चौधरी, अशोक नामदेव
केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘ऊती संवर्धन’ रोपनिर्मिती करणाऱ्या संशोधकांमध्ये ज्यांचे नाव अग्रस्थानी येते, ते म्हणजे डॉ. अशोक नामदेव चौधरी हेच आहे. त्यांनी केळीप्रमाणेच ऊस व फूलशेती यांमध्येदेखील मौलिक संशोधन केले आहे.
अशोक नामदेव चौधरी यांचा जन्म धुळे जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच शेतीविषयक संस्कार झाल्याने कृषी विषयाचे बाळकडूच त्यांना मिळाले. पुढे कृषी विषयात ज्ञान संपादन करून शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचे त्यांनी निश्चित केले. या ज्ञानलालसेपोटीच त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. या पदव्या मिळवल्या.
चौधरी १९७४ ते १९८१ या काळात कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९८१ ते १९८९ या काळात कृषी महाविद्यालय, पुणे येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले, तर १९८९ ते १९९४ या काळात गणेशखिंड फळबाग संशोधन केंद्र, पुणे येथे पैदासकार या पदावरही त्यांनी काम केले. त्याची १९९५ ते १९९६ या काळात भुईमूग कृषी संशोधन केंद्र, डिग्रज-सांगली येथे पैदासकार म्हणून नियुक्ती झाली.
शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण संशोधन करून उत्तम वाण व रोपे पुरवण्याच्या हेतूने ‘निर्मिती बायोटेक’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेमार्फत १२ वर्षांमध्ये एकूण ८० लाख रोपांची निर्मिती केली गेली. ही उत्पादित रोपे एकूण १.५ लाख शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात आली. या रोपांमध्ये प्रामुख्याने केळी, ऊस, सिंगोनियम, स्पॅथीफायलम यांचा समावेश आहे. या कालखंडामध्ये ३०० मुलींना तंत्रसाहाय्यक म्हणून रोजगार उपलब्ध करून दिला गेला. रोपनिर्मितीबरोबर ८ कोटी लीटर प्राणवायू निसर्गात परत करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्यही त्यांनी केलेले आहे.
त्यांच्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन ‘बळीराजा’ मासिकाने १९९९चा द्वितीय लेखन पुरस्कार, तसेच याच संस्थेतर्फे २००६चा प्रथम लेखन पुरस्कारही त्यांना देण्यात आला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक शेती मासिकांतून लिखाणाचे काम केले, तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शनही केले.