दात्ये, हरी विनायक
रागदारी संगीत वा कलासंगीत हे प्रामुख्याने ‘चेंबर म्युझिक’ म्हणजे बंदिस्त जागेत; पूर्वीच्या काळी मंदिर वा दरबार, दिवाणखाना, तसेच आजच्या काळात प्रामुख्याने बंद, प्रायः वातानुकूलित सभागृह, रंगमंचांवर सादर होते. मात्र संगीताच्या काही विधा अशा आहेत, की ज्यांचे सादरीकरण हे मुख्यतः खुल्या आकाशाखाली, क्रीडांगण वा संघस्थान अशा मोकळ्या जागी, मैदानांवर होते. अशा संगीताचा हेतू व्यायाम, कवायत, क्रीडासंचलने असा असल्याने या संगीतास ‘प्रांगणीय संगीत’ अथवा ‘मैदानी संगीत’ (आउटडोअर म्युझिक) अथवा व्यायाम संगीत (म्युझिक फॉर एक्सरसाइज), रणसंगीत (मार्शल म्युझिक), घोषसंगीत (बॅण्ड म्युझिक) असे म्हटले गेले आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘मैदानावर वाजवले-गायले जाणारे संगीत म्हणजे प्रांगणीय संगीत होय.’
हरी विनायक दात्ये यांनी हिंदुस्थानी रागांचा वापर करून संचलनासाठी अनेक रचना केल्या, भारतीय व पाश्चात्त्य वाद्यमेळ्यांचा वेगळा विचार करून वादनपद्धती सुनियोजित बनवली. त्यांनी प्रांगणीय संगीताला उपयोगी अशी नवी संगीतलिपी तयार केली व ‘गायनी कळा’ हे त्यांचे पुस्तक प्रांगणीय संगीताचे शास्त्र सांगणारे मराठी भाषेतील एकमेव पुस्तक आहे. प्रांगणीय संगीताच्या संदर्भात असे मोठे कार्य दात्ये यांनी केले.
‘घोष’ म्हणजेच वाद्यवृंदाच्या रचना, सूर्यनमस्काराचे संगीत अशा अनेक रचनांचे कर्ते हरी विनायक तथा बापूराव दात्ये यांचा जन्म पुण्याला झाला. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीजवळचे गणेशवाडी हे त्यांचे मूळ गाव, मात्र त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे होती. त्यांचे वडील विनायक नारायण दात्ये व आई दुर्गाबाई हे एक सुसंस्कारित कुटुंब होते. त्यांच्या एकूण आठ मुलांपैकी हरिभाऊ हे सर्वांत मोठे चिरंजीव होत. त्यांच्या वडिलांचा छापखाना होता. बालवयापासूनच बापूरावांनी चित्रकला, मूर्ती बनवणे अशा कलाकुसरींत प्राविण्य मिळवले. मुळातच विचक्षण बुद्धी असणाऱ्या बापूरावांचे मॉडर्न हायस्कूलमधील शालेय शिक्षण कौटुंबिक कारणांनी मॅट्रिकपूर्वीच थांबले.
वडिलांच्या छापखान्याच्या व्यवसायात त्यांना रस नसल्याने तो व्यवसाय त्यांचे बंधू माधवरावांनी चालवला. मात्र बापूरावांनी छपाईच्या तंत्राचा बारकाईने अभ्यास केला होता व नंतर त्यांनी ‘हिंदुस्थान साहित्य’ या नावाने स्वतःचा छपाई, प्रकाशन व वितरणाचा व्यवसाय १९६२ ते १९८० या काळात मुख्यतः संघसाहित्याच्या प्रसारार्थ चालवला. स्वतःचे चार ग्रंथही त्यांनी ‘हिंदुस्थान साहित्य’द्वारेच प्रकाशित केले. आयुष्यात उपजीविकेसाठी त्यांनी अनेक उद्योग केले, मात्र खरे पाहता त्यांनी आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघास व प्रांगणीय संगीताच्या उन्नतीसाठीच समर्पित केले.
बापूरावांना बालपणापासूनच संगीताची गोडी होती, स्वरज्ञान उपजतच होते. कोणतेही वाद्य हातात घ्यावे व सहजपणे, सफाईने त्यावर वादन करावे असे त्यांचे कौशल्य होते. ते वाद्यांची निगराणी व दुरुस्ती यांतही वाकबगार होते. नारायणशास्त्री तांबे यांच्या सहवासातून व त्यांच्या संगीतविषयक लेखनाचा अभ्यास करून त्यांनी संगीताचे शास्त्र जाणून घेतले. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे शिष्य, उत्तम गवय्ये पं. नरहरबुवा पाटणकर यांच्याकडे ते काही काळ गायन शिकले. छोटा गंधर्व, कमल तांबे, इ. गायकमंडळींशी त्यांचा स्नेह होता.
