चिखलीकर, गुणवंत कृष्णराव
गुणवंत कृष्णराव चिखलीकर यांचा जन्म अमरावती येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण अमरावती येथेच झाले. १९५२ साली उच्च माध्यमिक परीक्षेत त्यांनी तीन विषयांत प्रावीण्य मिळवले. तसेच संस्कृत या विषयात प्रावीण्याबरोबरच विदर्भात पहिले येण्याचा मान पटकवला व सेंकला पारितोषिक मिळवले. १९५६ साली जबलपूर विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. ही वैद्यकशास्त्रातील पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. एवढ्यावरच न थांबता ते ज्ञानोपासनेच्या हव्यासापोटी १९६६मध्ये छऊझणच ही राष्ट्रीय पदविका-परीक्षा उत्तीर्ण झाले व १९८१ साली पी.के.व्ही. येथून एम.व्ही.एस.सी. ही पशु-प्रजननशास्त्रातील स्नानकोत्तर पदवी प्रथम क्रमांकाने त्यांनी मिळवली. यासाठी त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार देण्यात आला. केरळ व मुंबई येथे व्यवसायाशी संबंधित विशेष प्रशिक्षणही त्यांनी घेतले. त्यांनी आवडीपोटी प्राणायाम ध्यान व योगासनाचे प्रशिक्षण पूर्ण केले व प्राणायामावर एक छोटी पुस्तिका प्रसिद्ध केली.
नागपूर येथे १९५६ साली सरकारी नोकरीत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून लागलेले डॉ.चिखलीकर १९५३ साली पशुसंवर्धन सहसंचालक या रोगअन्वेषण विभागाच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले. ते आजतागायत विविध सामाजिक संस्थांत कार्यरत आहेत. ते ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या संस्थेचे आजीव सभासद तर आहेतच, शिवाय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. दरम्यानच्या काळात ते राहुरी कृषी विद्यापीठाच्या गोसंशोधन प्रकल्पात शास्त्रज्ञ म्हणून ६ वर्षे कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी ५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात बरीच उल्लेखनीय कामे केली व ही सर्व कामे त्यांनी राज्यस्तरीय रोगअन्वेषण विभागात असताना केली. त्यापैकी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बहुधातू विषबाधेचे निदान ठाणे जिल्ह्यातील जनावरांमध्ये केले. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पशुधनामधील तागाच्या विषबाधेचे निदानसुद्धा त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम केले.
नांदेड जिल्ह्यातील शेळ्यामेंढ्यामधील बुळकांडी रोगाचा प्रादुर्भाव, तसेच कोकणातील शेळ्यांमधील फुप्फुसामध्ये होणारा सी.सी.पी.पी. या अभावानेच आढळणाऱ्या रोगाचे निदान करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या काळात पशुपक्ष्यांमधील विविध रोगांसाठी प्रयोगशास्त्र चाचण्यांसंबंधी विविध तंत्रे यासंबंधी मार्गदर्शक नियमावली त्यांनी तयार करून राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवली.
‘इंडियन जर्नल ऑफ अॅनिमल रिप्रॉडक्शन’ या शास्त्रीय मासिकात त्यांचे चार संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. आणंद येथील अखिल भारतीय विषबाधा परिसंवादात त्यांनी ‘बहुधातू’ विषबाधेसंबंधी त्यांच्या संशोधन प्रबंधाचे वाचन केले. गोहत्ती (आसाम) येथील जीवशास्त्रीय विषयावरील अखिल भारतीय परिसंवादात एका संशोधनपर लेखाचे त्यांनी वाचन केले.
सेवानिवृत्तीनंतर १० वर्षे त्यांनी स्वत:ला समाजकार्यास वाहून घेतले व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, जागरूक नागरिक संघटना, तसेच ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, निवृत्त संघटना इ. संस्थांच्या माध्यमातून कार्य केले. संत तुकाराम उद्यानात त्यांनी चैतन्य हास्य योग मंडळाची २००५ मध्ये स्थापना करून संस्थापकीय अध्यक्ष व प्रशिक्षक म्हणून कार्य केले. १९९३ ते २००३ या काळात पिंपरी चिंचवड परिसरात पशुवैद्यकीय सल्लागार म्हणून कार्य, तसेच श्वान व मांजरी या प्राण्यांत होमिओपॅथी औषधांचे यशस्वी प्रयोग केले. आरोग्य, पशुविज्ञान, पशुजन्य मानवी आजार या विषयांवर फॅमिली डॉक्टर, ‘जनस्वास्थ्य’, ‘आरोग्य जागर’, ‘शिवांबु समाचार’, ‘दीर्घायु’, ‘श्वेतक्रांती’ आदी मासिकांत तांत्रिक लेख प्रसिद्ध केले.
ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र, पुणे या संस्थेतर्फे प्रथितयश पशुवैद्य म्हणून २०१० साली सन्मानित केले.