Skip to main content
x

देशमुख, राजाराम बापूसाहेब

         राजाराम बापूसाहेब देशमुख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नळवणे या गावी झाला. त्यांनी १९६६ मध्ये मराठवाडा विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६८ मध्ये पुणे विद्यापीठातून पेशी उत्पत्तिशास्त्र व वनस्पति-प्रजननशास्त्र या विषयात एम.एस्सी. आणि १९८० मध्ये राहुरी येथील म.फु.कृ.वि.तून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. देशमुख यांनी १९६९ ते २००२ या काळात म.फु.कृ.वि.त संशोधन संचालक या महत्त्वाच्या पदासह विविध पदांवर काम केले. त्याव्यतिरिक्त त्यांनी जैवतंत्रज्ञानावर आधारित, अत्याधुनिक फूलशेती, किडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण इत्यादी क्षेत्रांतील संशोधन कार्ये सुरू केली. ते २००५ ते २०१० या काळात म.फु.कृ.वि.चे कुलगुरू होते. तेव्हा त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. त्यांनी ऑक्टोबर २००५ मध्ये राहुरी येथील केंद्रीय कृषी आवारात ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ व ‘कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन’ आयोजित केले. त्यांनी शेतकरीशास्त्रज्ञ कट्टा स्थापन करून संशोधन व विस्तारकार्यात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाग घेण्याची संधी प्राप्त करून दिली आणि शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यात सुसंवाद व समन्वय साधला. त्यांनी विभागांची अदलाबदल व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करणे सुलभ जावे यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केले.

          डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळात म.फु.कृ.वि.ला अनुदान म्हणून १०० कोटी रुपयांचा खास निधी मिळाला. विद्यापीठाला २००८मध्ये भा.कृ.अ.प.चे कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती पारितोषिक मिळाले. डॉ. देशमुख यांनी एम.एस्सी.च्या व पीएच.डी.च्या एकूण ३१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे १५७ संशोधनपर लेख आणि १४९ विस्तार लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, नेदरलँड, स्वित्झर्लंड व जर्मनी या देशात आयोजित करण्यात आलेल्या विविध परिषदांमध्ये व चर्चासत्रांत भाग घेऊन संशोधन कार्याबद्दलची माहिती सादर केली.

          डॉ. देशमुख यांनी डाळवर्गीय अन्न पिकांचे पैदासकार म्हणून सुमारे वीस वर्षे काम केले. अमेरिकेतील मॅकनाइट प्रतिष्ठान या संस्थेने हरभरा या पिकाच्या संशोधनासाठी मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पात त्यांनी प्रमुख अन्वेषक (रोपपैदास) म्हणून काम केले. या दोन्ही पदांच्या एकत्रित कार्यकाळात त्यांनी डाळवर्गीय पिकांच्या अनेक सुधारित जाती विकसित केल्या आणि त्यांची बियाणे वितरित केली. या सुधारित जातींमध्ये हरभऱ्याच्या फुले जी-५, फुले जी-१२, विजय, विशाल, विराट, दिग्विजय व राजस; मुगाच्या फुले मूग-२ व वैभव; उडदाची टीपीयू-४ आणि तुरीची विपुल या जाती महाराष्ट्रातील, तसेच इतर राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये प्रसारित केल्या.

          डॉ. देशमुख यांना १९९२मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील क्विन्सलँड विद्यापीठात अतिथी शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी १९९५-२००२  या काळात ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. संस्था, अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठ आणि पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी समन्वयाने व एकत्रितपणे राबवलेल्या अमेरिकेतील मॅकनाइट प्रतिष्ठानच्या हरभऱ्याच्या उत्पादनवाढीसाठी घाटे अळी प्रतिबंधक सुधारित जाती विकसित करण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात, प्रमुख अन्वेषक (रोपपैदास)  म्हणून काम केले.

          डॉ. देशमुख हे भा.कृ.अ.प.च्या संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य, तसेच संघटनेचे सदस्य (२००५-२००८), डाळवर्गीय पिकांच्या आढावा समितीचे अध्यक्ष (२००१-२००६), हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषि-विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य (२००५-२००८), नाबार्ड सल्लागार सेवेच्या संचालक मंडळावर (२००७-२००९), डाळवर्गीय पिकांसाठी केंद्र शासनाच्या कृषी व सहकार खात्याने गठित केलेल्या तज्ज्ञाच्या गटाचे सदस्य, याशिवाय ते अनेक राष्ट्रीय, राज्य व खासगी संस्थेच्या मंडळांवर सदस्य होते.

         डॉ. देशमुख यांना कोलंबो योजनेचे पारितोषिक (१९९२), आय.एस.पी.आर.डी. मान्यता पारितोषिक (१९९८), आय.सी.आर.आय.एस.एटी. डॉरीन मॅशलर पारितोषिक (२००२), सी.जी.आय.ए.आर.चे किंग बेडोईन पारितोषिक (२००२), शिवनेर भूषण पारितोषिक (२००५), वसंतराव नाईक कृषी पुरस्कार (२००६), आय.एस.पी.आर.डी. सुवर्णपदक (२००७), कर्नल कमांडंट हा मानद हुद्दा (२००७), अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून स्वर्गीय दादासाहेब राजळे पुरस्कार (२००८) अशी विविध पारितोषिके देऊन गौरवले आहे.

- संपादित

देशमुख, राजाराम बापूसाहेब