Skip to main content
x

चव्हाण, उषा

      षा चव्हाण यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या गावी झाला. चित्रपटात येण्याअगोदर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती. पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या. ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ हे त्यांचे अरुण सरनाईक यांच्याबरोबर काम असणारे नाटक गाजले होते. नायिका म्हणून ‘केला इशारा जाता जाता’ (१९६५) या पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्यकौशल्याने साऱ्या प्रेक्षकवर्गाला जिंकले होते.
    उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला, हा निव्वळ योगायोग होता. अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्यसमूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली. उषा चव्हाण या आधी ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरसमध्ये नाचल्या होत्या.
     अनंत माने यांनी जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारले, तेव्हा ‘मागच्यासारखं नाचाचं काम असणार ना? पण या वेळी मी दिवसाला १५ रुपये घेऊन काम करणार नाही. २० रुपये घेईन’ असे बजावले. त्यावर माने म्हणाले, ‘अगं, तुला या वेळी मागे नाचायचं नाही, तुला या चित्रपटात नायिका म्हणून काम करायचं आहे.’ या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली. महाराष्ट्र शासनाने पाचव्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक देऊन गौरवले होते. पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात हा चित्रपट ७० आठवडे चालला होता.
    ‘केला इशारा जाता जाता’च्या यशामुळे उषा चव्हाण यांना चित्रपटातून भराभर कामे मिळत गेली. ‘खंडोबाची आण’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘अशी रंगली रात्र’, ‘कोर्टाचा पायरी’ यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि अचानक ‘सोंगाड्या’च्या रूपाने त्यांना वेगळीच संधी मिळाली. ‘सोंगाड्या’त प्रथम जयश्री गडकर काम करणार होत्या. पुढे त्यांनी भूमिका करण्यास नकार दिला आणि उषा चव्हाण यांच्याकडे ‘सोंगाड्या’ चित्रपट आला. अर्ध्या विजारीमधल्या बावळट नायकाचा ‘सोंगाड्या’ हा सुवर्णमहोत्सवी चित्रपट ठरला. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपटावर पैशाचा पाऊस, असे समीकरण झाले.
    ‘सोंगाड्या’ (१९७१) पाठोपाठ आला ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७१). उषा चव्हाण यांनी त्यात उत्कृष्ट अभिनय आणि नृत्ये केली होती. हा चित्रपटही सुवर्णमहोत्सवी ठरला. ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘राम राम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८), ‘आली अंगावर’, ‘मुका घ्या मुका’ (१९८७), ‘पळवापळवी’ (१९९०), ‘येऊ का घरात’ (१९९२), ‘सासरचं धोतर’ (१९९४), ‘वाजवू का?’ हे दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीचे चित्रपट गाजले.
     प्रसिद्ध कलाकार गणपत पाटील यांच्याबरोबर ‘सख्या सजणा’ चित्रपटात काम करून चित्रपटात रूढ अर्थाने ‘नायक’ नसतानाही चित्रपट गाजू शकतो, हे उषा चव्हाण यांनी स्वत:च्या अभिनयाने आणि नृत्यकलेने दाखवून दिले. निळू फुले यांच्याबरोबर ‘सोनारानं टोचलं कान’ आणि ‘थापाड्या’ या चित्रपटांतून त्यांनी आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले. ‘रानपाखरं’ चित्रपटात उषा चव्हाण यांच्या कसदार अभिनयाचे दर्शन घडले होते. या चित्रपटासाठी त्यांना मानसन्मानही मिळाले. ‘शिर्डी के साईबाबा’, ‘तेरे मेरे बीच में’, ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले. ‘चुडा तुझा सावित्रीचा’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘करावं तसं भरावं’, ‘वरात’, ‘चोरीचा मामला’, ‘दगा’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘कलावंतीण’, ‘चांडाळ चौकडी’, ‘चोरावर मोर’, ‘मंत्र्याची सून’, ‘पैज’, ‘जिद्द’, ‘गनिमी कावा’, ‘मोसंबी नारिंगी’ (१९८१), ‘भामटा’ (१९८२), ‘डाळिंबी’, अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत.
    उषा चव्हाण यांना ‘केला इशारा जाता जाता’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ आणि ‘चोरावर मोर’ या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत. त्यांनी ‘गौराचा नवरा’ आणि ‘धरपकड’ अशा दोन चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.

      -  अभिजित पेंढारकर

 

चव्हाण, उषा