांचा प्रज्ञास्पर्श झालेला नाही.’