Skip to main content
x

चिटणीस, चेतन एकनाथ

     चेतन एकनाथ चिटणीस यांचे वडिल भौतिकतज्ज्ञ तर आई जैवरसायनतज्ज्ञ. अशा आईवडिलांचे गुण घेऊन चेतन चिटणीस जैवतंत्रज्ञान शाखेकडे वळले. शालेय शिक्षण अहमदाबादला तर आयआयटी मुंबई येथून भौतिकशास्रात एम.एस्सी. पदवी संपादन करून त्यांनी आपले पुढील शिक्षण राईस आणि बर्कले विद्यापीठांतून पूर्ण केले. चिटणीस पेशी आणि रेण्वीय जीवशास्त्र (सेल आणि मोलीक्युलर बायोलॉजी) यातील संशोधन कार्यक्रमाकडे वळले. राइस विद्यापीठात भौतिकशास्त्रात एम.ए. तर बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवभौतिकीमध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवली. फुप्फुसरोगांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘सुडोमोनॉस एरीगुनोसा’ या परजींवीवर त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन केले.

     त्यानंतर भारतीयांना त्रस्त करणाऱ्या मलेरियावर डॉ. लुईस मिलर ह्यांच्या हाताखाली त्यांनी संशोधन केले. पाच वर्षानंतर १९९५ मध्ये ते ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरींग आणि बायोटेक्नॉलॉजी’ (आय.सी.जी.इ.बी) या संस्थेमध्ये दिल्ली येथे संशोधक म्हणून रुजू झाले.

    मलेरियात रक्तातील तांबड्या रक्तपेशी नष्ट होऊन मलेरियाचे परजीवी का वाढतात? त्यावेळी पेशी, रेणू यांच्यामध्ये कोणत्या आंतरक्रिया किंवा कोणत्या अभिक्रिया होतात ह्याविषयीच्या संशोधनात त्यांना विशेष रस आहे. त्यामुळे त्यांनी मलेरिया नष्ट करण्याचा ध्यास घेतला.

    डॉ. चिटणीस यांनी वॉशिंग्टनला असताना आपल्या सहकाऱ्यांसह रक्तातील तांबड्या पेशींच्या पृष्ठभागावर वाढणारे प्रतिजनुक (अ‍ॅन्टीजेन) शोधून काढले. ह्या प्रतिजैविकावरच मलेरियाचे सूक्ष्म परजीवी असतात. त्यांची संख्या रक्तामध्ये वाढत जाते. त्यामुळे रक्तातील तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होत जाऊन मलेरिया होतो. ह्या प्रक्रियेचा शोध लागताच डॉ. चिटणीस यांच्या संशोधक वृत्तीने उचल खाल्ली. ज्यायोगे हे मलेरियाचे परजीव तांबड्या रक्तपेशींना बांधले जाणार नाहीत. आणि असे द्रव्य शोधून काढले पाहिजे. आणि असे प्रतिद्रव्य मिळाले तर मलेरियावर निश्चित मात करता येईल, असे त्यांना वाटले.

    भारतात परतल्यावर डॉ. चिटणीस यांनी याच दिशेने कार्य करण्यास सुरुवात केली. मलेरियाच्या परजीवीला बद्ध करणारे प्रथिन तर त्यांनी शोधलेच, त्याचबरोबर रक्तपेशीतील कोणते गुणसूत्र मलेरियास कारणीभूत होते, हेही त्यांनी शोधले. मलेरिया परजीवीला बद्ध करणारे प्रथिन इ-कोलाय द्रव्यात, प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात तयार करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. हे प्रथिन केवळ शुद्ध स्वरुपातच नाही तर विशिष्ट तऱ्हेने रचण्यातही (गुंडाळण्यातही) त्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे मलेरियाची लस आता दृष्टीक्षेपात आली आहे.

    डॉ. चिटणीसांची मलेरियानिर्मूलन विषयीची तळमळ अनेक मान्यवरांनी हेरली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीचे संस्थापक शास्त्रज्ञ डॉ. जी. पी. तलवार यांनी त्यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

    डॉ. चेतन चिटणीस यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९५ साली अमेरिकेतर्फे ‘तरुण संशोधक’ पुरस्कार, १९९७ साली भारतातील ‘बी.एन. सिंग स्मृती’ पुरस्कार, २००० सालातील ‘अय्यंगार’ पुरस्कार त्यांना मलेरियावरील संशोधनासाठी प्राप्त झाले आहेत. याखेरीज तरुण शास्रज्ञांना देण्यात येणारा ‘शांतिस्वरूप भटनागर’ पुरस्कार त्यांनी वैद्यकशास्रात केलेल्या संशोधनाबद्दल २००४ साली त्यांना मिळाला आहे.

- मृणालिनी साठे

चिटणीस, चेतन एकनाथ