Skip to main content
x

दाते, केशव कृष्ण

      हृद्रोग शाखा म्हटली की प्रामुख्याने नाव पुढे येते ते डॉ.के.के. (म्हणजे केशवराव कृष्णराव) दाते यांचे. डॉ. दाते मृदुभाषी, पण कणखर वृत्तीचे होते. त्यांचा जन्म जबलपूरच्या सधन कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण जबलपूरमध्ये झाले. अलाहाबाद विद्यापीठातून १९३२ साली इंग्रजी वाङ्मयात त्यांनी पदवी घेतली. नंतर त्यांचा कल वैद्यकीय शिक्षणाकडे झुकला व १९३६ साली मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालय व जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामधून ते एम.बी.बी.एस. झाले. त्यानंतर सहा वर्षे त्यांनी मध्यप्रदेश तुरुंग अधीक्षक म्हणून काम केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी ब्रिटनला जाऊन डी.टी.एम. अ‍ॅण्ड एच. (लंडन) व डी.सी.एच. (इंग्लंड) या पदव्या १९४२ साली घेतल्या. तसेच एम.आर.सी.पी. (लंडन) व एम.आर.सी.पी. (एडिंबरो) या पदव्या घेतल्या. परदेशी असताना डॉ. पॉल वुड (युके) व डॉ. पॉल व्हाइट (अमेरिका) यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हृद्रोगशाखेचा खूप अनुभव व ज्ञान मिळाले.

     मायदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयामध्ये हृदय सुशिरीकरण सुरू केले व सातत्याने चालू ठेवले. के.ई.एम. रुग्णालयामध्ये डॉ.दाते हृद्रोगतज्ज्ञ म्हणून काम करू लागले. १९६३ साली त्यांना एफ.आर.सी.पी. (एडिंबरो) व १९६७ साली एफ.आर.सी.पी. (लंडन) या पदव्या प्रदान करण्यात आल्या. वैद्यकीय क्षेत्रात विशेषत: हृद्रोगशास्त्रातील त्यांची भरीव कामगिरी जगप्रसिद्ध झाली. डॉ. दाते मुंबईतील बॉम्बे रुग्णालयामधील हृद्रोग विभागाचे संचालकही झाले होते. तसेच मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालयामध्ये डॉ. दाते सन्माननीय प्राध्यापक व संचालक होते. त्याचप्रमाणे हरकिसनदास व नानावटी रुग्णालयामध्ये अभ्यागत हृद्रोगचिकित्सक म्हणून काम बघायचे. भारतीय सैन्याच्या व मध्य रेल्वेच्या मुंबईतील रुग्णालयाचे ते हृद्रोग सल्लागार होते.

     डॉ.दातेंनी हृद्रोगशास्त्राच्या विविध विभागांत महत्त्वाचे संशोधन केले व अत्याधुनिक पद्धती वापरल्या. त्यांचे विशेष संशोधन म्हणजे शवासनात रक्तदाबावर होणारा परिणाम. त्यामुळे अ‍ॅलोपथी व योग जवळ आले. उच्च रक्तदाबाच्या औषधोपचारासाठी के.ई.एम. रुग्णालयात येणाऱ्या ४७ रुग्णांना (३७ पुरुष व १० स्त्रिया) शवासनाचा उपयोग सुचविण्यात आला. त्यांचे सरासरी वय ४६ वर्षे होते (२२ ते ६४). सरासरी रक्तदाब सुरुवातीस १८६/११५ होता. प्रकुंचनी (सिस्टॉलिक) रक्तदाब कमीतकमी १६० मि.मि. व हृदयप्रसारणी (डायास्टोलिक) रक्तदाब ९०/१४५ मि.मि. होता. एक महिना अगोदर रक्तदाबाच्या गोळ्या बंद केल्या गेल्या. नंतर त्यांना शवासन शिकवले गेले व रोज करायला लावले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब हळूहळू कमी झाला. रक्तदाबाची अपेक्षित स्थिर पातळी गाठल्यावर रक्तदाबाच्या गोळ्या कमी मात्रेत, शवासनाबरोबर चालू केल्या. 

     डॉ. दाते व हृद्रोगशास्त्र यांचे अतूट नाते होते. भारतातील पहिले ‘हृदय पुनर्वसन केंद्र’ के.ई.एम. रुग्णालयामध्ये डॉ. दातेंनीच चालू केले. हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णाला त्या काळी खूप दिवस बिछान्यात विश्रांती घ्यावी लागत असे. अशा रुग्णांच्या प्रकृतीतील गुंतागुंत, विकृतीचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकर पुनर्वसन करणे किती आवश्यक आहे हे त्यांनी दाखवून दिले. हृदयशुळासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या मापनासाठी त्यांनी आदर्श पद्धती आखून दिली. ‘वॉर्नर हार्ट व्याख्याना’साठी (ओरेशन) १९७४ साली त्यांनी हाच विषय घेतला होता.

