Skip to main content
x

देशपांडे, गजानन त्र्यंबक

नानासाहेब देशपांडे

     गजानन त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील वडनेर खेडेगावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमध्ये आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातील मॉरीस महाविद्यालयात झाले. बी.ए.ला संस्कृत या विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना ‘सरस्वतीबाई कोलते’ सुवर्णपदक प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. पुढे १९४६ मध्ये त्यांनी खाजगीरीत्या संस्कृत या विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आणि या परीक्षेतही सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना ‘दाजी हरी वाडेगावकर’ सुवर्णपदक प्राप्त झाले.

     त्यांना १९५२ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यशास्त्र’ या विषयावर व्याख्याने देण्यासाठी पाचारण करण्यात आले. या व्याख्यानांवर आधारित ‘भारतीय साहित्यशास्त्र’ हा ग्रंथ म्हणजे मराठी वाङ्मयाचे व साहित्यशास्त्राचे अनमोल लेणे होय. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. प्रस्तुत ग्रंथासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी देऊन एक प्रकारे ग्रंथाच्या अपूर्वतेची पावतीच दिली.

     नानासाहेब १९५६ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात ‘रीडर’ म्हणून रुजू झाले. पुढे ते त्याच विभागात प्राध्यापक झाले. नागपूर विद्यापीठात स्नातकोत्तर अध्यापन विभाग (मानव्यविद्या) या विभागाचे प्रमुख पद त्यांनी ‘ऑफिसर इन चार्ज’ म्हणून भूषविले. कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी वरील विद्यापीठात काही काळ कार्यभारही सांभाळला. संस्कृत विभागामध्ये व्याकरण, वेद, पुराण, मीमांसा, धर्मशास्त्र अशा बहुविध शाखा निर्माण केल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत संस्कृत विभागाची भरभराट झाली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेद, पुराणे, मीमांसा-धर्मशास्त्र, व्याकरण, अभिजात संस्कृत साहित्य, दर्शन शास्त्र, संस्कृत साहित्य शास्त्र आणि भक्ति शास्त्र या शाखांवर आधारित पीएच.डी. करण्याचे भाग्य लाभले. नागपूर विद्यापीठाच्या जर्नलचे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.

     डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये १९४६-१९५९ या काळात नानासाहेबांनी संस्कृतचे उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून लौकिक मिळविला. याच काळात त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. तसेच, अमरावती येथील लोक विद्यापीठाचे रजिस्ट्रार पददेखील सांभाळले.

     भारतीय साहित्यशास्त्र या ग्रंथामध्ये पूर्वार्धात नानासाहेबांनी भरतमुनींपासून जगन्नाथ पंडितांपर्यंत भारतीय साहित्यशास्त्राचा विकास कसा होत गेला याची सुसंगत मांडणी केली आहे. नानासाहेबांच्या मते भरत, भामह, वामन यांच्या संप्रदायांचा समन्वय होऊ शकतो. त्या सगळ्यांच्या मतांना भिन्न संप्रदाय मानणे ही वैचारिक गल्लत होय. ग्रंथाच्या उत्तरार्धात त्यांनी शब्दार्थाचे स्वरूप, अभिधा, लक्षणा, व्यंजना, व्यंगार्थ अथवा ध्वनी, रसप्रक्रिया यांसारख्या विषयांचे चिकित्सक विवेचन केले आहे. अभिनवगुप्ताच्या ‘अभिनवभारती’ व ‘ध्वन्यालोकलोचना’ या टीकांच्या आधारे विविध सिद्धान्तांची केलेली चिकित्सा या ग्रंथाला आशयघनता प्राप्त करून देते.

     रसविषयक प्रश्नामध्ये नानासाहेब म्हणतात, ‘‘रसविवेचनाचा अभ्यास करताना एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवली पाहिजे. विभाव, अनुभाव, व्यभिचारी, स्थायी इत्यादिकांचे आपण जे विवेचन करतो, ते नेहमी अपोद्धार बुद्धीने केलेले विवेचन होय; वस्तुत: रसास्वाद ही रसिकाची अखंड एकघन प्रतीती आहे. ती प्रतीती खंडश: येत नाही.’’

     ‘सांख्यकारिका’ या ग्रंथात ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकांचा नानासाहेबांनी मराठीत अनुवाद केला आहे. ‘सत्तर कारिकांपैकी ५२ कारिका प्रमाणित आहेत व उरलेल्या कारिका प्रक्षिप्त आहेत,’ असे मत नानासाहेबांनी व्यक्त केले आहे. ‘गौडपाद आणि वाचस्पती मिश्र यांच्या कारिकांवरील टीका कित्येकदा परस्परविरोधी आहेत. त्यांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक आहे,’ असे नानासाहेब म्हणतात. या ग्रंथातील सत्कार्यवाद आणि आरम्भवादाचे विवेचन वाचकाला नानासाहेबांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा प्रत्यय करून देते.

