Skip to main content
x

देशपांडे, कमला गोपाळ

 डॉकमलाबाई गोपाळराव देशपांडे ह्या साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर ह्यांच्या कन्या. त्यांचा विवाह सातार्‍याचे गोपाळराव कुशाभाऊ देशपांडे ह्यांच्याशी दि. २८ मे १९१० रोजी झाला. १९१२ च्या डिसेंबर महिन्यात त्यांना पुत्रप्राप्ती झाली. दुर्दैवाने १९१३ मध्ये गोपाळरावांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि कमलाबाई विधवा झाल्या. त्या काळात विधवांची स्थिती अतिशय वाईट होती. केशवपनाची रूढी होती. पण कमलाबाई ह्या रूढींपुढे नमल्या नाहीत. सकेशा विधवा म्हणून वावरताना त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. विधवेच्या वाट्याला येणारी अवहेलना त्यांच्याही वाट्याला आली. पण हे सगळे सहन करीत १९१७ मध्ये पुण्याच्या हुजूरपागेतून त्या मॅट्रिक झाल्या. १९२० मध्ये पुण्याच्या कर्वे विद्यापीठातून त्यांनी  गृहिता गमा (जी.ए.) पदवी मिळविली.

याच काळात स्त्रीने शिकले पाहिजे, आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचारातून महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रमाचे काम सुरू केले होते. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कन्याशाळा निघाल्या तर स्त्रीशिक्षणाचा प्रसार होईल ह्या अण्णांच्या आवाहनाला सातार्‍यातील डॉ. पंढरीनाथ घाणेकर, डॉ. मो. ना. आगाशे, कमलाबाईंचे दीर वाग्भट देशपांडे यांनी प्रतिसाद दिला. 

वाग्भट देशपांडे ह्यांच्या घराच्या ओसरीवर १९२२ च्या आश्‍विन अमावस्येला सातार्‍याच्या कन्याशाळेचा प्रारंभ झाला. कमलाबाईंवर शाळेच्या प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. आपल्या पुढील शिक्षणाचा विचार बाजूला सारून कमलाबाईंनी ही जबाबदारी स्वीकारली.

सुरुवातीच्या काळात इतर शिक्षकांचे पगार त्यांनी दिले. स्वत: विनावेतन काम केले. शाळा सारवणे, भिंती रंगवणे इथपासून घरोघरी जाऊन पैसे जमा करणे, शाळेसाठी मुली जमविणे इथपर्यंतची कामे त्यांनी केली. हे करीत असताना समाजाच्या प्रखर विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागले. पण त्या आपल्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत. काही वर्षे पुण्याच्या महिला पाठशाळेत संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. हुजुरपागेच्या मुलींच्या कॉलेजात प्राचार्या म्हणून व नंतर पुणे विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून कमलाबाई काम करीत होत्या.

कमलाबाईंचे व्यक्तिमत्त्व कर्तव्यकठोर होते. त्याचबरोबर सर्वांविषयी आपलेपणा, ध्येयवाद, कार्यनिष्ठा, तेजस्वी बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता हेही विशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. स्वत:च्या उत्पन्नाचा २० टक्के भाग त्या सामाजिक कार्यासाठी देत.

१६ मार्च १९२९ रोजी त्यांनी परदेशी प्रयाण केले. १९३१ मध्ये त्यांचा द चिल्ड्रन ऑफ एन्शन्ट इंडियाया विषयावरील प्रबंध पूर्ण झाला. त्यांना झेकोस्लोव्हाकियाच्या प्राग विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मिळाली. प्रबंधासाठी त्यांनी जर्मन भाषेचा अभ्यास केला. परदेशातील वास्तव्यात त्यांनी आपला पेहराव, आपला आहार, आपली राहणी, आपले विचार, आपली संस्कृती ह्यात कधीही कोणताही बदल केला नाही. भारतात परत आल्यावर त्यांचे कार्य चालू राहिले.

स्मरणसाखळीह्या कमलाबाईंच्या आत्मचरित्रात त्या काळातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचे प्रातिनिधिक चित्रण आहे. १९४३ मध्ये ते प्रकाशित झाले. कमलाबाईंनी कथा, कविता, शब्दचित्रे असे विविध लेखन केले. स्त्रीगीतांचे संशोधन करून त्यांनी अपौरुषेय वाङ्मय अर्थात स्त्रीगीतेहे पुस्तक लिहिले.

सतीबंदी कायद्यापासून ते हिंदू कोड बिलापर्यंत स्त्रियांसाठी असणार्‍या कायद्यांचा अभ्यास करून स्त्रियांच्या कायद्याची वाटचालहे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला १९६१ चा न. चिं. केळकर वाङ्मय पुरस्कार मिळाला.

अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, महाराष्ट्रातील संतस्त्रिया याविषयी त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानमालेतही त्यांचा सहभाग असे.

स्त्रीला प्रतिष्ठा लाभावी, तिला समाजात मानाने जगता यावे म्हणून आयुष्यभर कमलाबाई तनमनाने झिजल्या. स्वत: केशवपन न करता सकेशा राहून केशवपनाला स्मृतींमध्ये आधार नाही. ती एक रूढी आहे,’ हे त्यांनी कायद्याने सिद्ध केले. विधवांना मंदिरप्रवेश खुला झाला ही स्त्रीजीवनातील मोठी क्रांतीच होती.

वयाच्या अवघ्या पंधराव्या  वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी भारत सेविका समाजाची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले.  महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेच्या त्या आजीव सदस्या होत्या.

सातार्‍यासारख्या गावात कमलाबाईंच्या अथक प्रयत्नांतून स्त्रीशिक्षणाची पायवाट निर्माण झाली. आज ह्या पायवाटेचे राजरस्त्यात रूपांतर झाले आहे. हे सर्व कमलाबाईंचे अनन्यसाधारण कर्तृत्व आहे.

- डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].