Skip to main content
x

देशपांडे, अनंत पांडुरंग

     अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी १९६२ साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील, तर १९६३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका  प्राप्त केल्या. पुणे आणि मुंबई येथील चार कारखान्यांत त्यांनी ३५ वर्षे काम केले. त्यांपैकी ३० वर्षांची कारकीर्द ‘नोसिल’ या पेट्रोरसायन कारखान्यात पार पडली. तिथूनच त्यांनी ज्येष्ठ व्यवस्थापक (इंजिनिअरिंग) या पदावर असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान त्यांनी गुणवत्ता चाचणीचा एक अभ्यासक्रम केला. तसेच अनेक वेळा सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या अनेक तपासण्या पार पाडल्या आहेत.

     १९७३ साली त्यांनी मराठी विज्ञान परिषदेचा ईशान्य मुंबई विभाग स्थापन केला आणि त्याचे कार्यवाहपद १९९१ सालापर्यंत सांभाळले. त्यातूनच त्यांचा मराठी विज्ञान परिषदेच्या (मध्यवर्ती) कार्याशी संपर्क आला. १९७२ सालच्या सातव्या वार्षिक विज्ञान संमेलनापासून देशपांडे यांचा मध्यवर्तीच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग राहिला आहे. १९७५ सालापासून गेली चौतीस वर्षे ते परिषदेचे कार्यवाहपद कुशलपणे सांभाळत आहेत. दरवर्षीच्या विज्ञान संमेलनाच्या नियोजनात त्यांचा मोठा वाटा असतो. विज्ञान भवनाचे बांधकाम पूर्ण करताना त्याचा प्रत्यय आला आहे. विज्ञान लेखकांच्या दहा परिषदा त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी भरवल्या, तसेच वेळोवेळी अनेक परिसंवाद सर्वदूर आयोजित केले आहेत.

     १९९७ साली जानेवारीत स्थापन झालेले ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’ हे केंद्र सर्वभाषिक विज्ञान लेखकांचे कार्यक्रम आयोजित करित आहे. या केंद्रानेसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले आहे. तसेच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’ ही संस्था स्थापन करून विज्ञान प्रसाराचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील केंद्राचे ते अध्यक्ष असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे ते सरचिटणीस आहेत. या सर्व संमेलनांचे, परिषदांचे आयोजन करताना, त्यांची आखणी आणि अंमलबजावणी करताना त्यांच्यातील अभियंता दिसून येतो.

     विज्ञान प्रसाराच्या या संस्थेची धुरा सांभाळताना त्यांनी समाजात ६८० च्यावर भाषणे दिली आहेत. त्यांमध्ये अनेक विषयांचा ऊहापोह त्यांनी केला. याचबरोबर २२० च्यावर भाषणे आकाशवाणीवरून दिली, तर सुमारे ५० कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सादर केलेले आहेत. सुमारे ८७५ लेख त्यांनी वेळोवेळी वर्तमानपत्रांत आणि मासिकांत लिहिले आहेत. त्यांमध्ये व्यक्तीविषयक लेख आहेतच, पण विविध विषयांचा परामर्श त्यांनी त्यात घेतला आहे. त्यांची भाषांतरित व संपादित अशी एकूण ३६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

     वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी घेतलेल्या अनेक शास्त्रज्ञांच्या मुलाखती गाजल्या आहेत. त्यांनी आकाशवाणी, मुंबई केंद्राच्या विज्ञान विभागाच्या कार्यक्रम सल्लागार समितीचे सभासद म्हणून चार वर्षे काम केले आहे, तर आठ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या विज्ञान पुस्तकांच्या निवड समितीवर परीक्षक म्हणून काम केले आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिके’च्या संपादक मंडळाचे ते आठ वर्षे सभासद होते. कार्यवाह म्हणून पत्रिकेच्या संपादनात आजही त्यांचा सहभाग आहेच. १९६७ सालापासूनचे ४१ वर्षांचे मविप पत्रिकेचे अंक सी.डी. स्वरूपात ‘प्रथम’ संस्थेच्या सहकार्याने उपलब्ध झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा फायदा परिषदेला मिळवून देण्यात देशपांडे यांचा सहभाग आहे.

