Skip to main content
x

देशपांडे, कुसुमावती आत्माराम

     कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील जलालपूर येथे झाला. शिक्षण गर्ल्स हायस्कूल उमरावती, पुढे हुजूरपागा, पुणे येथे झाले. १९२१ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश. १९२६मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने बी.ए. झाल्या. १९२७ साली मध्य प्रदेश व विदर्भ सरकारची खास शिष्यवृत्ती मिळवून  त्यांनी लंडन येथील वेस्टा फिल्ड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. १९२९ साली ‘इंग्रजी साहित्य’ हा विषय घेऊन तिथेही बी.ए. (ऑनर्स) पदवी प्राप्त केली.

नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून १९३१ साली नेमणूक झाली. १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात तर १९५७ साली दिल्ली आकाशवाणी संचनालयात चीफ प्रोड्यूसर म्हणून कार्यरत होत्या. विदर्भातील प्रख्यात वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत यांच्या त्या कन्या असून मुळातच बुद्धीमान होत्या. फर्गसन महाविद्यालयात असताना १९२२साली आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी परिचय झाला. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. आंतरजातीय विवाहाला घरातून प्रखर विरोध झाला. १९२९ साली लंडनहून परतल्यावर त्यांचा विवाह झाला; तो तेव्हा गाजला होता.

१९३१ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या ‘किर्लोस्कर’मध्ये त्यांची ‘मृगाचा पाऊस’ ही कथा प्रसिद्ध झाली. ती त्यांची पहिली कथा होय. त्यांनी एकूण ४८ कथा लिहिल्या. ‘दमडी’, ‘चिंधी’, ‘कला धोबिणीचे वैधव्य’, ‘लहरी’, ‘गवताचे पाते’ अशा त्यांच्या काही कथा आहेत. ‘प्रतिभा’, ‘ज्योत्स्ना’, ‘अभिरुची’ व ‘सत्यकथा’ या नियतकालिकांशी त्यांचा संबंध राहिला. त्यांच्या कथांमधून तत्कालीन सामाजिक वास्तवाचे व विशेषतः सर्वसामान्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे अल्पाक्षरी पण चित्रमय शैलीत वेधक चित्रण आढळते. मध्यमवर्गीय जीवनाचीही चित्रे त्यांनी समर्थपणे रंगवली. ‘दमडी’मध्ये तर संज्ञाप्रवाहाचा सुंदर वापर त्यांनी केला आहे. चिंतनशीलता, काव्यात्मता, अर्थपूर्णता हे त्यांच्या कथांचे विशेष दिसतात. त्यांच्या कथांचा स्वतंत्र असा संग्रह प्रसिद्ध झाला नाही. १९५८ साली रा. ज. देशमुख प्रकाशनाने त्यांच्या निवडक ३१ कथांचा संग्रह ‘दीपमाळ’ या शीर्षकाने प्रकाशित केला होता व त्याला वि. स. खांडेकर यांची विस्तृत प्रस्तावना लाभली होती. त्यांच्या कथांमध्ये नवकथेची बीजे आढळतात असे समीक्षकांचे निरीक्षण आहे.

ना. सी. फडके, वि. स. खांडेकर व अनंत काणेकर ज्या काळात लघुनिबंध लिहीत होते, त्याच काळात त्यांनी ‘माध्यान्ह’, ‘मध्यरात्र’, ‘मोळी’, ‘चंद्रास्त’ व ‘एक संध्याकाळ-चिंतनिका’ असे पाच ललित निबंध लिहिले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून या लेखांमधून त्यांच्या रसिक व व्यासंगी व्यक्तित्त्वाचा; अंतर्मुख, चिंतनशील व काव्यात्म लेखनाचा प्रत्यय येतो. पुढे दुर्गा भागवत व इरावती कर्वे यांनी याच मार्गावरून संख्यात्म व गुणात्मदृष्ट्या लक्षणीय लेखन केल्याचे दिसते.

