Skip to main content
x

भट, राममोहन सुब्राय

राम मोहन

         भारतात अ‍ॅनिमेशन चित्रणाचे तंत्र रुजवणारे प्रतिभावंत निर्माते आणि दिग्दर्शक राम मोहन यांचा १९३१ मध्ये तिरूवला येथे जन्म झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल सुब्राय भट होते. मद्रास विद्यापीठातून त्यांनी विज्ञान विषयात पदवी मिळवली आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याऐवजी भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील कार्टून फिल्म्स युनिटमध्ये ते १९५६ साली रुजू झाले. राम मोहन यांना लहानपणापासून व्यंगचित्रे अथवा कार्टून्स काढायचा छंद होता. याच वेळेस यु.एस. टेक्निकल एड प्रोग्रॅम अंतर्गत, वॉल्ट डिस्ने स्टुडीओजचे क्लेअर एच. विक्स भारतात प्रशिक्षण देण्यासाठी आले होते व अ‍ॅनिमेशन स्टुडीओ सुरू होणार होता. त्यामुळे राम मोहन विक्स यांना जाऊन भेटले. त्यांची व्यंगचित्रे पाहून विक्स यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्यास सांगितले, आणि राममोहन यांच्या फिल्म्स डिव्हिजनमधील कारकिर्दीस सुरुवात झाली.

         त्या काळात मुंबईत एकही अ‍ॅनिमेशन स्टूडिओ नव्हता. मद्रासमधील जेमिनी स्टूडिओ आणि पुण्याला प्रभात स्टुडीओ येथे अ‍ॅनिमेशनचे काही प्रयोग झाले होते. दादासाहेब फाळके यांनीही ‘आगकाड्यांची मौज’ हा अ‍ॅनिमेशनपट तयार केला होता. चित्रपटांच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीसाठी फाळके यांनी अ‍ॅनिमेशनचा यापूर्वी उपयोग केला होता. ‘जम्बू काका’सारखी मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यासाठी अ‍ॅनिेमेशन लघुपटाची निर्मितीही ‘प्रभात’ने केली होती. पण हे प्रयोग मोजक्या व्यक्तींनी प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभवांमधून तंत्रज्ञान मिळवत केलेले होते.

         फिल्म्स डिव्हिजनमध्ये प्रथमच अ‍ॅनिमेशनचे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आणि भारतात अ‍ॅनिमेशनचा खऱ्या अर्थाने पाया रोवला गेला. अद्ययावत यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाबरोबरच चांगले चित्र-संकल्पनकार तयार झाले. विक्स यांनी शिकवले ते द्विमिती (टूडी) अ‍ॅनिमेशनचे तंत्र. याला ‘क्लासिकल अ‍ॅनिमेशन’ असे म्हणतात.

         राम मोहन यांना एक प्रभावी माध्यम म्हणून अ‍ॅनिमेशनचे आकर्षण होते. स्टोरी बोर्ड, व्यक्तिरेखांकन (कॅरॅक्टर डेव्हलपमेंट) अशा अ‍ॅनिमेशनच्या विविध घटकांचा त्यांनी अभ्यास केला. नुसती चित्रे रंगवण्यात त्यांना रस नव्हता. तंत्रातली विविधता आणि सर्जकता यांचे राम मोहन यांना अधिक आकर्षण होते. कटआउट्स, बाहुल्या (पपेट्स), आणि प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून अ‍ॅनिेमेशन तंत्रात विविधता आणण्याची प्रेरणा राममोहन यांना प्रमोद पती, नॉर्मन मॅकक्लॅरेन यांच्याकडून मिळाली.

