Skip to main content
x

चमणकर, नारायण महादेव

          लोद्यानाची वाढ झाल्यास कोकण क्षेत्राचा आर्थिक विकास शक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्या दृष्टीने कोकणचा अभिमान असणाऱ्या आंबा या पिकाचा विकास करण्याचा ध्यास नारायण महादेव चमणकर यांनी घेतला. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात मौजे उभादांडा या गावी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी ५ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनीत ५५० कलमांची लागवड केली व शास्त्रोक्त पद्धतीने आंब्याच्या बागेची निगा राखली. चमणकर यांनी जिल्हा लोकल बोर्डावर प्रतिनिधी म्हणूनही काम केले. ते १९५७मध्ये आमदार म्हणून निवडून आले. वेंगुर्ला येथील आंबा संशोधन केंद्र उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रत्येक शेतकऱ्याने आंब्यांची २५ कलमे लावावीत; म्हणून गावोगावी फिरून लोकांना प्रवृत्त करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. अशा प्रकारच्या प्रसाराने ५-६ वर्षांत कोकणातील आंबा लागवड वाढत गेली व लोकांचा आर्थिक विकास साधला गेला. ज्या क्षेत्रात आंब्याचे एकही झाड नव्हते, तेथे आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या, त्याचे श्रेय चमणकर यांच्या प्रसारकार्याला द्यावे लागते.

          चमणकर यांचा १९७२मध्ये ग्रामस्थांनी सत्कार केला व त्यांना ‘आंबासम्राट’ ही पदवी बहाल केली. शासनाने त्यांना १९७४मध्ये ‘उद्यानपंडित’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच कोकण कृषी विद्यापीठाने त्यांना ‘कृषिरत्न’ पदवी देऊन गौरवले.

          महाराष्ट्रात १९८२मध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या संपात बेरोजगार झालेल्या कामगारांना, चमणकर यांनी शासनाच्या कर्जयोजनांतर्गत आंबा लागवड करण्यास प्रवृत्त करण्याचे व त्यांना पोटापाण्याचा उद्योग मिळवून देण्याचे थोर कार्य केले.

- संपादित

चमणकर, नारायण महादेव