कुसुमावती मूलतः जीवनवादी होत्या. त्यांच्या प्रारंभीच्या लेखनावर मार्क्सवादाची सौम्य छाया दिसते. पण पुढे त्यांना साहित्यकृतीतील जीवन समस्यांइतकीच तिच्यातून आविष्कृत होणार्‍या सौंदर्याचीही महती पटली. या अर्थाने त्या समन्वयवादी होत्या, असे म्हणता येते. तथापि त्यांचा आग्रह राहिला तो लेखकाच्या जीवनसमस्यांविषयक बांधीलकीशी. ‘वाङ्मयाचा आस्वाद’, ‘वाङ्मयीन समीक्षेचे निकष’, ‘वाङ्मयीन समीक्षा: सौंदर्याची नवप्रतीती’, ‘नवसाहित्याचे काही प्रश्न’ हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा लेख होत. ‘कवींची काव्यदृष्टी’, ‘नवा शिपाई’, ‘आम्ही कोण?’ व ‘केशवसुतांच्या काव्यदृष्टीतील उत्क्रांतिमार्ग’ हे त्यांनी लिहिलेले उपयोजित वा आस्वादक समीक्षा-लेख म्हणता येतात. ‘दीपकळी’ (१९३५), ‘दीपदान’ (१९४१) व ‘मोळी’ (१९४६) या त्यांच्या संग्रहांमध्ये कथा, ललित निबंध व समीक्षा लेख यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. केवळ समीक्षा-लेखांचा संग्रह म्हणून ‘पासंग’ (१९५४) प्रसिद्ध झाला. पुढे त्यात भर घालून प्रथम १९६१ व नंतर १९७१ साली त्याच्या पुढील आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या.

कुसुमावती ‘मुंबई मराठी साहित्य संघाच्या’ वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यानमाले’च्या १९४८ व १९५१ सालांच्या महनीय प्रवक्त्या होत्या. त्यांनी तेव्हा तिथे दिलेल्या व्याख्यानांवरून ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ हा ग्रंथ दोन भागांत प्रकाशित झाला. (पहिला भाग: १९५३ व दुसरा भाग: १९५६, पुढे दोन्ही भाग एकत्र: १९७५) त्यात मराठी कादंबरीच्या प्रारंभापासून १९५० पर्यंत म्हणजे विभावरी शिरूरकर यांच्या ‘बळी’ कादंबरीपर्यंतच्या मराठी कादंबर्‍यांच्या स्थिती-गतीचा, चढ-उतारांचा त्यांनी आलेख काढला आहे. मराठी कादंबर्‍यांचा मानदंड म्हणून त्यांनी हरिभाऊ आपटे यांच्या ‘पण लक्ष्यात कोण घेतो?’ या कादंबरीचा उल्लेख केला आहे. समाजसन्मुखता व मानवतापूर्ण दृष्टीकोन हे दोन महत्त्वाचे निकष त्यांनी तिथे नोंदवले आहेत. श्रेष्ठ प्रकारच्या साहित्याच्या वाचनाने वाचकाच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, कलात्मक सौंदर्याची त्याला प्रतीती येते; हे त्यांच्या साहित्यविचाराचे सूत्रही त्यांनी तिथे प्रारंभी विशद करून मराठी कादंबरीचा लेखाजोखा मांडला आहे.

१९२२ ते १९२७ दरम्यान त्यांचा आणि अनिलांचा पत्रव्यवहार झाला होता. महाविद्यालयीन तरुणांची प्रेमपत्रे, त्यांच्या तत्कालीन भावना, घरचा विरोध आणि त्याला न जुमानता वर उसळी मारून येणारी भावोत्कट प्रेमवृत्ती, त्याचे तरल व काव्यपूर्ण शब्दांतील चित्रण म्हणून सामाजिक दस्तऐवज या दृष्टीने ही पत्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ह. वि. मोटे प्रकाशनाने त्यांच्या व अनिलांच्या अशा निवडक पत्रांचा संग्रह ‘कुसुमानिल’ शीर्षकाने १९७२ साली प्रकाशित केला.

त्यांनी लिहिलेले ‘थेंबांचा खेळ’ हे बालगीत ‘Children’s Book Trust’तर्फे प्रकाशित झाले आहे तर रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ या आत्मचरित्राचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. शिवाय साहित्य अकादमीने १९६६ साली त्यांचे ‘Marathi Sahitya’ या शीर्षकाने मराठी साहित्याचा आढावा घेणारे इंग्रजीतील पुस्तक प्रकाशित केले. साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळाच्या त्या निमंत्रक सदस्य होत्या.

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे यांनी आयोजित केलेल्या ‘बडोदे साहित्य संमेलन, १९४८ च्या त्या अध्यक्षा होत्या. १९५८ साली गोरेगाव, मुंबई येथे झालेल्या ‘मुंबई उपनगर साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. तर १९६१ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद हा सर्वोच्च मानसन्मान लाभलेल्या त्या पहिल्या विदुषी ठरल्या. अध्यक्षीय भाषणातील त्यांचे विचार रसिकांचे नि जाणकारांचे चर्चाविषय झालेले असतानाच त्यांचे अनपेक्षितरीत्या हृदयविकाराने निधन झाले. 

- डॉ. अनंत देशमुख

देशपांडे, कुसुमावती आत्माराम