Skip to main content
x

चुट्टिवंस, नंदना

        नंदना चुट्टिवंस यांचा जन्म थायलंडमधील बँकॉक येथे झाला. १९५९ साली त्यांनी पुरातत्त्व विद्येच्या अध्ययनाला बँकॉक सिल्पको विद्यापीठात सुरुवात केली. १९६३ साली त्यांनी पुरातत्त्व विद्येत पदवी प्राप्त केली. याच वर्षी त्यांनी नेदरलॅण्ड्सच्या शिक्षण मंत्रालयातर्फे अॅम्स्टरडॅम विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन आर्किऑलॉजीया संस्थेत अध्ययनासाठी शिष्यवृत्ती मिळविली. त्यांनी पदव्युत्तर पदवी भारतीय व इराणी भाषा आणि संस्कृती (Indian-Iranian Languages and Culture) या विषयात अॅम्स्टरडॅम विद्यापीठातून घेतली. यापुढील त्यांचे योगदान मात्र बौद्ध विद्येच्या क्षेत्रात आहे. त्यांनी नेदरलॅण्ड्समधील लायडन (University of Leiden) विद्यापीठातील दक्षिण व आग्नेय आशियातील अवलोकितेश्वराचे मूर्तिशास्त्र’ (The Iconography of Avalokite’svara in Mainland South East Asia) या विषयावर पीएच.डी. संपादन केली.

१९६८ पासून त्या इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन आर्किऑलॉजीत संशोधनकार्यात व विविध पदांवर कार्यरत आहेत. आजमितीस त्या अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांवर कार्यरत आहेत. त्यांचे विशेष संशोधन हे बौद्ध कला आणि पूर्व व दक्षिण आशियातील सांस्कृतिक संबंध या संदर्भातील असून त्यांनी भारतीय कला, आग्नेय आशियातील बौद्ध कला व श्रीलंकेतील कला या विषयांवरील संशोधनात विशेष योगदान दिले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध व ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध; ग्रंथ म्हणून प्रकाशित झाल्यावर विद्वानांनी त्यांच्या कार्याची वाखाणणी केली. त्यानंतर त्यांनी बौद्ध देवता मैत्रेय याच्या मूर्तिशास्त्रावर Buddha of the Future: an early Maitreya from Thailand हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या अनेक ग्रंथांपैकी आग्नेय आशियावरील ‘Ancient Trades and Cultural Contacts in South-East Asia’ ‘Indonesian Brozes in the Domela Nieuwenhuis on Form and Function’हे दोन ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुराविद डॉ. रोलॅण्ड सिल्वा यांच्या गौरव ग्रंथाचे संपादन केले. डॉ. नंदना चुट्टिवंस यांच्या पुरातत्त्व कलैतिहास आणि सांस्कृतिक अध्ययन या विषयांतील विशेष योगदानाबद्दल जगभरातील विद्वानांनी अभिनंदनमालानावाचा त्यांचा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित केला.

प्राची चौधरी

चुट्टिवंस, नंदना