Skip to main content
x

डांगे, सिंधू सदाशिव

     सिंधू सदाशिव डांगे यांचे पूर्वाश्रमीचे नाव सिंधू पागे होते. त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. उत्तम शालेय कारकिर्द असणाऱ्या त्यांनी १९५५ मध्ये मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात स्नातक (बी.ए.) प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यांना भाऊ दाजी पुरस्कार आणि गजानन आचार्य पुरस्कार प्राप्त झाले. १९५७ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत विषयात अधिस्नातक (एम.ए.) पदवी द्वितीय क्रमांकाने प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘फोक एलिमेंट इन द भागवत पुराण’ या विषयावरील प्रबंध लिहून त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही पदवी नागपूर विद्यापीठाकडून संपादन केली. वैदिक वाङ्मय, वैदिक कर्मकांड, धर्मशास्त्र आणि पुराणे हे त्यांच्या आवडीचे विषय. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातून त्या आर. जी. भांडारकर प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ अध्ययन-अध्यापनाला वाहून घेतले.

     डॉ. सिंधू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विविध जगप्रसिद्ध माहितीकोश (एन्सायक्लोपीडिया) उदा. एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम, द्रविडियन एन्सायक्लोपीडिया तसेच प्रोजेक्ट ऑफ हिस्ट्री ऑफ इंडियन सायन्स, फिलॉसॉफी अँड कल्चर, भारतीय समाज विज्ञान कोश, हिंदू-ख्रिश्चन डिक्श्‍नरी यांमधून डॉ. सिंधू डांगे यांनी विविध विषयांवर विस्तृत नोंदी लिहिल्या आहेत.

     अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद या परिषदांमध्ये, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये बीजभाषणकार, विभागीय अध्यक्ष, सत्राध्यक्ष तसेच शोधनिबंधवाचक अशा पातळ्यांवर त्यांनी योगदान दिलेले आहे. विदर्भ संशोधन मंडळ -  नागपूर, संस्कृत आणि प्राकृत भाषा विभाग — पुणे विद्यापीठ, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, राजस्थान विश्वविद्यालय — जयपूर, एशियाटिक सोसायटी — मुंबई अशा अनेक नामवंत संस्थांमधून निमंत्रणावरून डॉ. सिंधू सदाशिव डांगे यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत.

     डॉ. सिंधू डांगे यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे १९९६ मध्ये सन्मान; महाराष्ट्र राज्य शासनातर्फे १९९७ मध्ये सन्मान व पुरस्कार; मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे राष्ट्रीय संस्कृत संस्थानमार्फत सन्मान व पुरस्कार (२०००); स्वाध्याय मंडळ पार्डी, गुजरात यांच्यातर्फे २००४ मध्ये सन्मान; श्रीमान बस्तीरामजी सारडा सद्गुरू श्री गंगेश्वरानंद प्रतिष्ठान, नाशिक यांच्यातर्फे २००४ मध्ये श्री गुरू गंगेश्वरानंद वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्कार; २००५मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून दिला जाणारा सन्माननीय राष्ट्रपती पुरस्कार; २००५ मध्ये एशियाटिक सोसायटी मुंबईकडून २००३ ते २००६ या कालावधीतील प्रकाशित पुस्तकांकरिता रजत पदक; कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूर यांच्यातर्फे २०१२ मध्ये ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी प्राप्त. हे त्यापैकी काही उल्लेखनीय सन्मान व पुरस्कार. अनेक नामांकित शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांचे सन्माननीय आजीव सदस्यत्व.

     डॉ. सिंधू डांगे यांची ग्रंथसंपदा -

     १) ‘क्रिटिक्स ऑन संस्कृत ड्रामाज’ - (दुसरी सुधारित आवृत्ती), १९९४, (सहलेखक - सदाशिव अंबादास डांगे), २) ‘भारतीय साहित्याचा इतिहास’ भाग १ - १९७५, ३) ‘बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान’ (दुसरी आवृत्ती) - २००८, ४) ‘जैन धर्म आणि तत्त्वज्ञान’ (दुसरी आवृत्ती) - २०१३, ५) ‘द भागवत पुराण - मायथो सोशल स्टडी’ - १९८४ , ६) ‘हिंदू डोमेस्टिक रिच्युअल्स - अ क्रिटिकल ग्लान्स’- १९८५, ७) पुराणिक एटीमॉलॉजीज अँड फ्लेग्झिबल फॉर्म्स - १९८९, ८) ‘आस्पेक्ट्स ऑफ स्पीच इन वेदिक रिच्युअल’ - १९९६, ९) ‘वेदिक बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस थ्रू अर्थवाद’ - खंड १- २००५, १०) ‘वेदिक बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस थ्रू अर्थवाद’ - खंड २ - २००५. ११) ‘रिव्हीलिंग डीपर मीनिंग्ज - नॅरेटिव्हज् फ्रॉम वेद टु पुराणाज्’ - २०१६.

संपादित पुस्तके —

     १) ‘मिथ्स ऑफ क्रिएशन’ - १९८५, २) ‘सॅक्रिफाईस इन इंडिया — कन्सेप्ट अँड इव्होल्युशन’ - १९८६, ३) ‘अल्टिमेट इन एन्शियण्ट इंडियन थॉट अँड डिसिप्लिन’ - १९८७, ४) ‘ग्लिनिंग्स फ्रॉम वेदिक टू पुराणिक एज’ - २००२, ५) ‘अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास’ -२००४.

     लिखित व संपादित पुस्तकांसोबत काही ग्रंथांची डॉ. सिंधू डांगे यांनी केलेली समीक्षणेही प्रकाशित झाली आहेत. त्यांचे १६७ पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

डॉ. गौरी माहुलीकर

डांगे, सिंधू सदाशिव