Skip to main content
x

देशपांडे, जनार्दन गोविंद

       देशपांडे गुरूजींचा जन्म पुण्यापासून ४० कि.मी. दूर वडगाव मावळमधील ओवळे गावी एका धार्मिक व सत्वशील घराण्यात झाला. गावातील विठ्ठल मंदिरात बसून राहण्याचा, धार्मिक पुस्तके वाचण्याचा छंद त्यांना लहानपणीच होता. ओवळे गावी शिक्षणाची सोय नव्हती म्हणून पौड येथे लोकलबोर्डात शिक्षकाच्या असलेल्या आपल्या गणेश गोपाळ हेजिब (मामा) यांच्याकडे राहून त्यांनी पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिक्षण पुणे येथे के. एस. महाजन वकील यांच्या वाड्यात म्युनि.शाळा नं. ८ मध्ये झाले. या शाळेचे हेडमास्तर हेरंब गजानन देव यांनी जनार्दनास आदर्श शिक्षक होण्याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.

      त्यावेळी कराची मुंबई इलाख्यात होती. तेथे त्यांचे दुसरे मामा रेल्वेत नोकरीला होते. जनार्दन नोकरीच्या शोधात कराचीत १९१९ मध्ये गेले. कराची म्युनि. शाळेत नोकरी मिळाली. दिवसा नोकरी करून व रात्रशाळेत जाऊन १९२२ मध्ये ते मॅट्रिक झाले. याच काळात हिंदीच्या चार परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हापासून २९ वर्षे ते कराची येथे रामबाग गाडी खाता, चोपशी उमरशी इमारतीच्या वरच्या मजल्यावर मामांच्या परिवारात राहात. त्या काळात कराचीत रामबाण गाडी खाता व रामस्वामी गाडी खाता भागात ९० हजार एवढी महाराष्ट्रीयांची वस्ती असून १०-१२ मराठी शाळा व पाच सहा मंदिरे ही होती. १९२३ ते २७ या काळात यांनी पुण्याचा ट्रेनिंग कॉलेजचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

      गुरूजी कराचीत २ मैल अंतरावर सदरबझार येथील शाळेत पायी जात, तेही अनवाणी. थंड पाण्याने स्नान करीत. दूर रामनवमीला ओवळे येथे येत. त्यांनी सर्व तीर्थयात्रा ही केल्या. १९३५ ते ४७ या काळातल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत त्यांनी काशी येथे वास्तव्य केले. तेथे राजेश्‍वर शास्त्री द्रविड यांच्या विद्यालयात वेदाध्ययन केले. पाचच घरी माधुकरी मागून ते चरितार्थ चालवीत. शाळेत गलांडे व शंकरराव जोशी हे त्यांचे सहकारी शिक्षक होते. गुरूजींची शिकविण्याची पद्धत, त्यांच्या वर्गाचा वार्षिक परीक्षेचा उत्तम निकाल व शाळेतील कामाबाबतची तळमळ या गुणांमुळे त्यांना एच. व्ही. मराठा विद्यालय (कराची) जे विद्यालय प्रमुख करण्यात आले. त्यांच्याच इमारतीच्या तळमजल्यावर मुसलमान पतिपत्नी आपल्या दोन मुलांसह राहात. ही मुसलमान स्त्री गुरूजींच्या गुणांशी परिचित होती. ती त्यांना पाक (पवित्र) समजत असे व भाऊ मानीत असे. तिची मुले रोज गुरूजींकडे शिकायला येत. १९३९ - ४७ पर्यंत गुरूजी भाऊबिजेस तिला भाऊबीज घालीत.

      भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट रात्री १२ वाजता पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाले. आणि कराचीत (खिलाफत चळवळी पासूनच) सुरवात झालेला हिंदूद्वेष आता पराकोटीला गेला. हिंदूंच्या वर जुलूम, देवळांचा विध्वंस, मूर्तींना विद्रूप कऱणे, हिंदू स्त्रियांवर अत्याचार, खून, लुटालूट अशा प्रकारांना ऊत आला. रस्त्यांवर हिंदूंच्या प्रेतांचा खच पडू लागला. एकदा चोपशी उमरशी इमारतीमध्ये मुसलमान गुंड अत्याचारासाठी घुसले व गुरूजींवर सुरा उगारला एवढ्यात गुरूजींची मानलेली बहीण पुढे सरसावली व म्हणाली हा माझा भाऊ आहे. युसूफचे वडील म्हणाले, “गुरूजी तुम्ही खोलीच्या बाहेर पडू नका. मी तुम्हाला मुंबईचे तिकिट आणून देतो व मुंबईस जाणाऱ्या बोटीवर सुरक्षित पोचवतो”. देशपांडे गुरूजींची कर्तव्यबुद्धी एवढी जाज्वल्य की ते म्हणाले, “मी मुख्याध्यापक आहे. माझ्या जागेवर स्थानिक मुख्याध्यापक येत नाहीत तोपर्यंत मला कराची सोडता येणार नाही. मग माझे काहीही होवो.” पुन्हा एकदा गुंड हल्ला करण्यासाठी इमारतीमध्ये आले पण कोणी दरवाजात बेशुद्ध पडले, कोणी आंधळे झाले. तेव्हापासून चोपशी उमरशी इमारत भुताचा वाडा म्हणून प्रसिद्ध झाली. अनेक मराठी कुटुंबे भारतात पोचली, पण काही कुटुंबे भुताच्या वाड्यात सुरक्षित राहाण्यास आली. रेल्वेमार्ग बंद होता. बोटीसाठी लांबचलांब रांगा लागत. काही लोक एक वस्त्रानिशी मालवाहू बोटीने रवाना झाले.

