Skip to main content
x

चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री विष्णू

       सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे मूळ नाव रंगो वामन धडफळे असे होते. ते चित्राव घराण्यात दत्तक म्हणून गेले. पुणे येथील वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या संस्कृत पाठशाळेत सन १९२० ते १९२२ या काळात मुंबईची संस्कृत पाठशाळा, टिळक महाविद्यालय, पुणे इत्यादी ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. नंतर जैन महाविद्यालयात त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला.

पुढे १९२५ पर्यंत सरस्वती मंदिर, पुणे नाईट हायस्कूल व भारत हायस्कूल या शाळांमध्ये त्यांनी अध्यापन केले. पुण्याच्या डेक्कन विद्यापीठातील संस्कृत विभागात शास्त्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्रातील हिंदू महासभेचे तळमळीचे कार्यकर्ते व पुढारी, अखिल भारतीय शुद्धिसभेचे स्वागताध्यक्ष (१९३५), वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कार्यवाह (१९३४-५०), भारतीय चरित्रकोश मंडळ या पुण्यातील संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इत्यादी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांकडून १९२० मध्ये विद्यानिधीही उपाधी, पुरीच्या शंकराचार्यांकडून १९५२मध्ये महामहोपाध्यायही पदवी, १९६५मध्ये राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय संस्कृत पंडितम्हणून मानपत्र,’Review of Indological Research in last seventy five Years’ हा ग्रंथ १९६७ मध्ये राष्ट्रपतींकडून अर्पण, १९६९मध्ये पुणे विद्यापीठाकडून सन्मान्य डी.लिट्. ही पदवी आणि १९७१ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्रीआदी बहुमान त्यांना प्राप्त झाले.

वेद-विद्या व भारतीयांचे धार्मिक संस्कार सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे अनमोल कार्य करणारे ग्रंथकार म्हणून त्यांचा यथार्थ लौकिक आहे. पूर्वसुरींचे ऋग्वेद संहितेच्या भाषांतराचे अपूर्ण राहिलेले कार्य दहाव्या मंडलापासून सुरुवात करून उलट्या क्रमाने त्यांनी ते १९२८मध्ये पूर्ण केले. अथर्ववेदाचे संपूर्ण भाषांतर करून भारतीय लोकसाहित्याची गंगोत्री १९७२मध्ये महाराष्ट्राला उपलब्ध करून दिली. या भाषांतराला जोडलेली ९० पृष्ठांची प्रस्तावना म्हणजे एक चिकित्सक प्रबंधच आहे.

वैदिक संस्कृती व हिंदू धर्म यांचे पुरस्कर्ते या नात्याने त्यांनी १९२७ मध्ये प्रसिद्ध केलेली धर्मग्रंथमाला संध्या, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव, पूजा, श्राद्धप्रयोग यांचा परिचय करून देते. गणेश अथर्वशीर्ष यांसारख्या धर्मप्रवण भारतीयांत प्रचलित असलेल्या दैनंदिन स्तोत्रांचा मराठी अनुवाद व परिचय त्यांनी करून दिला. याशिवाय हिंदू धर्मातील संस्कारांचे महत्त्व लोकांना पटवून देण्याच्या उद्देशाने चौल, उपनयन, यज्ञोपवीत, समावर्तन, विवाह व शुद्धी या विषयांवर लहान- लहान पुस्तके प्रकाशित केली.

या मालेतले पहिले पुस्तक धार्मिक संस्कार व नित्यकर्मे१९६५ मध्ये प्रकाशित झाले. आचार, संस्कृत आणि मंत्र यांपासून दुरावत चाललेल्या भारतीयांना संस्कारांची आजच्या काळातील आवश्यकता सोदाहरण पटवून देणारी ही माला धार्मिक साहित्यात मोलाची भर टाकणारी आहे. शुद्धिसंस्कारच्या प्रस्तावनेत धर्मांतर, प्रायश्चित्त व शुद्धीकरण यांबद्दलचे विचार आज अधिक उद्बोधक वाटणारे आहेत. हिंदुधर्मतत्त्वसंग्रहया पुस्तकात हिंदू धर्माच्या तत्त्वांचे सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी केलेले विवेचन आणि धर्मशिक्षणया ग्रंथात धर्मशिक्षणाची आवश्यकता समजावून सांगितली. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण परिचय ग्रंथातही वैदिकांचे मूलस्थान, महाराष्ट्राची वसाहत यात त्यांच्या ऐतिहासिक दृष्टीची प्रचिती येते. ब्राह्मणांची शरीररचना व स्वभाव यांच्या विवेचनात त्यांनी डॉ.घुर्ये, रिश्ते यांसारख्या समाजशास्त्रज्ञांच्या विचारांचा मागोवाही घेतला व भावी दिशा दाखवताना लोकसेवेच्या व्रतावर जोर दिला, हे लक्षणीय आहे.

