Skip to main content
x

दास्तीदार, प्रज्ञोत रेवतीरंजन

      प्रज्ञोत रेवतीरंजन दास्तीदार यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते पश्चिम बंगाल येथील कलकत्ता (कोलकाता) या शहरात स्थायिक झाले होते. आपले शिक्षण पूर्ण करून दि. २४ डिसेंबर १९५७ रोजी प्रज्ञोत दास्तीदार हे भारतीय वायुसेनेत फ्लाइट लेफ्टनंट या हुद्द्यावर रुजू झाले.
       १९६५ च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानातील पेशावर येथील विमानतळावर मोठा बंदोबस्त तैनात होता.  दि. १५ सप्टेंबर १९६५ या दिवशी फ्लाइट लेफ्टनंट प्रज्ञोत दास्तीदार यांना लक्ष्यावर मारा करणाऱ्या विमानांना मार्गदर्शन  करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांना कडक बंदोबस्तातील पेशावर विमानतळावर मोठा हल्ला करायचा होता.
      त्या वेळी आजूबाजूच्या वातावरणामुळे फारसे दिसतही नव्हते. प्रत्यक्ष विमानतळाच्या वर आल्याशिवाय काहीही स्पष्ट होत नव्हते. खालचा भूभाग स्पष्ट बघण्यासाठी त्यांनी प्रकाशझोत टाकल्याबरोबर खालून विमानविरोधी तोफा धडाडू लागल्या. पण खालच्या तोफांना, गोळीबाराला न जुमानता ते तसेच पुढे जात राहिले व मागच्या लढाऊ विमानांना मार्ग दाखविला.
      त्या तशा हल्ल्यातच ते परत वळले व जेथे बॉम्ब टाकायचा होता, ती जागा नीट पाहून त्याची माहिती, त्यांनी आपल्या मागच्या लढाऊ विमानांना दिली. जेव्हा त्या विमानांच्या म्होरक्याला माहिती नीट समजली आहे अशी खात्री झाल्यावरच ते तेथून दूर गेले.
      या आणि अशा पुढील सात कामगिऱ्यांमध्ये फ्लाइट लेफ्टनंट प्रज्ञोत दास्तीदार यांनी शौर्य व कौशल्य दाखविले. या त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना ‘वीरचक्र’ बहाल करण्यात आले. नंतर ते स्क्कॉड्रन लीडर या पदापर्यंत पोहोचून निवृत्त झाले.
-संपादित

दास्तीदार, प्रज्ञोत रेवतीरंजन