     प्रा. जयंत नारळीकर आयुकाच्या संचालक पदावरून निवृत्त होताना दूरचित्रवाणीच्या पुणे केंद्राने त्यांच्यावर लघुपट काढायचा ठरवला, ती कामगिरी देशपांडे यांनी पार पाडली. तसेच आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या संग्रहासाठी डॉ. वसंत गोवारीकरांची प्रत्येकी चार तासांची प्रदीर्घ मुलाखत त्यांनी मराठी आणि इंग्रजीत घेतली आहे. संस्था व्यवस्थापनाचे अनेक धडे मराठी विज्ञान परिषदेने समाजाला घालून दिलेले आहेत, त्यांमध्ये देशपांडे यांचा वाटा फार मोठा आहे. अनेक लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची तारेवरची कसरत करीत संस्था वाढवत नेण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी आहे, म्हणूनच परिषदेचा विस्तार - कार्यक्रमांच्या विविधतेच्या अंगाने, आर्थिक उलाढालीच्या रूपाने, परिषदेच्या विभाग संख्येच्या मार्गाने - सर्वच बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक कार्यक्रमांकरिता निधी उभारणीकरिता व्यक्ती, संस्था, सार्वजनिक न्यास आणि केंद्र व राज्य सरकारचे विभाग, यांना त्यांनी परिषदेशी जोडून घेतले. मराठी विज्ञान परिषदेला जनमानसात प्राप्त झालेले स्थान ही अनेकांची एकत्रित कामगिरी असली, तरी त्यामध्ये देशपांडे यांचा वाटा लक्षणीय आहे. वर्तमानपत्रातील मराठी विज्ञान परिषदेकडे असणारी सदरे, आकाशवाणीवरील परिसर मालिका, अशा कितीतरी कामांचे परिषदेतील संयोजन देशपांडे यांनी केले आहे आणि करीत आहेत. मराठी विज्ञान परिषदेकडे शासकीय/निमशासकीय संस्थांकडून येणारी कामे वाढतच आहेत. त्यांमध्ये व्यवस्थापनाचे आणि संपादनाचे बहुतेक सर्व काम देशपांडेच सांभाळत आहेत. १९६६ ते २००३ सालापर्यंतच्या परिषदेच्या वार्षिक विज्ञान संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांचा खंड ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’ २००५ साली मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या संपादनाचे अवघड काम देशपांडे यांनी केले आहे. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाबरोबर संयुक्त विद्यमाने प्रकाशित ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश’ आणि विवेक साप्ताहिकाबरोबर संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘शिल्पकार चरित्रकोशा’मधील ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ खंड यांच्या संपादनकार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

      त्यांच्या बहुआयामी कार्यामुळे १९९५ साली त्यांना इचलकरंजीच्या फाय फाउण्डेशनने सन्मानित केले आहे. समाजात विज्ञान लोकप्रिय करण्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराचा मान त्यांना २००० साली मिळाला. शिवाय, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २००६ सालचा विज्ञान ग्रंथकार पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मराठी विज्ञान परिषदेचा संस्था म्हणून गौरव १९९२ साली राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन केला गेला. त्यामध्ये परिषदेच्या कामात देशपांडे यांचाही सहभाग मोठा आहे. वर्षानुवर्षे सतत आपला वेळ देऊन स्वयंसेवीवृत्तीने हे काम करणे ही अवघड बाब आपल्या सहयोगाने देशपांडे यांनी सोपी करून दाखवली आहे.

      त्यांचा संगीताचाही व्यासंग चांगला आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासंबंधी ‘स्वरयज्ञ’ हे पुस्तक त्याची साक्ष आहे.

      — दिलीप हेर्लेकर

देशपांडे, अनंत पांडुरंग