Skip to main content
x

चौंडे, बाळकृष्ण मार्तंड

चौंडे महाराज ‘गोजीवन’

     बाळकृष्ण मार्तंड चौंडे म्हणजेच गोजीवन महाराजांच्या वडिलांचे नाव मार्तंडाचार्य व आईचे जानकीबाई होते. त्यांचे मूळचे घराणे कर्नाटकातील होते. पूर्वजांनी देवी चौंडा हिला नवस केला होता. त्या नवसाने पुत्रप्राप्ती झाली म्हणून हे घराणे ‘चौंडे’ आडनाव लावू लागले. मार्तंडाचार्य व जानकीबाई यांना माघ कृष्ण तृतीयेस (शके १७९८) पुत्रप्राप्ती झाली व त्या बालकाचे नाव ‘केशव’ ठेवले गेले. वाई येथेच केशव याचे प्राथमिक शिक्षण झाले.

     वडिलांनी छोट्या केशवाला दहाव्या वर्षीच सज्जनगडावर नेले. समर्थांच्या बंधूंची सातवी पिढी चालू होती. त्या वेळी तेथे महारुद्रबाबा होते. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा. यशोदा मातेने हात धरून स्वप्नातच छोट्या बाळाला मंदिरात नेले. चाफळ येथे अनुग्रह दिला. हा अनुग्रह मार्गशीर्ष शुद्ध १५, शके १८१९ (इ.स. १८९७) रोजी मिळाला. श्री चौंडे महाराज लहानपणीच सुंदर कीर्तन करू लागले. त्यांचे वडीलही त्यांच्याबरोबर असत. चौंडे महाराजांचा विवाह कानडे घराण्यातील कमलाबाई यांच्याशी झाला (शके १८१४ म्हणजे इ.स. १८९२). दौंड, खांडवा, देवास, उज्जैन, इंदूर अशी कीर्तने करीत ते काशी येथे गेले. काशीक्षेत्रीच त्यांच्या वडिलांनी देह ठेवला (इ.स. १९०२).

     चौंडे महाराज यांनी आपल्या डोळ्यांसमोर एकदा गोहत्या होताना पाहिली आणि त्यातील क्रौर्य व हिंसेने कळवळून गोरक्षणाचे कार्य हाती घेतले. महाराजांनी आजन्म केलेले गोरक्षणाचे कार्य अखिल भारतात प्रसिद्ध आहे. चौंडे महाराजांचे सारे आयुष्य ‘गोजीवन’च होते. त्यांची कीर्तने अतिशय प्रभावी आणि हृदयस्पर्शी होत. त्यामुळे अनेकांना ‘गो-रक्षणा’ची स्फूर्ती मिळाली. भागोजी शेटजी, मुंबई यांनी ५०,००० रुपयांची देणगी आणि ‘गोशाळा’ बांधून दिली. या भागेश्वर गोशाळेत भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीची स्थापना झाली होती.

     कोल्हापूरच्या छत्रपतींनी रुकडी येथे दोन हजार गाईंच्या कुरणासाठी ३०० एकर भूमी दान दिली. गो-रक्षणाचे कार्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाची खरी पूजा! या कार्याला भगवंताचे अधिष्ठान लाभणारच! दूध, दही, लोणी, तूप, शेती, नैसर्गिक खते, गोबर (शेण) वायू, धान्योत्पादन आणि दुधा-तूपातून निर्माण होणारे अन्नाचे शेकडो प्रकार गोपालनावर अवलंबून आहेत. चौंडे महाराजांची कीर्तने एवढी प्रभावी होत, की महार, मांग इत्यादी हरिजनांनीही गो-रक्षणाचे व्रत घेतले. गोजीवन चौंडे महाराजांच्या कार्याने भारतात अनेक नगरांत गोशाळा स्थापन झाल्या. महाराजांच्या व्रतस्थ जीवनाचे व कार्याचे संत महात्मे, क्रांतिकारक, राजकारणी नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, कीर्तनकार अशा विविध क्षेत्रांतील अनेक महापुरुषांनी मनापासून कौतुक केले. चौंडे महाराज यांना ९१ वर्षांचे आयुर्मान लाभले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. गोवर्धनकार्याला गती दिली. गोजीवन चौंडे महाराज यांनी जीवनाला एक  वेगळी दृष्टी दिली आहे.

डॉ. वि.य. कुलकर्णी

चौंडे, बाळकृष्ण मार्तंड