Skip to main content
x

डे, अभयचरण गौरमोहन

भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद

     श्रील भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांचे मूळ नाव अभयचरण डे असून त्यांच्या पिताश्रींचे नाव गौरमोहन डे होते. ते कापडाचे व्यापारी होते, तसेच त्यांचा पिढीजात व्यवसाय सोने व मीठ या वस्तूंचा होता. गौतमऋषींचे कूळ हे यांचे मूळ होते; परंतु मोगलांच्या आमदनीत मुसलमान शासकाने त्यांना मलिक ही पदवी दिली. अभयच्या मातेचे नाव रजनी होते. गौरमोहन डे यांनी ज्या ज्योतिषाला बोलावले होते, त्याने अभयचे भविष्य वर्तविले होते, की हे बालक वयाच्या सत्तर वर्षांनंतर समुद्रपार जाईल, धर्मोद्धारक होईल आणि १०८ मंदिरे स्थापन करील. डे यांचे घर उत्तर कलकत्त्यात, हॅरिसन रोडवर होते. त्यांच्या रस्त्याच्या पलीकडेच राधागोविंद मंदिर होते व त्यांच्या घरातील सर्व जण राधाकृष्ण हे कुलदैवत मानीत. त्या देवळात पूजाअर्चा करून सर्वांना प्रसाद वाटीत असत. मलिक यांची इस्टेट खूपच मोठी होती. मलिक परिवार रोज सकाळी मंदिरात दर्शनाला नियमाने जात. राधाकृष्ण हे त्यांचे परमश्रद्धेचे स्थान होते.

     अभयचरणला बालपणापासूनच शुद्ध कृष्णभक्तीचे बाळकडू मिळाले. त्याला वडिलांनी मृदंगवादनही शिकवले. अभयचरण मातापित्यांबरोबर अथवा नोकरांसोबत मंदिरात जाई. गौरमोहन वैष्णव होते. त्यांनी कधीही मासे, मांस, अंडी, चहा-कॉफीला स्पर्शही केला नाही. दुकानातून रात्री घरी आल्यावर ते चैतन्यचरितामृत व श्रीमद्भागवताचे वाचन करीत. जपजाप्य होतेच. वडिलांनी अभयचरणला कृष्णभक्तीचा लळा लावला. ते मुलावर कधीही रागावत नसत. त्यांचा स्वभाव कोमल होता. भक्तिसिद्धान्त सरस्वती ठाकूर हे प्रसिद्ध धार्मिक विद्वान होते. त्यांची व अभयचरण यांची गाठ कलकत्त्यात १९२२ मध्ये पडली. भक्तिसिद्धान्तांनी गौडीय मठ संस्था स्थापन केली होती. ही संस्था वैदिक ज्ञानाचा प्रसार करी. या संस्थेची भारतात ६४ केंद्रे होती. भक्तिसिद्धान्त हे त्या जमान्यातले अग्रगण्य पंडित होते. त्यांना अभयचरण डे (श्रील) हा तरुण आवडला. त्यांनी या उमद्या तरुणाला पटवून दिले, की वेदविद्येचे शिक्षण देण्यात त्याने आपले आयुष्य खर्च करावे. त्यानंतर बारा वर्षांनी (१९३३) या पंडितांनी अभयचरणला अलाहाबाद-प्रयाग येथे दीक्षा दिली. त्याचे नामकरण ‘भक्तिवेदान्त स्वामी’ झाले.

     त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची व कृष्णभक्तीची गंभीरता पाहून, गौडीय वैष्णव सोसायटीने १९४७ साली त्यांना ‘भक्तिवेदान्त’ हा किताब दिला. १९५० साली त्यांनी वयाच्या चौपन्नाव्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करून अध्ययनासाठी व लेखनासाठी वेळ मिळावा म्हणून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. भक्तिवेदान्त श्रीधाम वृंदावनला गेले. तेथे प्रसिद्ध ऐतिहासिक श्रीराधादामोदर मंदिरात निवास करू लागले. त्यांचा स्वभाव अतिशय नम्र व राहणी साधी होती. याच मंदिरातील खोलीत त्यांनी एकाग्र चित्ताने आपल्या जीवनातील महत्त्वाचे कार्य : श्रीमद्भागवतासारख्या अठरा हजार श्लोेकांच्या विशाल ग्रंथाचे टीकेसहित भाषांतर करायला सुरुवात करून ‘ईझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स’ हे पुस्तकही लिहिले.

