Skip to main content
x

देशमुख, ईश्‍वर बगाजी

       नागपूर जिल्ह्यातील कुही या खेड्यात ईश्‍वर बगाजी देशमुख यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला. उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील बगाजी देशमुख नागपूरला आले. मॉडेल मिल परिसरात कर्नलबागमध्ये राहून ते हमाली करीत आणि त्यांची आई उमाबाई देखील मोलमजुरी करून घरखर्चात आपला वाटा उचलत असे. कसेबसे पाचव्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यानंतर १९३६ मध्ये त्यांना शाळा सोडावी लागली. त्याच वर्षी त्यांचा विवाहसुद्धा झाला. घरात थोडी मदत करता यावी म्हणून त्यांनी पतंग, फुगे, संत्री, वर्तमानपत्रे विकण्याची कामे केली. पानठेला चालविला. नवभारत व मॉडेल मिलमध्येही त्यांनी काही काळ नोकरी केली.

त्यांचे चुलतभाऊ डोमाजी पैंकुजी देशमुख (जे पुढे डोमाजी वस्ताद म्हणून प्रसिद्धी पावले) ह्यांनी कर्नलबाग येथे स्थापन केलेल्या बजरंग दलामध्ये ते सामील झाले. युवकांना राष्ट्रीय प्रेरणा देता यावी म्हणून दिल्या जाणाऱ्या कुस्ती, दांडपट्टा, भाला, बरची, लाठी, काठी, जंबिया व तलवारबाजी आदी प्रकारच्या शिक्षणाने अनेक युवक डोमाजींचे अनुयायी झाले. ईश्‍वरबाबूंना त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद होताच. नियमित व्यायाम आणि सरावामुळे त्यांचे शरीर सुडौल झाले. कौशल्य वाढीस लागले व हळूहळू त्यांचे अंगी नेतृत्वाचेही गुण विकसित होऊ  लागले.

स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. ईश्‍वरबाबू त्यापासून वेगळे राहू शकले नाहीत. तेलंखेडी बाँब प्रकरणी भाग घेतल्यामुळे १९४२ मध्ये त्यांना दीड वर्षाचा कारावास झाला. कारावासातून मुक्त होताच ईश्‍वरबाबूंनी अमरावती येथील हनुमान व्यायामशाळेत व्यायाम विशारदासाठी ग्रीष्मकालीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यांनी तेथे फार मेहनत केली. खुद्द अंबादासपंत वैद्य यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांची व्यायामपटूंमध्ये निवड केली.

१९४५ मध्ये ते स्वातंत्र्य चळवळीसाठी भूमिगत झाले. त्या दरम्यान खानदेश, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात त्यांची भ्रमंती झाली. क्रांतिवीर नाना पाटील आणि किसनवीर यांच्याशी संपर्क आला. त्यांना दिशा मिळाली होती पण अपुऱ्या शिक्षणाची खंत  होती. त्याशिवाय  समाजात वावरणे, नेतृत्व करणे शक्य नाही याची जाणीव त्यांना व डोमाजींना होती. त्यावेळी खाजगीरीत्या मॅट्रिकची परीक्षा देता येत असे. म्हणून त्यांनी हिस्लॉप सिटी प्रशालेत प्रवेश घेतला आणि १९४९ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. समाज विकासासाठी महात्मा गांधींच्या विधायक उपक्रमात ईश्‍वरबाबूंनी भाग घेतला. त्यांची आखाड्यातील तालीम चालूच होती. योगासने, मल्लखांब, कुस्ती, लाठीकाठी, तलवारबाजी यामध्ये त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली होती. १९४९ साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे लिंगयाड महोत्सवासाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये त्यांची निवड झाली. ईश्‍वरबाबूंच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. महोत्सवात भारतीय संघाची खूप वाहवा झाली. प्रात्यक्षिकासाठी इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि डेन्मार्क देशाची निमंत्रणे मिळाली. या क्षेत्रात आपण आणखी पुढे जावे असे वाटल्याने त्यांनी ‘ऑलेरूप अ‍ॅकेडेमी ऑफ फिजीकल एज्युकेशन डेन्मार्क’ या संस्थेत प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण करून १९५० मध्ये ते मायदेशी परत आले. मुंबईमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

१९५४ मध्ये ते बी.ए. झाले. पुढे एलएल.बी. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली आणि वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी एम.ए. (राज्यशास्त्र) ही पदवी प्राप्त केली.

शिक्षण हाच विकासाचा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी जाणले व ‘नागरिक शिक्षण मंडळाची’ स्थापना करून १९५५ मध्ये गाडीखाना ह्या कामगार वस्तीत राष्ट्रीय विद्यालय सुरू केले. त्यांना डोमाजी देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते यांचे फार मोलाचे साहाय्य झाले. डेन्मार्कमधील संस्थेप्रमाणे शारीरिक शिक्षण देणारी संस्था काढावी हे त्यांचे स्वप्नही १९६० मध्ये पूर्ण झाले. नागपूर विद्यापीठांतर्गत शारीरिक शिक्षणाचे सर्व अभ्यासक्रम या संस्थेत राबविले जातात.

समाजाला प्रशिक्षित समाजसेवक मिळावेत यासाठी १९६८ मध्ये ‘समाजसेवा महाविद्यालय’ काढले आणि ग्रामीण भागातही शिक्षण संस्था काढण्यासाठी देशमुख यांनी कुही, मांढळ आणि रामटेक या ठिकाणांची निवड केली. अंबाळा-रामटेक येथे आदर्श अशा प्रकारचे शिबिर संकुल निर्माण करून फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे.  महात्मा गांधींच्या विधायक कार्यक्रमांत सहभागी असावे म्हणून ‘चरखा संघ’ संस्था काढून कार्याला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या कामात ते नेहमी अग्रेसर राहिले.

१९५६ साली ते ‘नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’चे अध्यक्ष झाले. १९५८ ते १९६६ ह्या कार्यकालात ते विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी (एम.एल.सी) म्हणून कार्यरत होते. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. ‘नागपूर सुधार प्रन्यास’चे सदस्य म्हणून नागपूर शहराला विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एस. टी. महामंडळाचे संचालक म्हणून ‘रस्ता तेथे एस.टी’ ही योजना त्यांच्या प्रेरणेनी राबविली गेली.

अगदी महाविद्यालयापासून त्यांनी साहित्यसेवा सुद्धा केली. ‘मौजमंडळ’ स्थापन करून युवक नवलेखकांना प्रोत्साहित केले. ‘कुठून कुठे’ ह्या आत्मचरित्रासोबत रामायण व महाभारतावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची तर प्राचार्य राम शेवाळकर यांनी भरभरून स्तुती केली आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने ईश्‍वरबाबूंचा २००० साली उचित सन्मान केला.

- प्रा. हरिभाऊ केदार

देशमुख, ईश्‍वर बगाजी