     देशपांडे गुरूजी ज्या शाळा क्रमांक ५ चे मुख्याध्यापक होते त्या शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्या आईवडिलांसह भारतात गेल्याने नोव्हेंबर १९४७ अखेर ती शाळा बंद पडली. लागू नावाचे प्रशासनिक अधिकारी शिक्षकांस ग्रॅच्युइटी, फंड वगैरे मिळावा म्हणून मार्च १९४८ पर्यंत प्रयत्न करीत थांबले व भारतात परतले. कराचीत निर्वासित कँप उघडण्यात आले व सैन्याचा पहारा ठेवण्यात आला. कराची मधील म्युनि. शिक्षक संघाचे सचिव केशव बाबाजी कांदळगावकर यांनी मुंबई राज्याच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून कराची मधील सर्व प्राथमिक शिक्षकांना रत्नागिरी, नाशिक, सातारा, पुणे, धुळे, अहमदनगर इत्यादी ठिकाणच्या शाळातून सामावून घ्यावे असा प्रयत्न केला. त्यास यश आले. गुरूजींच्या मानलेल्या मुसलमान बहिणीच्या पतीने केमारी बंदरापर्यंत साडेसात मैल पायी बरोबर जाऊन गुरूजींना - कँपमध्ये सुरक्षित पोचवून वारंवार कुर्निसात केला व अत्यंत जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.

     निर्वासित कँपमध्ये २५ - ३० प्राथमिक शिक्षक व १० - १५ विद्यालयामधील महाराष्ट्रीय शिक्षक होते ते सर्वजण केवळ एका कपड्यानिशी मायभूमीस परतले. कराचीतल्या नोकरीच्या वर्षांचा, ग्रॅच्युइटी, फंड वगैरे लाभ त्यांना मिळाला नाही.

     आपली २९ वर्षांची शिक्षकाची कारकीर्द पार पाडून भारतात परत आलेल्या देशपांडे गुरूजींना खेड - शिवापूर सारख्या छोट्याशा खेड्यात प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. निष्ठेने कार्य करून, वेगवेगळे विषय हाताळून गुरूजी प्रत्येक विद्यार्थ्यांचे सूक्ष्म निरीक्षण करीत व त्याचा कल कोणत्या विषयाकडे आहे ते पाहून ठेवीत. अध्यापन पद्धतीत त्यांनी आमूलाग्र बदल घडविला. मुली शाळेत जवळजवळ नसतच. गुरूजी पायपीट करून आसपासच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत. २-३ वर्षांत मुलींची संख्या वाढू लागली. ते मुलींना जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे उदाहरण देत व चांगले संस्कार करीत. पूर्वी जेमतेम १७-१८ विद्यार्थी अंतिम परीक्षेस बसत व निकालही यथातथा लागे. गुरूजींच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांची फायनलसाठी संख्या ५० वर गेली व निकाल ९५ टक्के लागला. १९५२ - ५३ साली गणिताच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुरूजींचा विद्यार्थी (जाधव) पुणेे जिल्ह्यात पहिला आला. गुरूजींनी प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केला व त्यांना वर्तमानपत्र वाचता येण्याइतपत शिकविले. गुरूजींनी अस्पृश्यता कधीच मानली नाही. ते भौतिक ज्ञानाबरोबर धर्मनिष्ठेचा विकास करण्यासाठी स्वतः धार्मिक कृत्ये करीत व लोकांकडून करवून घेत. जीवनाला ईश्‍वराचे अधिष्ठान असायला हवे हा भाव त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न केला. खेडला आल्यावर, शाळा सुटल्यावर शाळेतच बसून ते शिवापूर - बांदेवाडी व आसपासच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवीत. गुरूजी १९५५ मध्ये खेड शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. ओवळे येथील मारूती मंदिराच्या जागी त्यांनी राममंदिर बांधले. १९४८ मध्ये बांदेवाडी परिसरात १५ - १६ विहिरी होत्या. गुरूजींनी दाखविलेल्या जागी विहिरी खोदल्या गेल्या. आता विहिरींची संख्या ३५ वर पोचली आहे. पाकिस्तानातून आल्यापासून सात वर्षे त्यांनी शिक्षकाचे काम केले. अध्यात्माची काम धरूनही त्यांनी आपला शिक्षकी पेशा निष्ठेने व सातत्याने सांभाळून एक आदर्श निर्माण केला.

      - वि. ग. जोशी

देशपांडे, जनार्दन गोविंद