     श्रीमद्भागवताचे प्रथम तीन स्कंद प्रकाशित झाल्यावर १९६५ साली श्रील प्रभुपाद आपल्या सद्गुरुमहाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला निघाले. त्यांच्याकडे फक्त एक सूटकेस होती. गरम कपडे नव्हते. भक्तिपादांचे वय व तब्येत बघून बोटीचे तिकीट देण्यास कंपनीचे अधिकारी तयार नव्हते, म्हणून तिकिटासाठी ते सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या मालकीण सुमती मोरारजींना भेटले. त्यांनी प्रभुपादांची प्रवासाची व्यवस्था केली. ‘जलदूत’ नावाची बोट १९ सप्टेंबर १९६५ रोजी न्यूयॉर्कला पोहोचली. प्रभुपाद विचार करू लागले, ‘माझ्याकडे पुस्तकांच्या पेट्यांशिवाय काय आहे? इथली संस्कृती वेगळी, सर्वथा अपरिचित. येथे साधूंची परंपरा नाही, देवळे नाहीत. मोफत आश्रम नाहीत. भारताची गोष्ट वेगळी होती. माझ्याकडे अध्यात्माचा, अलौकिक ज्ञानाचा साठा आहे, ‘श्रीमद्भागवतम्’ हा सद्भावना व शांततेचा संदेश आहे. तुळशीमाळा आहे.’

     निष्कांचन स्थितीत १९६५ मध्ये अमेरिकेत उतरल्यावर एक वर्ष कठीण परिश्रम करून १९६६ साली त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय श्रीकृष्णभावनामृत संघा’ची (इस्कॉन) स्थापना केली. या संस्थेची पुढे जगभर भरभराट होऊन शेकडो मंदिरे, गुरुकुले, शैक्षणिक केंद्रे, कृषिसमाज उदयाला आले. प्रभुपादांनी साधी राहणी, गोरक्षण अशा मूल्यांवर भर देणारा व श्रीकृष्णाच्या निसर्गदत्त उदार देणग्यांवर स्वावलंबनाने गुजराण करणारा पहिला कृषिसमाज अमेरिकेत स्थापन केला. यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या भक्तगणाने आजपावेतो अमेरिकेत व इतरत्र अनेक कृषिसमाजांची स्थापना केली आहे.

    भारतामध्ये अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रे उभारण्याचे आदेश प्रभुपाद स्वामींनी अनुयायांना दिले. त्यांपैकी श्रीधाम मायापूर हे केंद्र नियोजित आध्यात्मिक नगराच्या उभारणीचे एक स्थान आहे. ही एक फार महत्त्वाकांक्षी योजना असून ती पूर्ण होण्यास दहा वर्षे तरी लागतील. श्रीधाम वृंदावन येथे संस्थेचे भव्य श्रीकृष्ण-बलराम मंदिर प्रसिद्ध असून एक भव्य आंतरराष्ट्रीय अतिथिगृहदेखील आहे. त्याप्रमाणे मुंबईतही जुहू येथे विशाल मंदिर व सांस्कृतिक शिक्षण केंद्र आहे. भारतात अनेक ठिकाणी अशा योजनांच्या उभारणीचे काम संस्थेने हाती घेतले आहे.

    ‘‘स्वामी भक्तिवेदान्त यांनी आपल्या इंग्रजी भाषांतरांच्या व भाष्यांच्या द्वारा परमेश्वराच्या भक्तांना एक कल्याणकारक सेवेचे साधन देऊ केले आहे...’’

     — डॉ. ज्युडिथ एम. टायबर्ग, लॉस एंजेलिस

     ‘‘चैतन्य महाप्रभूंच्या सरळ परंपरेतले वारस म्हणून भारतीय रितीला अनुसरून कृष्णकृपा श्रीमूर्ती भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद ही पदवी ज्यांना मिळाली आहे, त्या श्रील ए.सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपादांचे संस्कृत भाषेवर संपूर्ण प्रभुत्व आहे. त्यांनी भगवद्गीतेचे अध्ययन केले. त्याला अनुसरून आपल्यालाही गोडी वाटू लागली व त्यामुळे म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेच्या तत्त्वानुसार केलेल्या अशा या अध्ययनाच्या योगाने गीतेचा अधिकृत अर्थ लावता आला आहे.’’

