Skip to main content
x

चापेकर, नारायण गोविंद

         नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर हे जुन्या पिढीतील नामवंत संशोधक, समाजशास्त्रज्ञ व साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल व विल्सन महाविद्यालय या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन बी..,एलएल.बी. झाल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. सन १९०० ते १९२५ अशी सुमारे २५ वर्षे सबजज्ज या नात्याने सरकारी न्यायखात्यात सेवा दिल्यानंतर १९३१मध्ये त्यांनी औंध संस्थानात सरन्यायाधीशपद स्वीकारले. न्याय देण्यास दिरंगाई न करणे, कायदा आणि आपली सदसद्विवेकबुद्धी यांव्यतिरिक्त अन्य कशाचीही ढवळाढवळ आपल्या न्यायदानात होऊ न देणे, वशिलेबाजीला पूर्ण आळा घालणे ही त्यांच्या कारकिर्दीची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे या कालखंडातील विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी औंध संस्थानच्या घटना समितीच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली.

नानासाहेबांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून सुमारे दहा वर्षे जबाबदारी सांभाळली. परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे बंद पडलेले प्रकाशन पुन्हा सुरू करून आठ वर्षे पत्रिकेच्या संपादनाचे कामही केले. पुणे येथे जागा मिळवून परिषदेची स्वत:ची वास्तू उभारली. त्यांच्या योगदानाविषयी म.. .वा. पोतदार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहासया ग्रंथात म्हटले आहे, ‘चापेकर यांनी कळकळीच्या मंडळींना वाव देऊन त्यांच्याकडून पुष्कळच काम उठवून दाखवले... जातीने परिषदेसाठी कष्टही सोसले... परिषदेचे स्वरूप अधिक पुष्ट झाले. दप्तराची व्यवस्था लागली; आणि लिपी-व्याकरणादी जटील प्रश्नांच्या सोडवणुकीचा कसून प्रयत्न झाला... .सा. परिषदेच्या संसारात असा सोन्याचा दिवस उगवला आणि तिचा कायापालट स्पष्ट प्रतीत होऊ लागला.

नानासाहेबांनी विपुल संशोधनात्मक लेखन केले. त्यांचे सुमारे वीस ग्रंथ व अनेक स्फुट लेख प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथ मराठीत असून लेख क्वचित इंग्रजीतही आहेत. त्यांच्या लेखनातील वैविध्य आश्चर्यकारक आहे. वेद, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, साहित्य, समीक्षा अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांच्या व्यासंगाचे स्पष्ट प्रतिबिंब या लेखनामध्ये दिसून येते.

बदलापूरहा नानासाहेबांचा ग्रंथ समाजशास्त्रातील संशोधनाचा आदर्श म्हणून आजतागायत मान्यता पावलेला आहे. अडीच हजार वस्ती असलेल्या, महाराष्ट्रातील या प्रातिनिधिक खेड्याची आर्थिक, ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक पाहणी करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. विशेष म्हणजे गावातील स्त्रियांकडून माहिती मिळवता यावी, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीसही आपल्या कामात सहभागी करून घेतले. बदलापूरग्रंथाची ख्याती परदेशातही पोहोचली व अमेरिकन विद्यापीठातही त्यावर संशोधन झाले.

पेशवाईच्या सावलीतया ग्रंथात उत्तर पेशवाईतील- म्हणजे सन १७४५ ते १८६२ या सव्वाशे वर्षांच्या दीर्घ कालावधीतील जमाखर्चाच्या नोंदींचा अभ्यास करून तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकलेला आहे. इतिहासाचे साधन म्हणून जमा-खर्चांच्या नोंदींचा उपयोग त्यांच्यापूर्वी कोणीच केलेला नव्हता. इतिहासाच्या अभ्यासाचे एक नवीन दालन नानासाहेबांनी अभ्यासकांना उघडून दिले, असेच म्हणावे लागेल. नानासाहेब सुधारणावादी होते. गच्चीवरील गप्पाया ग्रंथात त्यांनी धार्मिक विधींमधील जे भाग कालबाह्य किंवा अशास्त्रीय आहेत, ते निरर्थक व म्हणूनच त्याज्य असल्याचे प्रतिपादन केले आहे.

