Skip to main content
x

दातार, दामोदर केशव

दामोदर केशव दातार यांचा जन्म कुरुंदवाड संस्थानातील नरसोबाची वाडी येथे झाला. वडील केशवराव दातार गायनाचार्य पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या सान्निध्यात होते. पं. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्याच वेळी बाळकृष्णबुवांकडे विद्याध्ययन करीत होते. केशवराव आणि विष्णू दिगंबर हे गुरुबंधू होते. कालांतराने विष्णू दिगंबर यांनी केशवराव दातार यांची नियुक्ती मुंबईतील गांधर्व महाविद्यालयाच्या संचालक पदावर केली. त्यामुळे दातार कुटुंबीय १९१४ ते १९१८ च्या दरम्यान मुंबईत वास्तव्यास राहिले.

दामोदर दातारांचे पितृछत्र लहानपणीच हरपल्याने थोरले बंधू नारायणराव दातार यांनी सर्व कुटुंबाची जबाबदारी घेतली. नारायणराव दातार हे संगीत शिक्षक होते. लहानपणीच नारायण दातारांकडून दामोदर दातारांवर गाण्याचे संस्कार झाले. दामोदर यांनी व्हायोलिन शिकावे ही नारायणरावांची इच्छा होती. गिरगावमधील ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ मध्ये पं. विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडे त्यांचे व्हायोलिन शिक्षण रीतसर सुरू झाले. त्याचबरोबर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होते.

त्यांनी विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडे सलग १०-११ वर्षे शिक्षण घेतले. वादनातील सातत्यता, अतूट  स्वरोत्पादन, त्याचबरोबर गजाचा संथपणा व ओघ या वैशिष्ट्यांचा त्यांनी पाठपुरावा केला. विघ्नेश्वर शास्त्रींनी व्हायोलिनवादनाचा पाया पक्का करून घेतला. याबरोबरच त्यांना थोरल्या बंधूंचे अमोल मार्गदर्शन लाभले. त्या वेळच्या अनेक प्रथितयश गायक-गायिकांची गाणी ऐकण्याकरिता ते दामोदरांना घेऊन जात व त्यांच्या गायनातील मर्म उलगडून दाखवत. त्यामुळे वादन हे गायन अंगानेच प्रस्तुत व्हायला हवे ही भूमिका त्यांच्या मनात पक्की झाली.

पं. द.वि.पलुसकर हे दातारांचे मामा होते. ते कार्यक्रमाला येत तेव्हा गिरगावात, दातारांच्या घरी उतरत. त्यांना १९४५ ते १९५५ या काळात पं. पलुसकरांचा सुरेल सहवास लाभला. पहिली काही वर्षे दातारांनी तानपुर्‍यावर, नंतर व्हायोलिनवर पलुसकरांच्या कार्यक्रमात साथ केली. पलुसकरांबरोबर दातारांनी मुंबईखेरीज भारतातील इतर शहरांतही साथ केली. पलुसकरांच्या सहवासातून दातारांचे वादन अधिक समृद्ध, प्रासादिक, तसेच परिपक्व झाले. पलुसकरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचाही दातारांच्या एकंदर सांगीतिक कारकिर्दीवर खोल परिणाम झाला. पलुसकरांच्या अचानक झालेल्या निधनानंतर दातारांनी आपल्या स्वतंत्र व्हायोलिनवादनाच्या बैठकी सुरू केल्या.

साधारणतः १९५७ - १९५८ च्या सुमारास दातारांचे स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम सुरू झाले. आकाशवाणीवरूनही त्यांचे कार्यक्रम नियमितपणे व्हायला लागले. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार्‍या संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमातून त्यांच्या वादनाचे प्रसारण झाले. आकाशवाणी या माध्यमामुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले.

मुंबईच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये दातारांनी बराच काळ नोकरी केली. अनेक अनुबोधपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत-वादन केले. पं. रविशंकर यांच्या ‘मेलडी आणि र्‍हिदम’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. चित्रपटसृष्टीत सी. रामचंद्र, एस.एन. त्रिपाठी, एस.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल इ. संगीतकारांसाठी त्यांनी ‘साँग व्हायोलिनवादक’ म्हणून काम केले. त्यांनी १९८० - ८२ नंतर हे क्षेत्र सोडले.

मैफली कलाकार म्हणून दातारांचे नाव १९६५ - ६६ पासून होऊ लागले होते. भारतात, तसेच पाश्चिमात्य देशांतही त्यांचे व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम झाले. प्रत्येक वेळी वेगवेगळी आमद घेऊन दाखवलेले समेवर येण्याचे कसब, स्वर-लय यांच्या योग्य मिलाफाने केलेले त्यांचे सादरीकरण व खर्जापासून तारसप्तकापर्यंत होत जाणारा स्वरविस्तार ही त्यांच्या वादनातील खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.

पं. दामोदर दातारांना अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभले. ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार,  २००४ साली भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार, ‘कुमार गंधर्व’ पुरस्कार हे काही मानाचे, विशेष पुरस्कार त्यांना लाभले. आइसलँडच्या अध्यक्षांकरवी दिला जाणारा ‘सन्मान पुरस्कार’ हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही त्यांना लाभला आहे. दातारांच्या पत्नी सुधाताई या स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. पं. दातार यांची रियाझ व नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती होती जी कायम राहिली. दातारांनी व्हायोलिनवादनात अनेक शिष्यही तयार केले.

रत्नाकर गोखले

दातार, दामोदर केशव