सांप्रदायिक भजनाचीही त्यांना आवड होती व झांजले विठ्ठल मंदिरातील कृष्णराव मेहेंदळे यांच्या भजनी मंडळात ते नियमितपणे गाण्याची हजेरी लावत. स्काउटच्या घोषविभागाचे काम पाहणाऱ्या भाऊसाहेब देशमुखांकडून त्यांनी प्रांगणीय संगीताचे मूलभूत स्वरूप जाणून घेतले. ते १९३७ साली पाश्चात्त्य स्टाफ स्वरलेखन- पद्धती शिकले व त्यांनी पुढे आपली स्वतंत्र स्वरलेखन पद्धती विकसित केली.
नागपूर येथे १९२५ च्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू झाले व ते अल्पावधीतच पुण्यातही रुजले. संघाकडे बापूराव आकृष्ट झाले व स्वातंत्र्य आंदोलनात ते सहभागी झाले. ते १९३८ साली मद्रास प्रांतात संघकार्याच्या प्रचारार्थ गेले व अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी दीड वर्षे हे कार्य नेटाने केले. पुण्यात परतल्यावर संघाचे कार्यालय व भांडार यांचे व्यवस्थापन करण्याचे काम ते करू लागले. नंतर पुणे शहर घोषविभागाचे प्रमुख म्हणून ते काम करू लागले.
घोषविभागात तेव्हा आनक (ड्रम्स), शंख (बिगुल) व वंशी (पितळेची फ्ल्यूट) एवढीच वाद्ये होती. बापूरावांनी वेळोवेळी नवनवी वाद्ये मिळवून, त्यांची डागडुजी करून, निगा राखून ती त्यांनी घोषदलात सामील केली व तो समृद्ध केला, नवे शृंगपथकही तयार केले. घोषदलात प्रामुख्याने पाश्चात्त्य वाद्ये वापरली जातात. संगीताच्या परिभाषेतही त्यांनी काही नवे शब्द दाखल केले. ड्रम, कॉर्नेट, ट्रम्पेट, युफोनिअम, ट्रंबोन, स्लाइड ट्रंबोन, बिगुल, हॉर्न, फ्ल्यूट, सॅक्सोफोन, बॅगपाइप, क्लॅरिओनेट, इ. वाद्यांसाठी त्यांनी अनुक्रमे आनक, शृंग, तूर्यशृंग, गोमुखी, प्रतूर्य, प्रतान-प्रतूर्य, शंख, विषाण, वंशी, नागांग, कोंबडा, स्वरद अशी नावे वापरायला सुरुवात केली.
घोषदंडाचे संचलन रेखीव करण्यासाठी त्यांनी सैन्यदलातील निवृत्त अधिकार्यांशी चर्चा केल्या व निरीक्षणाद्वारे ते कौशल्य मिळवले. बालविभागासाठी काम करताना त्यांनी व्यायाम योगाचे मंदगती, प्रचलन गती व द्रुतगती अशा क्रमाने प्रत्येकी सोळा अंकांतील प्रात्यक्षिक बसवून घेतले व बालगटाकडून उत्तम तर्हेने प्रार्थना, गीते बसवली. संघाच्या विद्युत ध्वनिविभागाचे काम पाहताना त्यांनी ध्वनिक्षेपण, ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानही आत्मसात केले. त्यांनी अनेक ध्वनिमुद्रणे व चित्रफिती तयार केल्या. देशभरात प्रांगणीय संगीताच्या प्रसारार्थ त्यांनी घोषवर्ग घेतले. बापूरावांचे कान अगदी तीक्ष्ण होते, १००-१५० वादकांतही एखादी चूक नेमकी कुठून होत आहे हे ते टिपत असत.
ब्रिटीश काळापासून भारतात कवायती वा संचलनांसाठी पाश्चात्त्य पद्धतीच्या स्वररचना वाजवल्या जात. मात्र प्रांगणीय संगीताच्या रचना रागाधारित असाव्यात या उद्देशाने बापूरावांनी भारतीय रागसंगीतावर आधारित अशा प्रांगणीय संगीताच्या अनेक रचना केल्या. या रचनांना ‘सुसंवादी व समांतर स्वरावली’सारख्या (हार्मनी व कॉन्ट्रा) पाश्चात्त्य संगीतातील तंत्राने सजवले. हरी दात्ये यांनी प्रत्येक वाद्यानुसार, वादकांसाठी स्वरलिपीची वादनपत्रे लिहिण्याची एक सुघड पद्धत तयार केली. त्यांनी आपल्या मोत्यासारख्या हस्ताक्षरात अचूकपणे या रचना एकटाकी लिहून काढल्या.