काश्मीरहिमालयातहे नुसते प्रवासवर्णनपर ग्रंथ नाहीत, तर प्रवासादरम्यान केलेल्या सूक्ष्म समाज निरीक्षणांचा अर्क या ग्रंथांमध्ये उतरलेला आहे. चित्पावनया ग्रंथात चित्पावन ब्राह्मण समाजाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक अंगांनी अभ्यास केलेला आहे. वैदिक निबंधहा ग्रंथ ऋग्वेद आणि अथर्ववेद यांतील विविध विषयांची सखोल चिकित्सा करणारा आहे. यांशिवाय चापेकर’, ‘जीवनकथा’, ‘साहित्य समीक्षण’, ‘समाज नियंत्रण’, ‘पैसा’, ‘तर्पण’, ‘रज:कण’, ‘निवडक लेख’ (भाग १ व २), ‘एडमंड बर्कचे चरित्रअसे त्यांचे अनेक ग्रंथ विद्वन्मान्य झाले आहेत.

नानासाहेबांचे सर्व साहित्य चिकित्सक, समीक्षणात्मक, संशोधनपर आहे. परिश्रम, बौद्धिक प्रयास, सूक्ष्म निरीक्षण आणि स्वतंत्र विचार ही नानासाहेबांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. आपली अभ्यासपूर्ण मते त्यांनी निर्भीडपणे व परखडपणे मांडली. त्यांची लेखनशैली वैचारिक विषयांना अनुरूप अशीच आहे. काटेकोर शब्दयोजना, बांधेसूद वाक्यरचना हे तिचे स्वाभाविक गुणधर्म आहेत. त्यांची भाषा इंग्रजीच्या प्रभावापासून अलिप्त आहे. संस्कृत भाषेशी घनिष्ठ संबंध असूनही त्यांची भाषा संस्कृतच्या बेडीत अडकून जड व कृत्रिम झालेली नाही. गंभीर विषय सोप्या भाषेत सहजतेने कसा मांडावा ते त्यांच्या लेखनातून समजते. नानासाहेबांच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी मराठामध्ये जो अग्रलेख लिहिला, त्यात नानासाहेबांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे नमूद केलेली आहेत - सर्व लेखन त्या त्या विषयाचा अत्यंत सूक्ष्म विचार करून आणि त्यात कोणत्याही तर्हेचे दोष वा चूक राहू नये या विषयी पराकाष्ठेची सावधगिरी बाळगून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने लिहिलेले आहे. त्यांच्या लेखनात फालतू मुद्दे आणि गैरलागू युक्तिवाद यांचा फापटपसारा मुळीच नसे. स्वत:च्या लेखनावर इतके कष्ट घेणारा त्यांच्याएवढा चोखंदळ लेखक आम्ही पाहिला नाही.

नानासाहेबांनी सन १९३४मध्ये बडोदे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट.पदवी देऊन सन्मानित केले होते. तसेच शंकराचार्य मठाच्या वतीने सूक्ष्मावलोकया बिरुदाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असत. परदेशी विद्वानांनीही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवला होता. महाराष्ट्रातील साहित्यिक व सांस्कृतिक वातावरणाच्या जोपासनेमध्ये नानासाहेबांचा फार मोलाचा वाटा होता. सन १९२४मध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेव्हापासून पुढे सलग पंचवीस वर्षे ते बदलापूर येथे मातोश्रींचे श्राद्ध आगळ्या पद्धतीने करीत असत. महाराष्ट्रातील अग्रगण्य साहित्यिक आणि विद्वान अभ्यासक-संशोधक यांची मांदियाळी श्राद्धाच्या निमित्ताने बदलापूर येथे भरत असे आणि विविध विषयांवर चर्चा, व्याख्याने यांच्याद्वारा वैचारिक देवाणघेवाण होत असे. अखेरपर्यंत सतत कार्यरत राहून नानासाहेबांनी वयाच्या ९९व्या वर्षी बदलापूर येथे जगाचा निरोप घेतला.

मंजूषा गोखले

चापेकर, नारायण गोविंद