Skip to main content
x

चव्हाण, विजय

       विद्यार्थिप्रिय असलेल्या, सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवलेल्या आणि सदा हसतमुख असलेल्या विजय चव्हाण यांचा जन्म विजयादशमीच्या शुभदिवशी झाला. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत शिक्षण, संशोधन, विस्तार व प्रशासकीय विभागांत त्यांनी अनेक मानाची पदे भूषवली. इतकेच नाही तर या पदावर यशस्वीरीत्या उत्तम काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवण्यातही विजय चव्हाण यशस्वी झालेले दिसतात.

       संशोधक म्हणून विजय चव्हाण यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. कर्नाटकातील ज्वारीच्या प्रकारांचे वर्गीकरण करून सुधारित वाण त्यांनी विकसित केले. त्याचप्रमाणे भाताचे अधिक उत्पादन देणारे वाणही त्यांनी विकसित केले. युद्धानंतरच्या काळात पिकांचे पैदासकार व मुंबई राज्यातील कृषी विभागाचे प्रमुख या नात्याने अन्नधान्याची पिके, गळीत व तेलबियांची पिके यासंबंधीच्या संशोधन योजनांची पुनर्रचना करून त्याला यथोचित रूप देण्याचे महत्त्वाचे काम प्रा. विजय चव्हाण यांनी केलेले आहे. या काळात त्यांनी सहकाऱ्यांबरोबर लिहिलेले ६० शोधनिबंध शास्त्रीय नियतकालिकांनी प्रसिद्ध केल्याचेही पाहण्यात येते. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षक म्हणून त्यांना मान्यता दिली होती. ‘इंडियन जर्नल ऑफ जेनेटिक्स अ‍ॅण्ड प्लँट ब्रीडिंग’ या राष्ट्रीय स्तरावरच्या शास्त्रीय नियतकालिकाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

       आदर्श शिक्षक म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी झाली. वनस्पतिशास्त्राचे शिक्षक म्हणून ते विद्यार्थिप्रिय होते. त्यांचे विद्यार्थी त्यांनी शिकवलेल्या सिद्धांताचा व प्रयोगांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. ते विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करून त्यांच्या अडचणी दूर करण्यास तत्पर असत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मताप्रमाणे त्यांचे माणूस म्हणून वर्णन करण्यास शब्दच अपुरे आहेत. संपूर्ण विभागात हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून प्रेम मिळालेले बहुधा ते एकटेच असावेत. प्रा. विजय चव्हाण हे आपल्या शैक्षणिक व संशोधन कार्याबरोबर टेनिस, शिकार व नेमबाजी यातही पारंगत होते, असे दिसते.

- डॉ. मुकुंद दत्तात्रेय भागवत

चव्हाण, विजय