या कार्यापेक्षाही कोशकार म्हणून चित्राव शास्त्री यांचे निवृत्तीनंतरचे कार्य मराठीत चिरंजीव ठरले. ज्ञानकोश मंडळात वैदिक विभागाचे सह-संपादक म्हणून सन १९१८ ते १९२२ या पाच वर्षांत ज्ञानकोशाच्या प्रस्तावना खंडातील दाशराज्ञ युद्धवैदिक शब्दसृष्टीही त्यांच्या हातची महत्त्वाची प्रकरणे लिहिली होती. त्यांनी महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांच्या साहाय्याने संपादित केलेली महाभाष्यपदसूचीअष्टाध्यायादि पदसूचीव्याकरणाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरतात. चिकीत्सक बुद्धिमत्ता, चिकाटीचे प्रयत्न व कामाची उरकशक्ती या गुणांच्या जोरावर त्यांनी एकट्याने अकारविल्हे टिपणे करून प्राचीन चरित्रकोशाची ७०० पृष्ठांची पहिली आवृत्ती भारतीय चरित्रकोश मंडळातर्फे १९३२ मध्ये प्रकाशित केली. यात वेदकाळापासून चंद्रगुप्त मौर्य (.. पूर्व ३८०) पर्यंतच्या पूर्वकालीन व्यक्तींसंबंधीची माहिती संगतवार दिली आहे. मौर्य चंद्रगुप्तांपासून पेशवाई अखेर पर्यंतच्या काळाला मध्ययुगअसे नाव देऊन त्या काळातील ऐतिहासिक व्यक्तींच्या संगतवार चरित्रांचा कोश मध्ययुगीन चरित्रकोशया नावाने सन १९३७ मध्ये प्रकाशित झाला व १८१८ ते १९४५ पर्यंतच्या अर्वाचीन काळातल्या व्यक्तींची चरित्रे सन १९४६ मध्ये अर्वाचीन चरित्रकोशया ग्रंथात संगतवार मांडली. या तिन्ही भागांच्या २२०० पृष्ठांत एकूण १९,००० चरित्रे दिलेली आहेत. प्राचीन चरित्रकोशाच्या परिवर्धित संस्करणाची हिंदी आवृत्ती सन १९६४ मध्ये प्रकाशित झाली. या आवृत्तीत सुमारे २०० पृष्ठांची नवी भर घातलेली आहे. त्यातली टिपणे साधार तर आहेतच, शिवाय डॉयसेन पाल यांसारख्या हिंदी तत्त्वज्ञानाच्या जर्मन अभ्यासकांसंबंधीची माहितीही अंतर्भूत आहे. या हिंदी ग्रंथाला मध्य प्रदेश सरकारने अहिंदी प्रांतात प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून १९६७ मध्ये पारितोषिक दिले.

सन १९६९मध्ये त्यांच्या प्राचीन भारतीय स्थलकोशाचा पहिला खंड प्रकाशित झाला. हा भारताच्या सांस्कृतिक भूगोलाचा ज्ञानकोश आहे. पार्गीटर, मॅक्किनडल, फ्लीट या परदेशी भूगोलकारांप्रमाणे डॉ. नंदलाला डे, डॉ. विमलाचरण लॉ यांसारख्या एतद्देशीय भूगोलकारांच्या साहित्याचा सुवर्णमध्य साधून या कोशात प्राचीन भारतातील भौगोलिक स्थलांचे साधार व सुबोध वर्णन आहे. या कोशाची १०१ पानांची प्रस्तावना ही चित्रावशास्त्री यांच्या सांस्कृतिक भूगोलविषयक व्यापक, परंतु चिकीत्सक दृष्टीकोनावर प्रकाश टाकणारी आहे. प्राचीन भारतातील विभिन्न नैसर्गिक, प्रादेशिक आणि राजकीय उपविभागांचे या कोशातले वर्णन हे आणखी एक विलोभनीय वैशिष्ट्य. भौगोलिक स्थलांच्या प्राचीन व आधुनिक नावांबरोबर त्यांचे आधुनिक महत्त्व सांगण्याची कोशकारांची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. विराट भारतवर्षाच्या सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवणार्या या कोशाचा दुसरा खंड दुर्दैवाने प्रकाशित झालेला नाही. तात्पर्य, संशोधनाच्या क्षेत्रात संशोधनासाठी संशोधन ही विशुद्ध ज्ञानोपासना करण्याची प्रवृत्ती व संशोधनातही राजकीय व सामाजिक प्रगतीचा आलेख आवश्यक मानण्याचा दृष्टीकोन या दोन्हींचा सुंदर संगम व जुन्या पठडीच्या विद्वानांची सूक्ष्मता आणि आधुनिक विद्वानांची ऐतिहासिक चिकीत्सा पद्धती यांचा मनोज्ञ मेळ आपल्या नव्वद वर्षांच्या दीर्घोद्योग व व्यासंग यांनी समन्वित असलेल्या आयुष्यात घडवून आणणाऱ्या .. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचे कार्य मराठीत अद्वितीय मानावे लागेल.

संपादित

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].