Skip to main content
x

देशपांडे, नारायण रंगनाथ

        ‘आपले पशुपालन फायदेशीर करावयाचे असेल, तर आपल्या पशूंना पोटभर संतुलित आहार कमी खर्चात मिळवणे गरजेचे आहे. यासाठी चराऊ कुरणांची निगा, शास्त्रीय चराई, गवताची योग्य वेळी कापणी, गवत वाळवणे व गवताची उत्तम साठवण करणे, तसेच पौष्टिक पाला देणाऱ्या झाडांची वनशेती करणे आवश्यक आहे. शासन स्तरावर यासाठी मदत उपलब्ध असता पशुपालकाने उदासीनता दाखवली, तर ते केवळ आपलेच नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे.’ केवळ शालान्त परीक्षा उत्तीर्ण असतानाही स्वतःचे संशोधन आणि अनुभव याच्या हिमतीवर बंदिस्त शेळीपालनाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या नारायण रंगनाथ देशपांडे यांचे हे विचार आहेत.

        सांगली जिल्ह्यातील दुष्काळी, खडकाळ माळरानाने भरलेल्या आटपाडी तालुकांतर्गत गोमेवाडी हे देशपांडे कुटुंबीयांचे मूळ गाव. धार्मिक, अध्यात्मवादी, वारकरी संप्रदायाच्या घराण्यात नारायण रंगनाथ देशपांडे यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गोमेवाडी व आटपाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले. गांधीहत्येनंतर पश्‍चिम महाराष्ट्रात उसळलेल्या उद्रेकात देशपांडे यांच्या गोमेवाडी घराची आणि प्रपंचाची राखरांगोळी झाली व कुटुंब उघड्यावर पडले. कृषी पदवीधर होऊन पुढे शेती करावी, हा विचार आर्थिक अडचणीमुळे सोडावा लागल्याने शालान्त परीक्षेनंतरच १९५४मध्ये देशपांडे शेती व्यवसायात शिरले. रोज दिवसभर झालेल्या कामाची नोंद आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करून काटकसरीने हा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवले. परिणामी त्यांना महाराष्ट्र शासनाने १९६८मध्ये शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरवले.

        ‘शेतीचा विकास भांडवलाअभावी नाही, तर उपलब्ध भांडवल शेतीच्या शास्त्राप्रमाणे व शास्त्रज्ञांच्या शिफारसीप्रमाणे उत्तम व्यवस्थापनाखाली खर्च न केल्याने थांबतो’, यावर देशपांडे यांचा दृढ विश्‍वास आहे. धरणाचे पाणी आटपाडीत आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून संघटितपणे श्रीपूर (सोलापूर) व रेठरे बु. (सातारा) येथील साखर कारखान्यांना १५ वर्षे सातत्याने उसाचा पुरवठा केला व या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना भरपूर पैसा मिळवून दिला. सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे धोरण ठरवणाऱ्या तज्ज्ञ कमिटीवर काम केल्यानंतर जिल्हा भूविकास बँकेवर संचालक म्हणून सातत्याने आठ वर्षे बिनविरोध निवडले गेले. आटपाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी भू-विकास बँकेची कर्जे मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

