दाभाडे,मुरलीधर नारायण
मुरलीधर नारायण दाभाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील वायुबोध येथे झाला. ते विज्ञान शाखेचे पदवीधर असून ते दूरसंचार खात्यामधून अधिकारी पदावरून निवृत्त झाले . त्यांनी चांदुर रेल्वे भागामध्ये वायुबोध येथे ४० हेक्टर शेती घेतली , त्यापैकी २ हेक्टरमध्ये त्यांनी अंजिराची फळबाग लावली. अंजीर उत्पादन करून अंजिरे विकण्याचा छंद त्यांनी जोपासला व त्यांनी अंजिरापासून आंतरराष्ट्रीय दर्जाची वाइन तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. विदर्भामध्ये अंजीर उत्पादन करणे, ही अपवादात्मक बाब आहे. या मानसिकतेला छेद देऊन त्यांनी अंजीर बाग फुलवण्याचे धाडस केले. विदर्भामध्ये अंजीर बाग फुलवणारे ते एकमेव बागायतदार ठरले . अंजीरापासून वाइन करण्याच्या दृष्टीने त्यांनी जून २००९मध्ये अमेरिका व दुबई येथे जाऊन आंतरराष्ट्रीय वाइन प्रदर्शनीमध्ये भाग घेतला . अंजिरापासून वाइन तयार करणे शेतीला पूरक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी वाइनचे नमुने पुणे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना पाठवले आणि ती उत्कृष्ट असल्याचा अहवाल त्यांच्याकडून प्राप्त करून घेतला आहे.