Skip to main content
x

देशमुख, उषा माधव

    डॉ.उषा माधव देशमुख यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे झाला. १९५२मध्ये अंमळनेर येथूनच त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. समीक्षक म्हणून सुपरिचित असणार्‍या मा. गो. देशमुख यांच्याशी विवाह झाल्यानंतर ही खानदेशी कन्या विदर्भाची सून झाली. मा. गो. देशमुखांसारख्या सुस्वभावी व शिक्षणाची आवड असणार्‍या साहित्यिकाच्या सहवासात उषाताईंना पुढील शिक्षणाची प्रेरणा मिळाली व त्यांनी १९६२ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी रौप्यपदकासह प्राप्त केली. १९६४मध्ये त्या मराठवाडा विद्यापीठातून एम.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. शिक्षणाची घोडदौड अशीच सुरू असतानाच  पीएच.डी. करण्याचे ठरविले आणि नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर केला. १९७३मध्ये नागपूर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली.

उषाताईंना अध्यापनाचा अनुभवही भरपूर प्रमाणात आहे. जवळपास चाळीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. एम.फिल. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. मुंबई विद्यापीठामध्ये मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी काही वर्षे सांभाळला आहे. सयाजीराव विद्यापीठ, बडोदे येथील मराठी अभ्यास मंडळाच्या सभासद म्हणून त्यांनी कार्य केले आहे. नागपूर व बनारस विद्यापीठातही सभासद म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेच्या त्या सभासद होत्या. १९७२ पासून त्या मुंबई विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून कार्य करीत होत्या. मुंबई विद्यापीठातून मराठी विभाग प्रमुख ह्या पदावरून त्या निवृत्त झाल्या.

प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास, साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा हे त्यांचे अभ्यासक्षेत्र असले, तरी आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास हे त्यांचे विशेष आवडीचे अभ्यासक्षेत्र आहे. संशोधन विद्या आणि पाठ संशोधन शास्त्र तसेच कोशवाङ्मय या अभ्यासक्षेत्रांचाही त्यांचा व्यासंग आहे.

प्राचीन व अर्वाचीन वाङ्मय, संत साहित्य, संशोधन, समीक्षा अशा अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले असून ‘मराठीचे साहित्यशास्त्र; रामदास ते रामजोशी’ (१९७६), ‘साहित्यरंग’ (१९७४), ‘दीपमाळ’ (१९८२), ‘मराठी साहित्याचे आदिबंध’ (१९८२), ‘काव्यदिंडी’ (१९८७), ‘साहित्य शोधणी’ (१९८९), ‘कुसुमाग्रज साहित्यदर्शन’ (१९८९), ‘साहित्यमुद्रा’ (१९९०), ‘मराठी संशोधन विद्या’ (१९८४), ‘ज्ञानेश्वरी एक शोध’ (१९९०) ‘रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव’ (१९९५) अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे ‘वाङ्मयीन व्यक्ती’, ‘साहित्य तोलन’, ‘ज्ञानेश्वरी जागरण’, ‘दलित साहित्य स्थितिगती’, ‘मराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास’ अशी काही पुस्तके त्यांनी संपादित केली आहेत.

संतसाहित्य हा मराठी वाङ्मयाला लाभलेला अनमोल ठेवा आहे. उषा देशमुख यांनी संतसाहित्याच्या अभ्यासातून व विवेचनात्मक लेखनातून या साहित्यातील मर्म उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तीविषयक  दृष्टीकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टी संतसाहित्याच्या अभ्यासासाठी पूरक होण्यास मदत होते.

डॉ.उषा देशमुख यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर मॉरिशस, युरोप यांसारख्या देशांमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये कधी अध्यक्ष म्हणून तर कधी सभासद म्हणून कार्य केले आहे. जागतिक मराठी परिषदेचे पहिले अधिवेशन (१९८९), मॉरिशस येथील दुसरे अधिवेशन(१९९१) तर जेरुसलेम (इस्त्रायल) येथील चौथे अधिवेशन यांत त्या सहभागी झाल्या होता. १९८९ मध्ये पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. १९८४ मध्ये झालेल्या वैदर्भीय लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्य संस्थांच्या त्या आजीव सभासद आहेत. विदर्भ साहित्य संघ, नागपूर; साहित्य परिषद, पुणे; मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई; अशा काही संस्थांचा नामोल्लेख करता येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नवलेखन अनुदान समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ह्या ठिकाणी त्यांनी सभासद म्हणून कार्य केले आहे.

उषाताई यांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांना पुणे विद्यापीठाचाही पुरस्कार मिळाला आहे. कांचीपीठ शंकराचार्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विदर्भ साहित्य संघाची ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे.२०१६ साली त्यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ही प्राप्त झाला आहे. 

- डॉ. संध्या पवार

देशमुख, उषा माधव