     ‘अभिनवगुप्त’ या इंग्रजी भाषेतील ग्रंथात अभिनवगुप्ताचे चरित्र आणि ग्रंथांची माहिती नानासाहेबांनी दिली असून काश्मिरी अद्वैत शैवमताचा ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. तसेच, या मताचे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले आहे. सौंदर्य मीमांसा आणि रससिद्धान्ताचे सांगोपांग विवेचन या ग्रंथात आढळते. ‘अभिनवगुप्ता’चा प्रभाव नंतरच्या साहित्यिकांवर कसा पडला याचे त्यांनी सप्रमाण प्रतिपादन केले आहे.

     ‘स्पन्दकारिका’ या ग्रंथात मूळ संस्कृत कारिकांचा इंग्रजी भाषेत अनुवाद केला असून काश्मिरी शैवमताचे विवेचन केले आहे. स्पन्द म्हणजे शिवाची शक्ती! प्रतिभा! साहित्यशास्त्रातील प्रतिभेचे शक्तीशी असलेले नाते स्पष्ट करताना नानासाहेबांच्या मूलगामी प्रतिभेचा विलास अनुभवास येतो.

    ‘अलंकारप्रदीप’ हे पुस्तक नानासाहेब व प्रा. पु.गो. निजसुरे या दोघांनी मिळून लिहिले. अमरावतीच्या ठाकूर आणि कंपनी लिमिटेड या प्रकाशन संस्थेने १ ऑगस्ट १९५४ या दिवशी ते प्रकाशित केले. या पुस्तकाची या दोन्ही लेखकांनी शब्दबद्ध केलेली ‘शब्दशक्ती आणि अलंकार’ ही प्रस्तावना शब्दार्थ, रस, गुणालंकार, अभिधा, लक्षणा, व्यंजना, शब्दालंकार, अर्थालंकार या विषयांच्या साक्षेपी विवेचनाने मंडित झालेली आहे. संस्कृत आणि मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक लिहिण्यात आले. विदर्भ संशोधन मंडळाच्या ‘इंडॉलॉजिकल पेपर्स’मध्ये नानासाहेबांच्या संशोधनपत्रांचा समावेश आहे.

     १९५० साली नानासाहेबांनी ‘किरातार्जुनीयम्’ या भारवीच्या महाकाव्याच्या आवृत्तीचे संपादन केले, तसेच ‘वैदर्भी रीति’ (‘तरुण भारत’ दिवाळी अंक, १९४७), ‘भवभूतीच्या करुणरसाचे विवर्त’ (‘युगवाणी’, एप्रिल १९४८), ‘ऋग्वेदातील साहित्य’ (‘युगवाणी’, जानेवारी १९५१), ‘साहित्यशास्त्रातील काही प्राचीन वाद’ (‘सत्यकथा’, जुलै १९५३) यांसारख्या अनेकविध अभ्यासपूर्ण लेखांनी त्यांनी वैचारिक वाङ्मयात मोलाची भर घातली. ‘मेघदूतातील फुले’ यासारख्या नाविन्यपूर्ण विषयावरची त्यांची व्याख्याने रसिक मनाला भावली. नोव्हेंबर १९५३ मध्ये नानासाहेबांनी वाई येथे प्राज्ञ पाठशाळेतर्फे ‘मीमांसा व कायदेशास्त्र’ या विषयावर व्याख्याने दिली.

     याशिवाय नागपूर येथे अयाचित मंदिरात आद्य शंकराचार्य जयंती उत्सवात नानासाहेबांनी ‘शंकराचार्य-स्तोत्रे व त्यातील गूढार्थ’ या विषयावर प्रवचन दिले. नागपुरातीलच दक्षिणामूर्ती मंदिरात ‘आद्य शंकराचार्य व अभिनवगुप्त’ या विषयावरही त्यांनी प्रवचन केले.

    जीवनवाद आणि कलावादाचा संगम असलेला अलोैकिकतावाद हे नानासाहेबांच्या लिखाणाचे सूत्र आहे. वाङ्मयातील अनुभव आस्वाद योग्य असावा, तो जीवनमूल्यांचे समर्थन करणारा व जीवनमूल्यविरोधी तत्त्वांना विरोध करणारा असावा, असे त्यांचे मत होते. हे मत भविष्यकाळातील लेखकांची वाट एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उजळून टाकण्यास समर्थ आहे.

डॉ. कला आचार्य

देशपांडे, गजानन त्र्यंबक