Skip to main content
x

चिटणीस, विजया

         मराठी भाषिकांना मराठी शिकवण्याच्या संदर्भात डॉ. विजया चिटणीस यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील श्रीधर बाळकृष्ण चिटणीस धुळ्यातील नामवंत वकील होते. आई कमल श्रीधर चिटणीस या सुगृहिणी होत्या. त्यांना तीन मुले आणि तीन मुली, त्यापैकी एक विजया होत. सर्व भावंडे उच्चशिक्षित असून चिटणीसांचे घराणे त्या काळात सुधारक म्हणून ज्ञात होते. आईला जर ‘अगं, तूगं’ म्हणायचे तर वडिलांनाही ‘ए बाबा’ म्हटले पाहिजे, अशा स्त्री-पुरुष समानतेच्या मताचे विजया चिटणीसांचे वडील होते.

     विजया चिटणीसांचा जन्म धुळे येथे झाला. १९५९ मध्ये मराठी भाषा घेऊन त्या पदवीधर झाल्या व त्यात त्या सर्वप्रथम आल्या. त्यांनी १९६१ मध्ये पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधून भाषाशास्त्र या विषयात पीच.डी. पदवी मिळवली. खानदेशातील ‘अहिराणी बोली’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधासाठी त्यांना जागतिक कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना.गो. कालेलकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. यातूनच पुढे भाषाशास्त्रीय तत्त्वांच्या आधारे अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. भाषा शिकवण्यात येणार्‍या अडचणी, त्यातील बारकावे यांविषयी सखोल अभ्यास व चिंतन करून अमराठी भाषिकांना सुलभपणे आणि सुकरपणे मराठी शिकता आणि शिकवता यावे यासाठी त्यांनी ‘An Intensive Course in Marathi’ हे पुस्तक लिहिले, ते म्हणजे या क्षेत्रातील पहिल्या क्रमाकांचा संदर्भ ग्रंथ आहे.

     भाषाशास्त्रातील विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अनेक परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले. तसेच बँकांतील व इतर सरकारी क्षेत्रांतील उच्चपदस्थ अमराठी अधिकार्‍यांना मराठी शिकवण्याचे वर्ग घेतले आणि अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याच्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक झाला. हे काम चालू असतानाच १९६९-७० या वर्षी डेक्कन महाविद्यालयामध्ये भारतीय भाषा संस्थान (Indian Institute of Central Languages,Mysore) या संस्थेचे पश्चिम विभागीय भाषा केंद्र (Western Regional Languages Centre-W.R.L.C.) सुरू झाले. म्हैसूरच्या भाषा संस्थानच्या अशा पाच विभागीय शाखा असून W.R.L.C. पुणे येथे अमराठी भाषा शिक्षक (शाळेतील) मराठी, सिंधी, गुजराती, कोकणी यापैकी कोणतीही भाषा आपल्या पसंतीनुसार शिकू शकतात. पुण्यातले हे केंद्र १९६९-७०मध्ये जेव्हा सुरू झाले, त्या आरंभापासून ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत डॉ. विजया चिटणीस त्याच्या प्राचार्य होत्या. अनेक शिक्षक-प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवण्याचा लाभ झाला. वयाच्या ४८व्या वर्षी कर्करोगाने त्यांचे अकाली निधन झाले. पन्नासहून कमी वर्षांच्या आयुष्यातही विजया चिटणीसांनी भाषा-शिक्षक म्हणून चांगला नावलौकिक मिळवला. त्याचबरोबर जे शोधनिबंध लिहिले, तेही भाषाशिक्षणाशी निगडित होते. ते असे-

मराठीत १) ‘मातृभाषेचं शिक्षण’ १९७९, २) ‘स्वनविचार’ १९८२

     इंग्रजीत - १) Observations of language teaching in Primary and Secondary Schools of Bombay Municipal Corporation-A Report २) Special Training course for primary teachers of Madhya Pradesh-A report ३) The Place of Grammer in Mother-tongue teaching- 1979 आणि पुस्तक An Intensive Course in Marathi. इलिनॉय विद्यापीठाच्या विदुषी भाषाशास्त्रज्ञ डॉ. श्रीमती काशीवाली यांच्याबरोबरही अमेरिकेत विजयाताईंनी काम केले होते. (१९७७)

     ललित लेखनातही त्यांना रस होता, गती होती. मराठी शिकणारे परभाषिक यावर आधारित अशी एक छोटी नाटिका त्यांनी लिहिली होती. तसेच त्या उत्तम वक्ता/ वाक्पटू होत्या. मुख्यत्वेकरून भारतीय आणि परदेशी अशा अमराठी भाषिकांना मराठी शिकवणे - त्यासाठीचे Training and Orientation अर्थात प्रशिक्षण आणि उद्बोधन वर्ग यशस्वीरित्या घेणे हे त्यांचे कार्यक्षेत्र होते आणि अखेरपर्यंत त्यामध्ये त्या व्यग्र होत्या.

डॉ. अपर्णा झा

चिटणीस, विजया