Skip to main content
x

देशपांडे, माधव मुरलीधर

     ‘मेरिकेतील पुणेकर संस्कृत पंडित’ डॉ. माधव मुरलीधर देशपांडे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव मंदाकिनी आणि वडिलांचे नाव मुरलीधर वासुदेव देशपांडे होते. ते संस्कृत विषयात बी. ए. असून फर्ग्युसन महाविद्यालयातील ग्रंथालयात काम करीत होते. ते मोठे पुस्तकप्रेमी  गृहस्थ असून त्यांचा मित्रपरिवार संस्कृत क्षेत्रातलाच होता. त्यामुळे त्या विषयातील घडामोडींची चर्चा घरात कानावर पडे. याचा परिणाम असा झाला की, लहानपणापासूनच डॉ. देशपांडे यांना संस्कृत या विषयाची गोडी वाटू लागली.

     एस. एस. सी. परीक्षेत अत्यंत मानाची समजली जाणारी पहिली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांनी पटकावली (१९६२). पुढील शिक्षणातही संस्कृत विषयातील पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. इतकेच नव्हे तर पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. (१९६६) व पुणे विद्यापीठातून एम.ए. (१९६८) उत्तीर्ण होताना केवळ संस्कृत विषयात नाही तर सर्व विषयांतील विद्यार्थ्यांत विद्यापीठात ते सर्वप्रथम आले.

     शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच १९५८ ते १९६८ ही दहा वर्षे देशपांडे यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे पारंपरिक शास्त्रे आणि काव्ये यांचा अभ्यास केला.

     पुणे विद्यापीठात एम.ए. करत असताना तेथील व्याकरणाचे नामांकित प्राध्यापक डॉ. शि.द. जोशी हे देशपांडे यांच्या वडिलांचे जवळचे स्नेहीही होते. त्यांच्या प्रभावामुळे पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचे देशपांडे यांनी ठरविले. डॉ. जोशी हे स्वतः पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण आत्मसात करून पुढे हार्वर्ड विद्यापीठात शिकून आले होते.

     आपल्या विद्यार्थ्यांनी परदेशी जाऊन तेथील प्रगत व चिकित्सक संशोधन पद्धती शिकून यावी असा त्यांचा आग्रह होता. मुख्यतः त्यांच्या प्रोत्साहनानेच देशपांडे अमेरिकेतील पेन्सिल्व्हॅनिया विद्यापीठात दाखल झाले. तेथे  त्यांना ग्रॅज्युएट फेलोशिपही मिळाली. ‘ओरिएंटल स्टडीज्’मध्ये पीएच. डी. मिळवून डॉ. देशपांडे मायदेशी परतले (मे १९७३). पण त्या सुमारास पुणे विद्यापीठात झालेल्या काही घडामोडींमुळे तेथील सर्व नव्या नेमणुकांवर बंदी घालण्यात आली होती. योगायोगाने त्याच वेळी देशपांडे यांची अमेरिकेतील अनार्बर येथे मिशिगन विद्यापीठात प्राध्यापकपदी नेमणूक झाली. आशियाई भाषा, संस्कृत विभाग आणि भाषा विज्ञान विभागात ते संस्कृत भाषा आणि हिंदू संस्कृती या विषयाचे प्राध्यापक आहेत. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करताना येथील पारंपरिक अध्ययन पद्धतीबरोबरच त्या ग्रंथांचा ऐतिहासिक, तौलनिक, सामाजिक व राजकीय संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न डॉ. देशपांडे करतात. संस्कृत व्याकरण परंपरा, संस्कृत उच्चारणशास्त्र, ऐतिहासिक व सामाजिक भाषाविज्ञान, भारतातील इंडो-आर्यन भाषा तसेच हिंदू, बौद्ध व जैन या धार्मिक आणि दार्शनिक परंपरा हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या विषयांवर आत्तापर्यंत त्यांची १५ पुस्तके व १५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा अभ्यास असल्याने डॉ. देशपांडे यांचे संशोधनपर लिखाण लक्षणीय झाले आहे.

      संस्कृत भाषा परदेशी विद्यार्थ्यांना शिकविताना  विशिष्ट धर्माची, गूढ किंवा मृत भाषा म्हणून न शिकविता अन्य भाषांप्रमाणेच ती शिकवावी असा त्यांचा दृष्टीकोन आहे. त्यानुसार शिकविताना आलेले अनुभव लक्षात घेऊन ‘संस्कृत प्रबोधिनी’ हे पाठ्यपुस्तक देशपांडे यांनी इंग्रजीत लिहिले आहे. जडजंबाल व्याकरणाचे ओझे न वाटता सोपेपणाने संस्कृत शिकविण्याचा प्रयत्न यात केला आहे. आजही युरोप-अमेरिकेत विद्यापीठ स्तरावरील अनेक विद्यार्थी हे पाठ्यपुस्तक वापरत आहेत.

     पुण्यात विद्यार्थी असताना देशपांडे यांनी अनेक संस्कृत काव्ये व नाटके लिहिली. संस्कृत नाटकात अभिनय केला. वक्तृत्व स्पर्धांत पदके मिळविली. पुढे अमेरिकेत गेल्यावर परिषदांच्या निमित्ताने जगभर प्रवास केला. अनेक शास्त्रीय व वाङ्मयीन चर्चासत्रांत भाग घेतला. आपले दोन गुरुजी डॉ. शि.द. जोशी व प्रा. कार्दोना यांच्या तसेच अनेक अन्य विद्वानांच्या गौरवग्रंथांचे संपादनही डॉ. देशपांडे यांनी केले आहे.

     गेली ४० हून अधिक वर्षे डॉ. देशपांडे अमेरिकेत आहेत. पण ते मराठीला विसरले नाहीत. सन  १९९३ मध्ये त्यांनी पुण्यात मराठीतून दिलेल्या नऊ व्याख्यानांचे परिवर्धित आणि परिष्कृत रूप ‘संस्कृत आणि प्राकृत भाषा-व्यवहार, नियमन आणि शास्त्रचर्चा’ या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले आहे. गेल्या तीन-चार हजार वर्षांतल्या संस्कृत व प्राकृत भाषांविषयीच्या परिवर्तनशील कल्पनांचा इतिहास या पुस्तकात देशपांडे यांनी उभा केला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिकही मिळाले आहे (१९९५).

     सन १९८३ च्या सुमारास ‘काय रायटर’ हे सॉफ्टवेअर वापरून डॉ. देशपांडे यांनी संगणकावर देवनागरी वापरण्याची प्रणाली विकसित केली असून तिचा अनेक ठिकाणी वापर होत आहे.

डॉ. प्रतिभा मोहन पिंगळे

देशपांडे, माधव मुरलीधर