Skip to main content
x

चिटणीस, एकनाथ वसंत

      प्रा.एकनाथ वसंत चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे, (स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर) माजी संचालक आहेत. कोल्हापूर येथे जन्मलेल्या प्रा.चिटणीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयांत पदवी संपादन केलेल्या प्रा. चिटणीसांनी त्यानंतर रेडिओसंपर्क क्षेत्रातील पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी आपल्या संशोधनास प्रारंभ केला. प्रा. चिटणीस हे भारतीय अंतराळ कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रासाठी केरळमधील थुंबा या जागेची आणि उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी श्रीहरिकोटा या जागेची निवड करण्यामागे मुख्यत्वे प्रा. चिटणीस यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. भारताच्या अंतराळ क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ मालिकेतील उपग्रहांच्या आखणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत केला जाण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे.

     प्रा. चिटणीसांचे १९५०-१९६० या दशकातले संशोधन हे वैश्विक किरणांशी संबंधित होते. या संशोधनात तामीळनाडूमधील कोडाईकॅनॉल येथून केलेल्या वैश्विक किरणांच्या वर्षावाबद्दलच्या विशेष अभ्यासाचाही समावेश आहे. त्यांची पीएच.डी. ही पदवी याच विषयाशी संबंधित आहे. वैश्विक किरणांवरील संशोधनासाठी १९५८ ते १९६१ या तीन वर्षांच्या काळात ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतही राहिले होते. १९६०-१९७० या दशकांत प्रा. चिटणीसांनी क्ष-किरण खगोलशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित केले. या संशोधनात अंतराळातील क्ष-किरणांच्या विविध स्रोतांचे वेध घेण्यासाठी अग्निबाणांवर बसवलेल्या उपकरणांचाही वापर केला गेला.

     अंतराळ तंत्रज्ञानाचा शेत़ी, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन, अशा विविध क्षेत्रांत वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने ‘नासा’च्या सहकार्याने १९७०च्या दशकात ‘साइट’ (सॅटेलाइट इंस्टक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट) हा बहुपयोगी प्रकल्प आखला होता. अवकाश उपयोजन केंद्राचे तत्कालीन संचालक प्रा. यशपाल यांच्या सक्रिय पुढाकारातून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी यशस्विरीत्या पार पाडली. १९७५-१९७६ साली प्रत्यक्षात आलेल्या या प्रकल्पामुळे विविध राज्यांतील सुमारे २९०० खेड्यांतील दूरचित्रवाणी संच उपग्रहाद्वारे एकमेकांना जोडले जाऊन विविध कार्यक्रमांचे सर्वत्र एकाच वेळी प्रसारण करणे शक्य झाले. या प्रकल्पामुळे दूरचित्रवाणी हे नुसतेच करमणुकीचे माध्यम न राहत़ा, या माध्यमाची राष्ट्रीय स्तरावरची सर्वंकष उपयुक्तता सिद्ध झाली.

     भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात सुरुवातीपासून सहभागी असणारे प्रा. चिटणीस १९६२ साली अंतराळ संशोधनासाठी डॉ. विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय समितीचे (इन्कोसपार) सभासद सचिव होते. प्रा. चिटणीसांचा संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटनांशी निकटचा संबंध आला असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदांतून भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१-१९८५ या काळात प्रा. चिटणीस हे अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक होते. १९८५ साली या पदावरून निवृत्त झाल्यावर दोन वर्षांसाठी त्यांची याच संस्थेत सल्लागार म्हणून विशेष नेमणूक केली गेली होती. त्यानंतर त्या वेळी नुकत्याच सुरू झालेल्या ‘कंट्रिवाइड क्लासरूम’ या दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता.

     गेली अनेक वर्षे प्रा.चिटणीस हे पुणे विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन’, ‘पत्रकारित़ा’, ‘मास कम्युनिकेशन’, अशा विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या आयोजनांस मार्गदर्शन करीत असून ते या विषयांत अध्यापनही करीत आहेत. १९८६ सालापासून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक समितीवर असणाऱ्या प्रा. चिटणीसांनी २००८-२००९ या काळात या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. ‘राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाऴा’, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या विज्ञान संशोधन संस्थांपासून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापी़ठ’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापी़ठ’, ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ यांसारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

     प्रा.चिटणीस हे आपल्या बहुविध कार्याद्वारे विविध सन्मानांचे मानकरी ठरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील बहुमोल योगदानाबद्दल १९८५ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांवर आधारित कार्याबद्दल त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आले. प्रा. चिटणीसांना ‘फाय फाउंडेशन’चा सन्मान  व ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ‘आर्यभट्ट’ पारितोषिकही मिळाले आहे. दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून प्रा. चिटणीसांचा विशेष पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

डॉ. राजीव चिटणीस

चिटणीस, एकनाथ वसंत