Skip to main content
x

चिले, महाराज

श्री चिले महाराज यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जिऊर या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर विद्यालयात, मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचे बोलणे बालपणापासूनच असंबद्ध वाटावे इतके वेडसरपणाकडे झुकलेले असायचे; परंतु त्या असंबद्ध वक्तव्यात खोल अर्थ दडलेला असायचा, हे त्यांच्या पुढील आयुष्यातील वाटचालीवरून आणि त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धींवरून लोकांना कळून चुकले. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कोल्हापुरातच चिखली येथील श्रीदत्ताच्या मंदिरात दर्शनार्थ गेल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि, ‘माझे मन, तुझे मन, काय सांगू जनांस?’, असे काहीतरी नित्याप्रमाणेच बडबडत ते बाहेर हिंडू लागले.

फार थोड्या लोकांना त्यांच्या बोलण्यातील गर्भितार्थ महत्प्रयासाने उकलायचा.  त्यांचे बोलणे सर्वसामान्यांना कळत नसले तरी ते वेडे नव्हते, हे खास. कारण एरव्ही त्यांचे वागणे अतिशय साधे, मृदुभाषी, चेहरा प्रसन्न आणि स्नेहार्द्र दृष्टी असायची. त्यांचा पेहराव सफेद पँट किंवा लेंगा, पांढरा शर्ट किंवा कुडता आणि डोक्यावर काळी टोपी असा असे.

एका जागी ते फार काळ केव्हाच थांबले नाहीत. खाण्यापिण्याच्याही ते कधी मोहात पडले नाहीत. कसल्या गोष्टींचा संचय तर दूरच, दत्तभक्तीचा संचय मात्र त्यांनी अगणित केला, तसा तो लोकांमध्ये वितरितही केला. कुणाही भक्ताच्या घरी ते केव्हाही प्रविष्ट होत, मिळेल ते खात. आहार सात्त्विकच घेत. त्यात मिष्टान्नही कधीतरी असे. कधी चक्क उपवासही घडे. तोही ते गोड मानून घेत.

श्री चिले महाराजांचा लौकिकार्थाने कुठे मठ, आश्रम अशी ओळख नव्हती. ते स्वत:च चालताबोलता मठ होते. चिले महाराजांना लोक दत्तावतारी अवलिया मानीत. त्यांनी मैलोन्मैल पायपीट केली. संतमहात्म्यांच्या तीर्थस्थानांना, समाधिस्थानांना, उगमस्थानांना भेटी दिल्या. तेथील स्थानांचे महत्त्व जाणून घेतले. जागोजागी लोकांना सदुपदेश केला. हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश येथेही त्यांनी आपला असंख्य भक्तसंप्रदाय तयार केला.

महाराष्ट्रात पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या प्रदेशांत त्यांचे विशेषत्वाने भक्तगण पसरलेले आहेत. परदेशांतही श्री चिले महाराजांचा कृपाप्रसाद लाभलेले भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत आणि परदेशांतही महाराजांचे उत्सव आजही भक्तिभावाने साजरे होतात. श्री चिले महाराज लोकांना त्यांच्या अडीअडचणी, समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी उपाय सुचवीत असत. त्यांचे उपाय आणि समस्यांमधून सोडवणुकीची पद्धत, लोकांना चमत्कार वाटावा इतपत अद्भुत प्रकारची असे. परंतु, लोकांच्या आकलनापलीकडचे उपाय सहज म्हणून श्री चिले महाराज सांगत. हे सारे त्यांना श्रीदत्तांकडून प्राप्त झालेल्या सिद्धींमुळे घडते, असे लोक मानीत. महाराजांच्या केवळ स्पर्शाने समस्या सुटतात, असा लोकांचा दृढ विश्वास होता.

सुखात असताना आवर्जून दु:खाला आठवावं, दु:ख आलं तर त्याला हसत सामोरं जावं, तर दु:खाची तीव्रता कमी होते!हे त्यांचे साधे तत्त्वज्ञान होते. भगवा झेंडा, अर्थात भागवतधर्म सदा उन्नत, उदात्त ठेवावा असा त्यांचा नेहमीच उपदेश असे. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीतारामहे भजन त्यांच्या मुखात नेहमी असे. पूज्य चिले महाराजांचे महानिर्वाण १९८६ सालीवयाच्या चौसष्टाव्या वर्षी करवीरनगरातच झाले. कोल्हापूर शहरापासून वीस कि.मी.वर असलेल्या पैंजारवाडी येथे त्यांची समाधी त्यांच्या भक्तगणांनी बांधली आहे. श्रीदत्तमंदिराची स्थापनादेखील त्यानंतर करून चिले महाराजांच्या कार्याची आठवण, ‘परमपूज्य श्री चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या रूपात जागृत ठेवली आहे. ट्रस्टमार्फत श्रद्धावान आणि नागरिकांसाठी नैमित्तिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रमही राबविले जात असतात.

संदीप राऊत

चिले, महाराज