     संशोधन व निदान पद्धतीतील त्यांचे विशेष कर्तृत्व व बुद्धिमत्ता बघून अमेरिकन सरकारच्या आरोग्य, शिक्षण व कल्याण खात्याने त्यांना हृदयरोग्यांच्या पुनर्वसनाच्या नवीन पद्धती व उपचार यांवर संशोधन करायला खास अनुदान दिले. शवासन व रक्तदाबावरील औषधे यांचा योग्य मेळ घालून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यावर त्यांनी शोधनिबंध लिहिले. औषधे, योग्य आहार, व्यायाम व स्वनियंत्रित जीवनपद्धतीने हृदयशुळाच्या रुग्णांना बायपासची शस्त्रक्रिया टाळता येण्याची शक्यता त्यांनी दाखवली. हृद्रोगाचा झटका आल्यावर तत्परतेने तातडीचे उपाय योजणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून भारतातील पहिला ‘अतिदक्षता हृदय विभाग’ त्यांनी के.ई.एम. रुग्णालयामध्ये चालू केला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना निरनिराळ्या देशातील वैद्यकीय संस्थांकडून ‘फेलोशिप’ मिळाल्या. त्यांतील खास उल्लेखनीय म्हणजे ‘अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स’, ‘ब्रिटिश कार्डियाक सोसायटी’चे मानद सभासदत्व, याशिवाय ‘ऑनररी फेलोशिप ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’, ‘कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्षपद, ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्षपद, ‘इंडियन असोसिएशन ऑफ चेस्ट फिजिशियन्स’चे अध्यक्षपद, ‘ऑल इंडिया हार्ट फाउंडेशन’चे संचालक हे सन्मान त्यांना मिळाले. डॉ. दाते ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ अ‍ॅन्जियॉलॉजी’चे उपाध्यक्ष होते.

     डॉ.दाते यांनी अगणित उत्तम भाषणे दिली. त्यांतील महत्त्वाची व मानाची समजली जाणारी ‘डॉ.बी.सी. रॉय मेमोरियल ओरेशन’ (१९६६), ‘नेताजी ओरेशन’ (१९७३), ‘एण्डोमेण्ट लेक्चर ए.पी.आय’. बंगलोर (१९७३), ‘वॉर्नर हार्ट ओरेशन’ (१९७४), ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ कार्डियॉलॉजी सोव्हेनियर ओरेशन’ (१९७४), ‘साराभाई ओरेशन’ (१९७७) ही व्याख्याने त्यांनी दिली. ‘बी.सी. रॉय नॅशनल अवॉर्ड’ (१९७१ व १९७९ - १९८०) हा बहुमान फक्त त्यांनाच दोनदा मिळाला आहे.

     डॉ. दाते यांची शिकवण्याची शैली अप्रतिम होती. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला खूपच विद्यार्थी जमत असत. त्यांच्यातील नेतृत्वगुणामुळे त्यांनी तीन निरनिराळ्या जागतिक संस्थांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. पाचवे वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डियॉलॉजी -१९६६, नववे इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ इन्टर्नल मेडिसीन - १९७०, साउथ ईस्ट एशिया अ‍ॅण्ड पॅसिफिक एशिया काँग्रेस-१९७८, १९६३ सालापासून जागतिक आरोग्य संघटनेच्या हृदयविकाराच्या तज्ज्ञांच्या समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. ‘ब्रिटिश कार्डिअ‍ॅक सोसायटी’चे व ‘बेल्जियम कार्डिअ‍ॅक सोसायटी’चे मानद सदस्यत्व मिळालेले डॉ.दाते हे एकटेच भारतीय आहेत.

     वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कामाबद्दल त्यांचा ‘पद्मभूषण’ (१९६९) देऊन गौरव करण्यात आला. भारतीय सैन्याच्या सेवेबद्दल त्यांना १९७५ साली मानद ‘ब्रिगेडियर’ केले गेले. मानाचे ‘धन्वंतरी पारितोषिक’ही त्यांना १९७७ साली मिळाले होते.त्यांचे २८०पेक्षा जास्त शास्त्रीय लेख जगातील निरनिराळ्या मान्यवर मासिकांतून छापून आले. त्यांनी सामान्य माणसांसाठी सोप्या भाषेतून अगणित लेख लिहिले. ‘टेक्स्ट बुक ऑफ मेडिसीन’चे डॉ. दाते मुख्य संपादक होते.

     एक ‘असामान्य वैद्यकशास्त्रज्ञ’ म्हणून त्यांची जगभर ख्याती होती व त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात भारताचा झेंडा मानाने फडकावला. मे १९८३ साली ‘लिम्फोमा’ या कर्करोगाच्या एका प्रकारच्या विकारामुळे त्यांची जीवनज्योत मालवली. डॉ. दाते उत्तम टेनिसपटू होते व महाविद्यालयाच्या चमूचे कर्णधार होते.

डॉ. शशिकांत प्रधान

दाते, केशव कृष्ण