Skip to main content
x

दाजी, जमशेद अर्देशीर

      मशेद अर्देशीर दाजी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणही मुंबईतच झाले. १९१४मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून प्रिव्हिअस परीक्षा देऊन १९१६मध्ये ते पुण्याच्या कृषी महाविद्यालयात दाखल झाले. १९१९मध्ये बी.एजी. पदवी घेतल्यावर ते त्याच महाविद्यालयात मदतनीस म्हणून १९२६पर्यंत कार्यरत राहिले. या मुदतीत त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील बी.एस्सी. व कृषि-रसायनशास्त्रातील एम.एस्सी. पदवी धारण केली. याच काळात त्यांनी जमिनीतील नत्रावर संशोधन केले. त्यांच्या ‘पश्‍चिम मुंबई इलाख्यातील कागदनिर्मितीचा विकास’ या विषयावर लिहिलेल्या निबंधास मुंबई विद्यापीठाचे अ‍ॅशबेरर पारितोषिक मिळाले. १९२६मध्ये कृषि-रसायनशास्त्रज्ञ पुणे यांच्या विभागात वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक या पदावर त्यांची नेमणूक झाली. नंतर सिंधमध्ये साक्रंद येथे मृदा-भौतिकशास्त्रज्ञ या पदावर त्यांनी काही काळ काम केले. १९२९मध्ये त्यांना एदुलजी दस्तूर शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते रोथॅमस्टेड प्रयोग केंद्र, या प्रसिद्ध ब्रिटिश मृदा संशोधन संस्थेत संशोधनासाठी दाखल झाले. तेथे ‘हिरवळीच्या खतांचे जमिनीतील विघटन’ या विषयावर डॉ. एच.एच. मॅन व ई.एच. रिचर्डस् यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले व या संशोधन प्रबंधास १९३२ मध्ये लंडन विद्यापीठाची पीएच.डी. त्यांना प्राप्त झाली. भारतात परतताच त्यांची कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर येथे साहाय्यक संशोधक म्हणून नेमणूक झाली. अवर्षणप्रवण भागातील जमिनी व क्षारयुक्त जमिनीवर त्यांनी तेथे संशोधन केले व त्यांचे अनेक लेख नामांकित संशोधन नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. १९३६मध्ये ‘मुंबई सरकारचे कृषि-रसायनशास्त्रज्ञ’ या पदावर ते रुजू झाले व १९४९पर्यंत त्या पदावर राहून पुणे कृषी महाविद्यालयात पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण, संशोधन व सरकारचे शास्त्रीय तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले. त्यांचे २५पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत व अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. मुंबई व भारत सरकारच्या अनेक शास्त्रीय समित्यांवर त्यांनी काम केले. ‘मृदाशास्त्राचे पाठ्यपुस्तक’ म्हणून त्यांनी लिहिलेले भारत व मुंबई राज्यातील संशोधन साहित्याचे दाखले दिलेले पाठ्यपुस्तक कृषि-रसायनशास्त्र व मृदाशास्त्राच्या अनेक पिढ्या अभ्यासत आहेत. १९४९ ते १९५२ दरम्यान मुंबई राज्याचे कृषि-उपसंचालक (संशोधन व शिक्षण) या पदावर काम करून ते सेवानिवृत्त झाले. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

- प्रा. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

दाजी, जमशेद अर्देशीर