त्यांनी १९५२ साली सारंग रागावर आधारित ‘गणेश’ ही पहिली घोषरचना तयार केली. बापूरावांनी रचलेल्या चेतक, स्वराज, प्रतिध्वनी, किरण, श्रीराम, मंगला, वरंची, अजेय, हररंजनी, परमार्थ, इ. रचना ‘प्रांगणीय संगीताच्या उत्तम रचना’ म्हणून अभ्यासता येतील. ध्वजारोपणम् (रागेश्री), प्रणाम (हिंडोल), शिवराजः (भूप), भारतम् व एकता (देशकार), देवदत्त (शंकरा), केकावली (देस), श्रीपाद (मांड), गुणवंत (पिलू), हंस प्रचोदयात् (हंसध्वनी), बदरी (केदार), शारदा (दुर्गा), विजया (कल्याण), कालगती (कलावती), आरुणी, केशवः व षड्जांतर (भैरवी) या रचनांतून उद्धृत रागांचा वापर फार सुंदरपणे केला आहे. तसेच भीमपलास, कल्याण, तिलककामोद, गौडमल्हार, बागेश्री, शिवरंजनी, कालिंगडा, तिलंग, आसावरी, खमाज, हरिकांबोजी, इ. रागांतही त्यांनी प्रसंगानुरूप रचना केल्या.
या रचना प्रथम एखाद्या घोषाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर वाजवून पाहण्यासाठी बापूरावांनी बी.ई.जी.चे घोषप्रमुख मेघासिंग यांना सांगितले. त्यांच्या घोषावर जौनपुरी, केदार इ. रागांतील रचना यशस्वीपणे वाजवल्या गेल्यावर या रचना पोलीसदल, सेनादल, नौदलाच्या घोषांमधूनही वाजवल्या जाऊ लागल्या. संगीतरचना बसवून घेण्याच्या निमित्ताने नौसेनेच्या घोषातील प्रमुख कमांडर एम.एन. वाइज, रॉड्रिक्स, जोसेफ व्हाइट, सेनादलाच्या पचमढी येथील संगीतविभागातील सायमन, गुरंग, रायचौधरी इत्यादींशी बापूरावांचा घनिष्ठ संबंध आला. तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवरूनही या रचना गाजू लागल्या.
‘एशियाड’ या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात १९८२ साली बापूरावांनी रचलेली ‘शिवराजस्तवः’ ही भूप रागावर आधारित रचना वाजवली गेल्याने त्यांचे नाव जगभर झाले. नौदल घोषाने बापूरावांच्या रचनांचे ध्वनिमुद्रण करून ठेवले. ‘घोषनाद’ ही बापूरावांच्या रचनांची ध्वनिफीत बंगलोर येथील संगीतज्ञ डॉ. सत्यनारायण यांच्या हस्ते प्रकाशित झाली होती. गायक, संगीतकार सुधीर फडके हे बापूरावांचे स्नेही होते व परस्परांना आपल्या कार्याबद्दल आत्मीयता होती. बापूरावांनी बाबूजींकडून अनेक संघगीते गाऊन घेतली होती, तर चिनी आक्रमणकाळात ‘रक्षणार्थ ठाकूनी उभे चहूकडे’ हे गीत ध्वनिमुद्रित झाले होते.
‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे असे वाटणाऱ्या मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांच्या तत्संबंधित प्रयत्नांत बापूराव त्यांना मदत करू लागले. मास्तरांनी झिंझोटी रागात स्वरबद्ध केलेले ‘वंदे मातरम्’ बापूरावांनी मुंबईच्या नौदलाच्या घोषविभागाच्या साथीने विविध वाद्यांच्या मेळात, संचलनाच्या उद्देशाने ध्वनिमुद्रित केले व ते संसदेत सादर केले. बापूरावांनी १९४८ ते १९५० अशी दोन वर्षे ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत व्हावे यासाठी मास्तर कृष्णरावांबरोबर व्यतीत केली.
‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत म्हणून तत्कालीन राजकारण्यांनी स्वीकारले नाही, तरी त्यास राष्ट्रगीतासमान दर्जा मिळाला व त्या योगे मास्तर व बापूरावांचे कार्य काही अंशी सफल झाले. पुढे १९७४ साली बापूरावांनी पं. विनायकराव पटवर्धन यांच्या आवाजातही ‘वंदे मातरम्’ ध्वनिमुद्रित केले होते. याशिवाय अन्य संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या ध्वनिमुद्रणांचा संग्रह व अभ्यास त्यांनी केला. बापूरावांनी स्वतः ‘वंदे मातरम्’ची वेगळी स्वररचना संघाच्या घोषासाठी केली व ती आजही संघ घोषदलात वाजवली जाते.
सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायामप्रकार असून त्याचा प्रसार करण्यासाठी बापूराव दीर्घकाळ प्रयत्नशील होते. सूर्यनमस्कारांसाठी त्यांनी ‘आरुणी’ ही विशेष संगीतरचना केली व बिभास रागात स्वरबद्ध केलेला सूर्यस्तुतीचा श्लोक पं. भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतला. या संगीताच्या साथीने वैयक्तिक व सांघिक स्वरूपात हे सूर्यनमस्कार घालण्याचा पायंडा त्यांनी घातला.
ह.वि. दात्ये यांनी एकूण चार ग्रंथांद्वारे साहित्यसामग्रीत नोंद करावी अशी भर घातली. या चार ग्रंथांपैकी ‘तेजाची आरती’ हे गोळवलकर गुरुजींचे चरित्र (१९७७), हिंदीत ‘आरती आलोक की’ (१९८१) व ‘सूर्यनमस्कार :उपासना व व्यायाम’ (१९९०, हिंदी आवृत्ती १९९६) या ग्रंथांचे लेखनही बापूरावांनी केले. प्रांगणीय संगीतावर माहितीपर अशा त्यांच्या ‘घोषपरिचय’ पुस्तिका प्रकाशित झाल्या. ‘गायनी कळा’ (१९६८) व ‘स्वरांजली’ (१९९६) या दोन प्रांगणीय संगीतविषयक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
‘गायनी कळा’ हा प्रांगणीय संगीतावर भाष्य करणारा, त्याचे शास्त्र समग्रतेने मांडणारा मराठीतील एकमेव ग्रंथ आहे. एकूण सोळा प्रकरणे व तेरा परिशिष्टांमध्ये बापूरावांनी प्रांगणीय संगीताची मूलतत्त्वे व प्रत्यक्ष उपयोजन यांबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. प्रांगणीय संगीतास अनुकूल अशी, सर्वांगसुंदर, नवीन संगीतलेखनाची लिपी त्यांनी या ग्रंथात मांडली आहे; अनेक सांगीतिक पारिभाषिक संज्ञा तयार करून त्यांची विस्तृत शब्दसूचीही त्यांनी दिली आहे. आबासाहेब मुजुमदार, पु.ल. देशपांडे, अशोक दा.रानडे यांसारख्या मर्मज्ञांनी या ग्रंथाला वाखाणले. या ग्रंथाला ‘समीक्षा व सौंदर्यशास्त्र प्रकारातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल’ राज्य पुरस्कार मिळाला.
बापूरावांनी प्रांगणीय संगीताच्या स्वरचित ५० रचना स्टाफ पद्धतीने लिहून त्यांचे ‘स्वरांजली’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात या रचनांसाठी विविध संघोष (म्युझिकल अरेंजिंग) व अन्य वाद्यांसाठीचे अक्षरसंकेतही (इन्स्ट्रुमेन्टेशन) नमूद केले.
मेहनतीपणा, अचूकपणाचा आग्रह, नियोजनातील काटेकोरपणा, वक्तशीरपणा, अत्यंत कठोर शिस्त (त्या शिस्तीच्या नियमांतून ते स्वतःलाही सूट देत नसत), टापटीप, समयसूचकता अशा गुणांमुळे वैयक्तिक अस्वास्थ्य असूनही बापूराव प्रचंड मोठे कार्य करू शकले. मात्र याचबरोबर एक व्यक्ती म्हणून अत्यंत कनवाळूपणा, स्नेहशीलता, गुणग्रहकता, माणसे जोडण्याची हातोटी व त्यामुळे प्रचंड वैयक्तिक व सांघिक स्वरूपाचा जनसंपर्क असल्याने ब्रह्मचर्याश्रमातच संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या बापूरावांचे घर अनेक कार्यकर्त्यांचे हक्काच्या निवाऱ्याचे , मुक्त आश्रयाचे ठिकाण होते.
प्रांगणीय संगीताबद्दल समाजात एकूणच उदासीनता असल्याने व बापूरावांच्या प्रसिद्धिपराङ्मुख स्वभावामुळे त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली गेली नाही. डॉ. अशोक दा. रानडे यांनी ‘मुलखावेगळी माणसे’ या सदरात दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेतली होती. ‘आरुणी’ या संगीतरचनेवर घातलेल्या सूर्यनमस्कारांची चित्रफीतही त्या वेळी दूरदर्शनने दाखवली. पुणे महानगरपालिका सत्कार (१९८७ व १९९७), ‘हेडगेवार जन्मशताब्दी’ पुरस्कार (१९८९), ‘हेडगेवार स्मृती समिती’ पुरस्कार (१९९७), ‘कृतज्ञता सार्वजनिक निधी गौरव’ (१९९५) असे मोजकेच पुरस्कार त्यांना मिळाले. ह.वि. दात्ये हे एक व्रतस्थ व ॠषितुल्य जीवन जगले व पुणे येथे त्यांनी देह ठेवला.