चौधरी, यशवंत टी.
यशवंत टी. चौधरी हे दृक्-संवादकलेच्या (कम्युनिकेशन आर्ट) माध्यमातून संकल्पना क्षेत्राचा (डिझाइन) सर्वंकष विचार भारतात रुजवणारे दूरदृष्टीचे प्रतिभावंत होते. बोधचिन्हांचे संकल्पन आणि कॉर्पोरेट डिझाइन क्षेत्रात पायाभूत काम करणारे उपयोजित चित्रकार यशवंत चौधरी यांनी कला शिक्षणाच्या क्षेत्रातही मूलभूत संकल्पना आणल्या. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधील पदविका १९५४ मध्ये प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले व शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेले. लंडन येथील एल.सी.सी. सेंट्रल स्कूल ऑफ आटर्स अँड क्राफ्ट्स येथे डिझाइन विषयातली पदव्युत्तर पदविका त्यांनी संपादन केली व बॅसल, स्वित्झर्लंड येथे ‘सिबा’ कंपनीत सीनियर डिझाइनर म्हणून त्यांनी काही काळ काम केले. भारतात परतल्यावरही ‘सिबा इंडिया’शी त्यांचा संबंध होता. दहा वर्षे अशा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहासाठी काम केल्यानंतर त्यांनी ‘कम्युनिका’ आणि ‘प्रकृती-सिनोव्हिजन’ अशी दोन युनिट्स स्वतंत्रपणे सुरू केली.
प्रिंट डिझाइन, पॅकेजिंग आणि कॉर्पोरेट डिझाइन, हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले. प्रत्यक्ष कामापेक्षा त्यामागची संकल्पना महत्त्वाची आणि त्यासाठी उपयोजित चित्रकाराला कुठल्याही माध्यमामध्ये काम करू शकणारे एक सांस्कृतिक, व्यापक भान हवे याची जाणीव चौधरींना होती. जाहिरात आणि औद्योगिक क्षेत्रात यशवंत चौधरी ‘वाय.टी.’ या आद्याक्षरांनी ओळखले जात.
ग्राफिक आर्टिस्ट म्हणजे मुद्रण वा तत्सम माध्यमांच्याद्वारे दृश्यभाषेतून संवाद साधणारा चित्रकार. वायटींचे म्हणणे असे होते, की ग्राफिक आर्टिस्टचे कार्य अमूर्त कल्पनांना, मांडणीच्या तत्त्वांना अनुसरून मूर्त रूप देणे हे आहे. या प्रक्रियेत मुद्रणाचे किंवा दूरचित्रवाणीसारख्या दृश्यमाध्यमांचे तंत्रज्ञान एक सर्वव्यापी नवी दृश्यभाषा घडवण्यास मदत करते. वायटींच्या म्हणण्यानुसार संज्ञापनाचे तीन प्रमुख घटक असतात - लेखक, चित्रकार, तत्त्वज्ञ, या तिन्हींचाही अंश असलेला ग्रफिक आर्टिस्ट हा नवनिर्मिती करणारा सर्जक (पर्सेप्टर) असतो. सर्जन (पर्सेप्शन) ही प्रत्यक्ष निर्मिती असते. उदाहरणार्थ, साहित्यकृती, चित्र, जाहिरात, पॅकेजिंग वगैरे. तिसरा घटक हा ग्रहण करणारा ग्राहक (पर्सीव्हर) असतो. माध्यम कोणतेही असो, हे घटक कायम असतात. आजचा ग्रहक हा सतत बदलता आहे. या बदलत्या संवेदनशीलतेशी आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे, असे ते सांगत.
यशवंत चौधरी यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम केले. भारतीय संस्कृती आणि जागतिकीकरण यांचा समन्वय त्यांनी आपल्या संकल्पनात्मक कामांमधून मांडला. पाश्चात्त्य संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानातही कशा अस्तित्वात आहेत याची त्यांनी दृश्यात्मक मांडणी केली. कान, नाक, डोळा, हात, पाय ही मानवी शरीराची अभिव्यक्तीची साधने आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञान हा त्यांचाच विस्तार आहे हे त्यांनी एका कंपनीच्या पुस्तिकेत तंत्र आर्ट, कथक, मायकेल एंजेलोचा अॅडम अशा प्रतीकांमधून आणि दूरचित्रवाणीचा पडदा, मोटारीचा टायर अशा यंत्रयुगाच्या चिन्हांमधून मांडले आहे.
