Skip to main content
x

देसाई, शरच्चंद्र नथुजी

          हाराष्ट्रात चारापिकाबद्दल संशोधन करून त्यासंबंधी शेतकऱ्यांना उपयुक्त शिफारशी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात डॉ. देसाई यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील ओझर गावी झाला. त्यांचे वडील कृषी विभागात कृषी साहाय्यक होते. देसाई यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी झाले. संगमनेर येथे १९५१मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५६मध्ये ते बी.एस्सी. (कृषी) पदवी उत्तीर्ण झाले आणि लगेच कृषी खात्यात नोकरीला लागले. १९५९मध्ये त्यांची बदली पुणे कृषी महाविद्यालयात झाली. तेथे त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवी १९६२मध्ये प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी काही काळ कृषी महाविद्यालय, अकोला येथे साहाय्यक प्राध्यापक पदावर काम केले. देसाई यांना १९७० मध्ये अमेरिकेतील पेनसिलव्हानिया विद्यापीठात पीएच.डी. पदवीसाठी पाठवण्यात आले. १९७३मध्ये त्यांनी चारापिकांसबंधात संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. तेथून परतल्यानंतर डॉ. देसाई म.फु.कृ.वि. येथे चारापिके संशोधनात कार्यरत झाले. त्या काळात संकरित गो-पैदाशीचा कार्यक्रम एकूण दूध उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आला. त्यासाठी योग्य चारापिकांची लागवड करणे महत्त्वाचे होते. ज्वारी, बाजरी, मका, ओट, लसूण घास इत्यादी महत्त्वाच्या चारापिकांच्या शिफारशी (वाण, पेरणीची पद्धत, खतांचा वापर, काढणीची वेळ इत्यादी) प्रसृत केल्या. त्या दृष्टीने म.फु.कृ.वि. चारापिके संशोधनात अग्रेसर राहिले. सुबाभूळ आणि कोरडवाहू भागांत उपयुक्त ठरणारे स्टायलो हॅमाटा

          हे द्विदल चारापीक प्रथमत: मोठ्या प्रमाणात घेऊन त्यासंबंधी शिफारशी भारतात प्रथमच प्रसृत केल्या गेल्या.

          डॉ. देसाई हे सुमारे तीन वर्षे अनुयोजित संशोधन प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. या काळात लाभ क्षेत्रातील पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठीच्या संशोधनाला त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी केलेले संशोधन व त्यासंबंधीच्या शिफारशी शेतकरी मेळाव्यात, तसेच घडीपत्रिका, पुस्तिका, लेख इ.द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. या कामाची दखल घेऊन म.फु.कृ.वि.ने त्यांची निवड संचालक, कृषि-विस्तारशिक्षण या पदावर (१९८९-९२) केली. या पदावर त्यांनी १९९२पर्यंत कार्य करून निवृत्ती स्वीकारली. डॉ. देसाई यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त असे लेख/पुस्तिका लिहिल्या असून त्यांची संख्या २७०च्या वर आहे. जागतिक बँकेच्या महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील काही प्रकल्पांवर त्यांनी सल्लागार म्हणून कार्य केले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

देसाई, शरच्चंद्र नथुजी