         फिल्म्स डिव्हिजनने १९६० च्या दशकात केलेल्या अ‍ॅनिमेशनपटांच्या निर्मितीत राम मोहन यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली तेव्हा अल्पबचत, कृषी, मत्स्योत्पादन, कुटुंंबनियोजन अशा अनेक योजनांची माहिती खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम या काळातल्या अ‍ॅनिमेशनपटांनी केले. भाषा व संस्कृतीची विविधता असलेल्या आपल्या देशात प्रेक्षकांशी भावनिक नाते जोडायचे तर सर्वसमावेशक अशा प्रातिनिधिक पात्रांची (आयकॉन्सची) गरज होती. राम मोहन यांच्या सरपंच, खेडूत किंवा भोला शेतकरी यांसारख्या पात्रांनी अशी सरकारी धोरणांना जिवंत ओळख दिली. त्यांच्या ‘होमो सॅप्स,’ ‘बाप रे बाप’, ‘यू सेड इट’, ‘कल्पतरू’, ‘फायर गेम्स’ या लघुपटांना उत्कृष्ट अ‍ॅनिेमेशनपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तर १९६८ साली लाइपझिग लघुपट महोत्सवात ‘केऑस’ या लघुपटाला पुरस्कार मिळाला.

         मॉन्ट्रिअल, कॅनडा येथे १९६७-६८ मध्ये ‘वर्ल्ड एक्स्पो ऑफ अ‍ॅनिमेशन सिनेमा’ प्रदर्शन झाले. तिथे नॉर्मन मॅक्क्लॅरेन यांच्याबरोबर राम मोहन यांनी काम केले आणि त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी स्वत:ची अ‍ॅनिमेशन संस्था चालू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९७२ मध्ये ‘राम मोहन बायॉग्रफिक्स’ ही संस्था स्थापन केली. ही संस्था १९९७ पर्यंत चालू होती. या काळात ‘पति पत्नी और वो’, ‘खूबसूरत’, सत्यजित रे यांचा ‘शतरंज के खिलाड़ी’ अशा चित्रपटांसाठी राम मोहन यांनी अ‍ॅनिमेशन केले. या काळात जाहिरातींसाठी अ‍ॅनिमेशन तंत्राचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला होता. राम मोहन यांनी जाहिरातीच्या क्षेत्रातही बरेच काम केले.

         जपानच्या सहयोगाने १९९२ मध्ये रामायणावरचा ‘द लीजन्ड ऑफ प्रिन्स राम’ हा पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्यात आला. कोईची सासाकी यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून राम मोहन यांनी काम केले. अ‍ॅनिमेशन म्हणजे कार्टून्स अशी समजूत मोडीत काढून या चित्रपटाने रामायणासारख्या कथेवर काव्यात्म आणि आल्हादक चित्रांकन असलेला अ‍ॅनिमेशनपट काढता येतो हे दाखवून दिले. याच वर्षी युनिसेफतर्फे दक्षिण आशियातील मुलींचे प्रश्न मांडणारी ‘मीना’ नावाची तेरा भागांची मालिका तयार करण्यात आली, त्याचे दिग्दर्शन राम मोहन यांनी केले होते.

         जागतिकीकरणामुळे १९९० पासून बाहेरच्या देशांमधून अ‍ॅनिमेशनची कामे मिळू लागली. राम मोहन यांनी अमेरिकेतून बरीच कामे मिळवली. त्यांनी अनेक चित्रकारांना अ‍ॅनिमेशनचे प्रशिक्षण दिले. इतर अ‍ॅनिमेशन स्टूडिओ, चीनचे या क्षेत्रात पदार्पण यांमुळे स्पर्धा वाढली. संगणकयुगामुळे अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणावर विकसित झाले. द्विमिती अ‍ॅनिमेशनची जागा त्रिमिती (थ्रीडी)अ‍ॅनिमेशनने घेतली. राम मोहन या काळात बदलत्या तंत्रज्ञानानुसार सतत कार्यरत राहिले.

         ते २००२ पासून ‘ग्रफिटी मल्टिमीडिया’चे अध्यक्ष आहेत. आज अ‍ॅनिमेशनचे रूपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे व त्याचे राम मोहन हे एक सहयोगी साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘कॅग’तर्फे ‘हॉल ऑफ  फेम’ (१९९६), अ‍ॅडव्हर्टायझिंग क्लबतर्फे ‘अ‍ॅबी’ अवॉर्ड, ‘व्ही. शांताराम लाईफटाईम अ‍ॅवॉर्ड फॉर डॉक्युमेंटरी अ‍ॅण्ड शॉर्ट फिल्म्स’ असे पुरस्कार मिळाले आहेत.

- दीपक घारे, रंजन जोशी

भट, राममोहन सुब्राय