Skip to main content
x

चव्हाण, विश्वास रामराव

            विश्‍वास रामराव चव्हाण यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील वाणेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४२ एकर जमीन होती. त्यांचे शिक्षण एस.एस.सी.पर्यंत झालेले असून, त्यांनी १९६७पासून शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी १९७०मध्ये विहिरीवर पहिला पंप बसवला व तेव्हापासून ओलिताखाली मिरची, कारले, काकडी, वांगे यांसारखी भाजीपाल्याची पिके घेण्यास सुरुवात केली. त्यांनी १९७२मध्ये ओलीत भरपूर असल्यामुळे केळी लावण्याचा प्रयत्न केला व ५०० केळीची झाडे लावली. त्यातून त्यांनी केळीचे आदर्श उत्पन्न घेतले. तसेच सीडप्लॉट घेणेही सुरू केले व त्याचा परिणाम म्हणून त्यांना १९९०मध्ये शेतिनिष्ठ पुरस्कार मिळाला.

            चव्हाण यांच्याकडे १०२ एकर जमीन आहे व त्यामध्ये त्यांनी ८ विहिरी खोदल्या असून, त्यावर ११ मोटर पंप कार्यरत आहेत. त्यांनी वनशेतीमध्ये सागवानाची लागवड केलेली आहे. तसेच केळी, ऊस, संत्रा, मोसंबी, चिकू, आंबा व सीताफळ या फळझाडांचीदेखील मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. ते हळदीची लागवडही करतात व सर्व पिके अत्यंत उत्तम रीतीने जोपासण्यात त्यांना यश मिळालेले आहे.

            चव्हाण आपली सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करतात.  त्यांनी ठिबक सिंचन (स्प्रिंकलर) पद्धतीचा वापर करून ४० एकर जमीन ओलिताखाली आणली.

             चव्हाण यांनी उसाच्या लागवडीमध्ये टरबूज लावण्याचाही प्रयोग सुरू केला. त्यांनी १० एकर उसामध्ये शुगर बेबी या टरबुजाच्या जातीची लागवड केली व त्यांना टरबुजापासून १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नंतर त्यांनी टरबुजाचे वेल उपटून त्याचे कंपोस्ट खत तयार केले आणि उसामध्येच हे खत टाकले. अशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांची पुढील पिढी शेतीमध्येच काम करायला लागलेली आहे. त्यांची शेती पाहून त्यांना महाराष्ट्र सरकारने कृषिभूषण पुरस्कार मा. राज्यपाल फजल यांच्या हस्ते दिला आहे.

- प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर

चव्हाण, विश्वास रामराव