  • ऑलिव्हर लोकोंबे, पॅरिस युनिव्हर्सिटी :

     लेखक व कृष्णभक्ती प्रचारक या नात्याने त्यांचे काम अपूर्व आहे. त्यांनी वैदिक ज्ञान प्रसारासोबत श्रीमद्भगवद्गीतेवर टीका लिहिली. गौडीय मठ संस्थेच्या कार्याला हातभार लावला आणि १९४४ मध्ये कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय एक इंग्रजी पाक्षिक सुरू केले. त्याचे लेखन, संपादन स्वत: केले. प्रकाशन अखंड चालावे यासाठी अथक परिश्रम घेतले. हेच पत्रक सध्या मराठीत ‘जाऊ देवाचिया गावा’ या नावाने प्रकाशित केले जात आहे.

     स्वामी प्रभुपादांची मोठी देणगी म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा व ‘हरे राम हरे कृष्ण’ मंदिरे. मुंबईशिवाय भारतातील सर्व मोठ्या शहरांतून हरेकृष्ण मंदिर, आश्रम किंवा कृष्ण-बलराम मंदिर आहे. त्यांनी कृष्णभक्ती जगभर प्रसारित केली, तीसुद्धा अल्पकाळात. त्यांचे ग्रंथ अधिकृत असून, स्पष्टतेमुळे विद्वान, बुद्धिमान वर्गाद्वारे समाहृत झाले आहेत.

     अनेक विद्यापीठांतून शिक्षणक्रमासाठी क्रमिक पुस्तके म्हणून त्यांचा वापर केला जात आहे. त्यांचे साहित्य जगातील सुमारे ९० भाषांत भाषांतरित झाले आहे. ‘भक्तिवेदान्त बुक ट्रस्ट’ ही प्रकाशन संस्था आज भारतीय धार्मिक तत्त्वज्ञान विषयावरील पुस्तके प्रकाशित करणारी जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. श्री स्वामी भक्तिवेदान्त प्रभुपाद १४ नोव्हेंबर १९७७ रोजी श्रीधाम वृंदावनात समाधिस्थ झाले. त्यांच्या वाणीद्वारा आपण अखंडपणे त्यांच्या संगतीत राहू शकतो. ए.सी. भक्तिवेदान्त प्रभुपाद वैराग्यात पूर्णपणे स्थिर झालेले असल्याने कृष्णभावनाभावित असे कृतार्थ जीवन जगले.

     प्रभुपाद स्वामींची ग्रंथसंपदा अशी आहे :

     ‘भगवद्गीता जशी आहे तशी’, ‘जीवनशक्तीचा उगम : अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘श्रीमद्भागवत’ : पहिला, दुसरा, तिसरा स्कंध, ‘श्री चैतन्य शिक्षामृत’, ‘उपदेशामृत’, ‘अन्य लोकांप्रत सुगम यात्रा’, ‘पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण’, ‘सर्वोत्तम योग’, ‘आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’, ‘पूर्ण प्रश्‍न पूर्ण उत्तर’, ‘योगाची पूर्णता’, ‘जन्ममृत्यूच्या पलीकडे’, ‘कृष्णभक्ती : अनुपम भेट’, ‘पुनरागमन : ‘पुनर्जन्माचे गूढ’, ‘राजविद्या’, ‘गीतासार’, ‘प्रकृतीचे नियम : एक अचूक न्याय’, ‘हरेकृष्ण आव्हान’, ‘रसराज श्रीकृष्ण’, ‘प्रल्हाद महाराजांची दिव्य शिकवण’, ‘भागवताचा प्रकाश’, ‘कृष्णभावनेचा सुबोध भानू’, ‘अध्यात्म आणि एकविसावे शतक’, ‘सनातन धर्म’, ‘हरेकृष्ण मंत्र : शक्ती आणि किमया’, ‘प्रेमसागर कृष्ण’, ‘जाऊ देवाचिया गावा’ (द्वैमासिक) ‘...आणि ओशाळला मृत्यू’, ‘मृत्युपंथावरील अनुभव’ इत्यादी.

वि.ग. जोशी

डे, अभयचरण गौरमोहन