बोधचिन्हे आणि कॉर्पोरेट डिझाइन यांमध्ये वायटी यांनी आपला ठसा उमटवला तो त्यांच्या मूलभूत विचार करण्याच्या क्षमतेमुळे, आणि हे विचार साध्या, सहजपणे कळतील अशा दृश्य आकारांमध्ये मांडण्याच्या कल्पकतेमुळे. एखाद्या कंपनीचे बोधचिन्ह करायचे किंवा लेटरहेडपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत विविध माध्यमांतून एक आश्वासक प्रतिमा निर्माण करायची, तर त्यासाठी त्या कंपनीच्या कॉर्पोरेट फिलॉसॉफीचा ग्रफिक आर्टिस्टला अभ्यास करावा लागतो आणि मग संकल्पनात्मक मांडणी करावी लागते. ‘एचडीएफसी’चे प्रसिद्ध बोधचिन्ह वायटींचेच आहे. साध्या आयताकृती विटांच्या मांडणीतून, काळ्या शेडच्या विविध कोनांमधल्या परिप्रेक्ष्यातून आणि मांडणीतल्या रेषांच्या गतिमानतेतून घरोची, विस्ताराची, सुरक्षिततेची, सहकाराची अशी अनेक अर्थवलये सूचित होतात, जी ‘एचडीएफसी’च्या घरबांधणीच्या कर्जाशी, कंपनीच्या ध्येयधोरणांशी सुसंगत आहेत.
यशवंत चौधरींनी पॅकेजिंग क्षेत्रातही एक नवी दृष्टी आणली. क्रयवस्तूंचे वेष्टण आकर्षक असेल तर त्यांचे विक्रीमूल्य वाढते आणि ग्राकाच्या मनात त्या वस्तूची विश्वासपूर्ण ओळख निर्माण करण्यास ते साहाय्यभूत ठरते. पॅकेजिंग उत्पादित वस्तूचे मूल्य मार्केटिंग आणि उद्योगाच्या व्यापक धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे वायटींनी आपल्या कामातून पटवून दिले. अशा पॅकेजिंगला लागणार्या विविध घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याचे कल्पक संकल्पन अथवा डिझाईन करणे हे वायटींनी प्रथम केले. आज पॅकेजिंग क्षेत्राचा एक तंत्रज्ञान आणि कला म्हणून जो विकास झालेला आपण पाहतो, त्याची सुरुवात वायटींसारख्या ग्राफिक आर्टिस्ट्सनी केली.
यशवंत चौधरींनी संकल्पनेच्या व्यावसायिक क्षेत्रात आपले अग्रस्थान तर कायम ठेवलेच, पण त्याचबरोबर या क्षेत्रात प्रतिभावान, प्रशिक्षित संकल्पनकार-डिझाइनर्स यावेत म्हणून कला शिक्षणातही लक्ष घातले. शालेय स्तरावर मुलांची कलाशिबिरे घेण्यापासून ते सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, आयआयटीचे इण्डस्ट्रिअल डिझाइन सेंटर (आयडीसी) यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आखण्यापर्यंत ह्या शैक्षणिक उपक्रमांची व्याप्ती होती. कलाशिक्षणाच्या जुन्या अभ्यास-क्रमात कौशल्ये शिकवण्यावर अधिक भर होता. औद्योगिक क्षेत्रातल्या नव्या आव्हानांना सामोरे जायचे तर कलाविद्यार्थ्यांची विचारशक्ती जागृत करणे आणि सर्जनशीलतेला (क्रिएटिव्हिटी) मुक्त वाव देणे गरजेचे होते.
वायटी यांच्यावर युरोपातील बा हाउसमधील कलाशिक्षणाचा प्रभाव होता आणि उपयोजित कलेत नवा दृष्टीकोण आणणे किती गरजेचे आहे, हे ते व्यावसायिक क्षेत्रात अनुभवत होते. जे.जे.मधील पायाभूत अभ्यासक्रम (फाउण्डेशन कोर्स) आखण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आज दृक्संवादकला आणि संकल्पन क्षेत्राचा विस्तार झाला आहे. पण १९६० च्या दशकात यशवंत चौधरी यांनी त्याचे व्यावसायिक स्तरावर महत्त्व प्रस्थापित केले आणि सौंदर्यमूल्य हे उत्पादकता आणि आर्थिक विकासास साहाय्य करते हे सिद्ध केले. व्यवसाय आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांतला एक द्रष्टा संकल्पनकार म्हणूनच त्यांचा उल्लेख करावा लागेल.
- रंजन जोशी, दीपक घारे