        देशपांडे यांनी १९७५मध्ये शेती व्यवसायात बऱ्यापैकी जम बसल्यावर पशुपालनाकडे, त्यातही शेळीपालनाकडे विशेष लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. ज्या पारंपरिक पद्धतीने धनगर-मेंढपाळ हे शेळ्या-मेंढ्यापालन करत आहेत, ती पद्धत अशास्त्रीय आणि म्हणूनच अयोग्य आहे, हा क्रांतिकारक विचार घेऊन व तो शासनदरबारी तसेच समाजातही सर्वदूर पोहोचवण्यासाठी ते झटत आहेत. बंदिस्त पद्धतीने आणि वनशेतीच्या आधाराने शेळीपालन करावयाचे या आपल्या संकल्पनेवर ते ठाम आहेत. एका चार महिन्यांच्या मादी कोकरापासून सुरुवात करून, पुढील दहा वर्षांत ४०-४५ शेळ्यांचा निवडक कळप त्यांनी तयार केला. पारंपरिक मोकळ्या पद्धतीने शेळ्या पाळायच्या, तर चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होतो व पर्यावरणाचे नुकसानही होते. वनशेती संशोधन-शिक्षण-विस्तार प्रकल्प सुरू करून त्यांनी त्यातील १० वर्षांच्या अनुभवावर ‘वनशेती आणि बंदिस्त शेळीपालन’ असे पुस्तक लिहून १९९६मध्ये विजयादशमीच्या दिवशी प्रकाशित केले. या पहिल्या आवृत्तीच्या ९००० प्रती खपल्या असून १० नोव्हेंबर २०१० रोजी दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाच्या केवळ अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी देशपांडे यांनी अभ्यासलेल्या सर्वंकष विषयांची व्याप्ती लक्षात येते. शेळीपालनात आयुष्य वेचलेल्या एका पशुवैज्ञानिकाच्या लेखणीतून उतरावी, अशी माहिती व आकडेवारी पाहून वाचक थक्क होतो. हे सर्व लिखाण स्वतःच्या फार्मवर केलेल्या पाहणीतून आणि संशोधनातून आलेलेे असल्याने ते विश्‍वासार्ह आणि अनुकरणीय आहेत. या पुस्तकामुळे देशपांडे आणि बंदिस्त शेळीपालन दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात प्रसिद्धीस आल्या व त्याचा बोलबाला देशपातळीवरही झाला. सध्या कुरणातून निर्माण होणार्‍या चार्‍याच्या कित्येक पट चारा बंदिस्त पद्धतीने चराई केल्यास निर्माण होईल हे प्रयोगाने व संशोधनाने सिद्ध केले गेले आहे (म.फु.कृ.वि., राहुरी अहवाल १९८९). तसेच नापीक जागेत झाडे लावून वनशेती करणे या उपायांनी चारा टंचाईवर मात करता येईल. मूळ भारतीय शेळीची शुद्धता टिकवून त्यांना अधिक उत्पादनक्षम बनवणे हा त्यांच्या संशोधनाचा आणि प्रसाराचा दुसरा विषय आहे. अनुवंशिक गुणानुसार निवड पद्धतीने शेळ्या अधिक उत्पादक होतात, हे त्यांनी उस्मानाबादी शेळीच्या माध्यमातून आपल्या ३६ वर्षांच्या संशोधनाने दाखवून दिले आहे. जे अनुकरणीय पद्धतीनेच चालले असल्याची ग्वाही भारतीय स्तरावरील शास्त्रज्ञांनी दिली आहे. गाई-म्हशी आणि शेळ्या-मेंढ्या यांच्या उत्पादनवाढीसाठी चाललेल्या संकरीकरणाबाबत देशपांडे यांची मते ठाम आहेत. केवळ १०० टक्के परदेशी बोकडांचे वीर्य वापरूनच भारतीय शेळ्यांचे संकरीकरण व्हावे.

        पशुपालन किंवा शेळीपालनासंबंधी कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ स्वतः केलेल्या प्रयोगांच्या आणि त्यातून प्राप्त अनुभवांच्या बळावर देशपांडे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पशुवैज्ञानिकांच्या मेळाव्यात आत्मविश्‍वासाने सहभागी होतात आणि शेळी-मेंढीपालनाला वाहून घेतलेली राष्ट्रीय संघटना त्यांना ‘बकरी पंडित’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवते, यातच आटपाडीसारख्या आडगावात राहून बंदिस्त शेळीपालन या संकल्पनेसाठी झटणाऱ्या देशपांडे यांचे मोठेपण दिसते.

- डॉ. रामनाथ सडेकर

देशपांडे, नारायण रंगनाथ