Skip to main content
x

देशमुख, प्रकाश पुंडलिक

       प्रकाश पुंडलिक देशमुख यांचा जन्म विदर्भातील अकोला येथे झाला. त्यांचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. त्यांनी १९५९ मध्ये कृषी महाविद्यालय, अकोला येथून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्यांनी १९६१ मध्ये कृषी महाविद्यालय, नागपूर येथून उद्यानविद्या हा विषय घेऊन एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली आणि १९७४ मध्ये भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘लिंबूवर्गीय फळबाग लागवड व संशोधन’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी १९६३ मध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर पुण्यातील वडगाव-मावळ येथील भात संशोधन केंद्र येथे सेवाकार्यास सुरुवात केली. ते १९६५ मध्ये कृषि-अधिकारी या पदावर नागपूरमधील थारसा येथील फळ संशोधन केंद्रात कार्यरत होते, तर त्यांनी १९६६ ते १९६९ या काळात नागपुरातील कृषी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. कृषी विद्यापीठ, अकोला येथे १९७३ ते १९७८ या काळात सहयोगी प्राध्यापक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील १९७८ ते १९८३ या काळात फळ संशोधन केेंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर १९८३ ते १९९५ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख म्हणून अकोला येथील कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागात कार्यरत होते.

       डॉ. देशमुख यांनी ४५ खुंट जाती व ५४ संत्रा वाण यावर संशोधन केले. त्यातून जंबेरी व रंगपूर लिंबाची खुंट म्हणून शिफारस करण्यात आली. आंब्याच्या  मूलस्थानी मृदुकाष्ठ कलमाची पद्धत, तसेच चिकूची पॉलीबॅगमधील मृदुकाष्ठ कलम पद्धत या संशोधनात त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे त्यांनी चिकूची अभिवृद्धी या विषयावर राष्ट्रीय निबंध नवसारी येथे प्रस्तुत केला. त्यांनी संत्रा झाडांना आधार देण्याची कमी खर्चाची व सोपी पद्धत विकसित केली. त्यांच्या कार्यकाळात मिरचीच्या सुरक्ता व जयंती, वांग्याची अरुणा, वालाचे दसरा व दीपाली हे वाण प्रसारित झाले, बिनबियांच्या संत्रा वाणाची शिफारस करण्यात आली होती.

       डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १९८७ मध्ये  चक्रधर बिनबियांचे व बिनकाटेरी लिंबाचे वाण, तसेच अकोला सफेद कांदा आणि कांटेपूर्णा ४ व कन्हान ६ खरबुजाचे वाण पूर्व प्रसारित करण्यात आले. त्यांनी १९९० ते १९९३ या काळात रोहयोनिगडित योजनेद्वारा अकोल्यातील कृषी विद्यापीठ येथे १० विद्यापीठीय रोपवाटिका यशस्वीरीत्या विकसित केल्या.

       डॉ. देशमुख यांनी संपूर्ण सेवाकाळामध्ये विदर्भातील १० जिल्ह्यांमध्ये कृषीविषयक जागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य केले. त्यांचे ४४ संशोधनात्मक लेख, नैमित्तिक कृषीविषयक १४० लेख, उद्यानपिकांचे ३ लघुकोश प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे मराठीमधून कृषीविषयक १७ पुस्तके, तर इंग्रजीमधून २ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकांपैकी ‘नागपुरी संत्रा’ व ‘कागदी लिंबू’ ही पुस्तके विशेष लोकप्रिय ठरली.

       डॉ. देशमुख यांनी एम.एस्सी. कृषीच्या १५ विद्यार्थ्यांना, पीएच.डी.च्या ४ आणि मुक्त विद्यापीठामधील बी.एस्सी. (हॉर्टी.)च्या ६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       डॉ. देशमुख ‘सिलॅबस कमिटी सर्व कृषी विद्यापीठ समिती’, ‘मुक्त विद्यापीठ नाशिक’, ‘प्लॅस्टिकल्चर समिती’, तसेच ‘राज्यस्तरीय फलोत्पादन समिती’ या संस्थांचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी उद्यानविद्या विभागात परीक्षकाचे काम केले होते. डॉ. देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. त्यांचा १९८७ मध्ये बेस्ट रीसर्च वर्कर अ‍ॅवॉर्ड डॉ. के.जी.जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना भाजीपाल्याच्या ३ वाणांचे संशोधक व प्रसारक म्हणून पुरस्कार, अंकुर साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘अक्षर तपस्वी’ पुरस्कार, शिवनेरी गौरव पुरस्कार, डॉ.पं.दे.कृ.वि.तर्फे ‘अ‍ॅग्रोटेक’ पुरस्कार आदी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

- मिलिंद कृष्णाजी देवल

देशमुख, प्रकाश पुंडलिक