Skip to main content
x

चिपळोणकर, मोरेश्वर वासुदेव

     पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर भौतिकशास्त्र विषयात जे काही उल्लेखनीय कार्य शिक्षण व संशोधन या क्षेत्रात झाले, त्याचा पाया डॉ. मोरेश्वर वासुदेव चिपळोणकर यांनी रचला. त्यांचा जन्म अकोला, खानदेश येथे झाला. त्यांनी एम.एस्सी. पदवी बनारस विद्यापीठातून प्राप्त केल्यानंतर भौतिकशास्त्र विषयातील ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही पदवी १९४२ साली मिळविली. एम.एस्सी. नंतर थेट डी.एस्सी. ही पदवी मिळविणे निश्चितच प्रशंसनीय बाब आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्कृष्ट प्रबंधाबद्दल मुंबई विद्यापीठाचे मूस सुवर्णपदकही मिळविले. त्यानंतर काही काळ त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये ‘स्कूल ऑफ रेडिओ फिजिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या विभागात प्राध्यापक व संचालक म्हणून काम केले. पुढे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मीटिऑरॉलॉजीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतरचा १९५२ ते १९६९ हा काळ त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर व्यतीत केला. त्यांनी केलेले संशोधनकार्य हे मुख्यत: रेडिओ फिजिक्स, नाइट एअर ब्लो, हवामानशास्त्र अभ्यास, खगोलशास्त्र आणि भारतीय संगीतातील विज्ञान इत्यादी विषयांशी निगडित होते. ढग, वीजवावटळी, विजांचा कडकडाट, जमिनीजवळील विद्युतक्षेत्र व निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तापमान आणि दाब इत्यादी घटकांसंबंधीचा प्रायोगिक व तात्त्विक अभ्यास करून डॉ. चिपळोणकरांनी अनेक प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानच्या पश्चिम आणि दक्षिण प्रदेशावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा अभ्यासही त्यांनी केलेला आहे.

     ‘ओझोनोस्फिअर’मधील आणि जमिनीलगतच्या थरांतीलही ओझोन वायूसंबंधीची अचूक मोजमापे हिंदुस्थानात करणारे हे पहिलेच संशोधक होत. वारिसात तोफोंच्या नैसर्गिक आविष्कारात उत्पन्न झालेल्या ध्वनिलहरींच्या साहाय्याने ओझोनोस्फिअरमधील तापमानाचा त्यांनी अचूक अंदाज केलेला आहे व त्या आविष्काराचे उगमस्थानही निश्चित केले आहे. ‘अ‍ॅटमॉस्फेरिक्स’ किंवा रेडिओमध्ये ऐकू येणारा खडखडाट यासंबंधी व त्यावरून ‘आयनोस्फिअर’संबंधीचा प्रायोगिक अभ्यास त्यांनी स्वत: व अनेक विद्यार्थ्यांच्या मदतीनेही बरीच वर्षे करून या शाखेत भर घातली आहे.

     संधीप्रकाशाच्यावेळी आकाशातून येणाऱ्या तेजाचेही अचूक मोजमाप अनेक वर्षे करून ‘स्ट्रॅटोस्फिअर’मधील निरनिराळ्या उंचीवरील हवेचे तपमान व घनताही अजमावली आहेत. त्याचप्रमाणे आयनोस्फिरमधील निरनिराळ्या थरांतून रात्रीच्या वेळी येत असलेल्या अत्यंत मंद प्रकाशाचे म्हणजेच रात्रीप्रकाशाचे मोजमाप निरनिराळ्या पद्धतींनी त्यांनी स्वत: आणि विद्यार्थ्यांकरवीही अनेक वर्षे केलेले आहे.

     स्फोटक ध्वनिलहरींच्या परिणामामुळे धातूंच्या अंतर्रचनेत आणि त्यांच्या गुणधर्मात जे बदल घडून येतात त्यासंबंधीही त्यांनी संशोधन केले आहे. आकाश निरीक्षणासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता.

     पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग हा देशातील अग्रगण्य विभाग म्हणून गणला जातो. या विभागाने अलीकडच्या काळात भौतिकशास्त्रातील शाखांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला आहे. त्यांपैकी हवामानशास्त्र आणि अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेले अवकाशशास्त्र या विषयांत झालेल्या प्रगतीचा पाया चिपळोणकर यांनी अनेक दशकांपूर्वी घातला. ही परंपरा त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे चालू ठेवली. डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्याकडून त्यांना मिळालेली संशोधनाची प्रेरणा ही त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांची साक्ष देते.

     १९७०च्या दशकानंतर संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे नवीन विषयांचा विकास झाला. त्यात मटेरियल सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, बायोफिजिक्स, लेझर त्याचप्रमाणे सैद्धान्तिक भौतिकी यांचा समावेश करता येईल. या पार्श्वभूमीवर विचार केला, तर मो. वा. चिपळोणकर यांच्या काळात संशोधन करणे ही अत्यंत जिकिरीची बाब होती. परंतु डॉ. मो. वा. चिपळोणकर यांच्यामध्ये असणारी संशोधनाची आवड, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, वागणुकीतील साधेपणा आणि सरळमार्गी व्यवहार या गोष्टींच्या बळावर त्यांनी संशोधन सुरू ठेवले. ते स्वत: अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा व्यवहार हा अत्यंत सचोटीचा होता.

    अध्यापन, संशोधन व इतर शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधूनही डॉ. चिपळोणकर वाचन व अध्ययन चिकाटीने व जिद्दीने करीत. त्यांच्या दिनक्रमात सकाळचा वेळ हा वाचन आणि अध्ययनाकरिता राखून ठेवलेला असे. विभाग आणि विद्यापीठाचे अनुशासन व प्रशासन हे नेहमी दुपारी १२ ते ३ या वेळात असे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा व त्यांना मार्गदर्शन या करता नंतरचे दोन-तीन तास वापरले जात. ते संध्याकाळी आणि रात्री आपल्या आवडीच्या शास्रीय विषयांचे वाचन करीत. त्यांचे ज्येष्ठ सहकारी व नामवंत रसायनशास्रज्ञ डॉ. शंकर खंडो कुलकर्णी-जतकर यांनी अध्ययन आणि वाचन निष्ठा जागृत ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीबद्दल खूपच प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ज्येष्ठ व तरुण वैज्ञानिकांना एकत्र येता यावे व विचारांचे आदान प्रदान व्हावे याबाबत त्यांनी ‘विज्ञान’ नावाचा वैचारिक मेळावा भरवण्याचे कार्य केले. प्रत्येक वर्षी हा तीन दिवसीय मेळावा ते स्वखर्चाने भरवीत असत. अंगीकृत कार्य उत्कृष्टपणे व्हावे यासाठी पदरमोड करण्यास ते सदैव तयार असत.

     ‘मराठीतून विज्ञान प्रसार’ या विषयात त्यांनी केलेले योगदानही खूपच अमूल्य आहे. प्रसाराची साधने अत्यंत सीमित असतानाही त्यांनी केसरी, सकाळ, सृष्टिज्ञान, विज्ञानयुग, स्वराज्य यांसारख्या नियतकालिके आणि साप्ताहिकांमधून शंभरहून अधिक लेख लिहिले. विज्ञानातील अचूकपणावर त्यांचा कटाक्ष असे. सृष्टिज्ञान मासिकाच्या संपादक मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे विभागातर्फे विज्ञान प्रसाराचे कार्य करणार्‍या व्यक्तीस ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि हा पुरस्कार मिळणे म्हणजे मराठीतून विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचीच पावती समजली जाते. यातच चिपळोणकर यांच्या कार्याचे आणि निष्ठापूर्ण जीवनाचे महत्त्व सामावलेले आहे.

डॉ. पंडित विद्यासागर

चिपळोणकर, मोरेश्वर वासुदेव