Skip to main content
x

चव्हाण, कारभारी काशिनाथ

           कारभारी काशिनाथ चव्हाण ऊर्फ काका चव्हाण यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील खडकी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव शारदाबाई होते. वडिलांची फक्त विहिरीवर अवलंबून असलेली एक एकर शेती होती. परिणामी, चरितार्थासाठी या कुटुंबाला रोजंदारीवर शेतमजूर म्हणून काम करणे अपरिहार्य होते. कारभारी यांच्या घरातले सगळेच अशिक्षित होते. वडिलांनी कारभारींना चवथीपर्यंत असलेल्या स्थानिक शाळेत दाखल केले.

      पुढील शिक्षणासाठी ते शाळेसाठी मालेगावात आले. काकांची आर्थिक क्षमता नसल्याने मालेगावच्या शिक्षकांनी त्यांची फी भरून वसतिगृहाच्या दैनंदिन कामाच्या मोबदल्यात विमुक्त मुलांच्या वसतिगृहात राहण्याची सोय केली. हे वसतिगृह शाळेपासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने काकांना रोज आठ किलोमीटर अंतर चालावे लागत असे. प्रतिकूल परिस्थितीतही काका जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. मुळातच संशोधनाची आवड असल्याने काकांनी रोजच्या पायी चालण्याचा उपयोग निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी केला. या शोधवृत्तीचा फायदा त्यांना शासकीय वनसेवेत झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी  पाचशे रुपये कर्ज काढून काकांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कृषी विषयात बी. एस्सी. पदवी घेतल्यानंतर पदवीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून चव्हाणांनी भाऊसाहेब हिरे यांच्या शेतकी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. या काळात डेहराडूनच्या संस्थेत त्यांची निवड होऊन ते १९६१ मध्ये वनसेवेत रुजू झाले.

       चव्हाणांनी अनेक छोटे पण सर्वांगांनी समाजोपयोगी प्रकल्प कार्यान्वित केले. त्यांची निरीक्षण वृत्ती आणि त्यावर आधारित संशोधनाची आवड यांमुळे त्यांनी अनेक उपकरणांचा विकास केला.

       ग्रामीण भागात आजही जळणाचे इंधन म्हणून बेकायदेशीर जंगलतोड झाल्याने वनांचा ऱ्हास होतो. यावर ‘वनज्योती शेगडी’ हा उत्तम पर्याय चव्हाणांनी विकसित केला. एका पत्र्याच्या पिंपात ही शेगडी बनवली जाते. या शेगडीच्या मध्यावर एक पी.व्ही. सी. पाइप उभा केला जातो. पाइपाभोवती पालापाचोळा घट्ट दाबून बसवला जातो. नंतर पाईप काढून शेगडीच्या खाली असलेल्या छिद्रात पेटते लाकूड घालून शेगडी प्रज्वलित केली जाते. या शेगडीवर बरेच तास स्वयंपाक करूनही आतला पालापाचोळा बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहतो.

       चंद्रपूर जिल्ह्यात सागाच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पारंपरिक पद्धतीने ही लागवड करणे हे अतिशय त्रासदायक काम असते. काका चव्हाणांची १९७७ मध्ये चंद्रपूरला नियुक्ती झाली आणि त्यांनी हे काम अगदी सोपे करण्याचा उपाय शोधून काढला. मोठे खड्डे खणून लागवड करण्याऐवजी छोट्या खड्ड्यांसाठी त्यांनी इंग्रजी ‘एफ’ आकाराचे उपकरण तयार केले. हे उपकरण जमिनीत खोचायचे आणि धग देऊन ते जमिनीत दाबायचे व त्याने तयार झालेल्या खड्ड्यात सागाची रोपे किंवा बियाणे पेरायचे असे हे तंत्र विकसित झाले. परिणामी, जुन्या पद्धतीने एक कामगार दिवसाला जर तीनशे रोपे लावत असेल, तर नवीने तंत्राने हाच आकडा सहाशेच्या वर गेला.

        लागवडीसाठी असलेल्या रोपांची लगेच लागवड केली नाही तर ती वाळून जातात. यावर काका चव्हाणांना शेतकऱ्यांच्या  एका गटाकडून अचानक उपाय मिळाला. हा गट रोपांना हळद, कापूर आणि हिंग यांचे मिश्रण केलेल्या पाण्यात रोपे भिजवून काढत असे, ज्यामुळे ती खूप दिवस ताजीतवानी राहत. काकांनी याचा उपयोग औरंगाबादला केला आणि हजारो रोपे लावली. आजही त्यांचे हे क्षेत्र हिरवेगार दिसते.

       बुलढाण्याला त्यांनी जनावरांचे खाद्य असलेल्या गवताचे उत्पादन वाढवले आणि राज्याची मागणी पूर्ण करून तिथले गवत दुष्काळग्रस्त गुजरातला पुरवले. यात आर्थिक फायदा तर  झालाच; पण स्थानिक लोकांनाही चांगले उत्पन्न मिळाले.

       शासनाने काकांची बदली गोंदियाला केली. गोंदिया हा घनदाट जंगलाचा भाग! तिथे फार मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत होती. तातडीचा उपाय म्हणून त्यांनी फिरत्या जीपने गावांत जाऊन ध्वनिवर्धक लावून ‘जंगल तोडू नका’ असे आवाहन ग्रामस्थांना केले. हा उपक्रम ‘वनवाणी’ म्हणून नावाजला गेला.

      याच भागातल्या कोळसा खाणींना उत्पादन प्रक्रियेचा भाग म्हणून बांबूच्या चटयांची जरूर भासे. उत्पन्नाचे एक साधन या अनुषंगाने स्थानिक जनता अशा चटया विणून पुरवठा करत असे. चटयांसाठी बांबू आवश्यक असल्यामुळे जंगलात भरमसाठ अनधिकृत बांबूतोड होत असे. काकांनी लोकांना अधिकृतरीत्या तोडणीला आलेला बांबू पुरवला. तसेच लोकांना चटया विणण्यासाठी मिळणारी मजुरी प्रति चौरस फूट ६ पैशांवरून २२ पैसे करून दिली. विशेष नोंद करण्याजोगी बाब म्हणजे काकांच्या या प्रयोगामुळे वनउत्पादनाच्या कायदेशीर यादीत चटयांचा समावेश झाला. त्याआधी फक्त बांबू हेच वनउत्पादन समजले जात होते.

       काका चव्हाण यांनी प्रशासकीय सेवेत दिलेली योगदानाची यादी मोठी आहे. आता देशभर माहीत झालेले ‘सुबाभूळ’ या नगदी पिकाच्या पहिल्या लागवडीचे श्रेय चव्हाणांचे आहे. एकदा वनखात्याकडे सागाची पन्नास लाख रोपे जास्तीची होती. काकांनी ती लोकांना फुकट वाटली आणि जिथे शक्य आहे तिथे ती लावण्यासाठी लोकांना उद्युक्त केले. परिणामी, अनेकांनी स्वत:च्या जमिनीवर पारंपरिक पिकाऐवजी सागाची लागवड केली. आज लोकप्रिय झालेली ‘सामाजिक वनीकरणा’ची कल्पनाही त्यांचीच आहे. सामाजिक वनीकरणाच्या वनखात्यातील वेगळ्या विभागाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डोंगर उतारावर चर खणून “पाणी अडवा, पाणी जिरवा” या चळवळीचा पायाही चव्हाणांनी घातला. एकूणच आपल्या शासकीय सेवाकालात आंतरिक विरोध पत्करूनही वनखात्यात अनेक नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणून काका चव्हाण सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक या पदावरून १९९५ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही काका चव्हाण प्रचंड सक्रिय आहेत. पुण्याजवळ भोसरी हे काकांचे वास्तव्याचे ठिकाण आहे; पण नाशिक परिसर हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. घरगुती औषध पद्धतीतल्या शिवांबू, आवळा लागवड आणि गुळवेल, आजपर्यंत दुर्लक्षित, अशा औषधी वनस्पतींचा प्रचार करण्याचे कार्य सध्या ते करत आहेत.

      - सुधाकर कुलकर्णी

चव्हाण, कारभारी काशिनाथ