Skip to main content
x

देशपांडे, सखाराम भगवंत

खाराम भगवंत देशपांडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसजवळील पोहरादेवी येथे झाला. पोहरादेवीजवळचे वडगाव हे त्यांचे जमीनदारीचे गाव म्हणून त्यांना वडगावकर देशपांडे म्हणून ओळखले जाई.

आईकडून आवाजातील गोडवा वारसारूपाने मिळालेल्या सखाराम देशपांडे यांना आई पहाटे जात्यावर दळत असताना तिने म्हटलेल्या ओव्या आणि अभंगांमुळे संगीताची गोडी लागली. वडिलांनी त्यांना पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे, पुण्याला शिकण्यासाठी पाठवले. सात-आठ वर्षांच्या सततच्या मेहनतीने व गुरूंच्या उत्तम तालमीने ते चांगले गायक व त्याचबरोबर चांगले शिक्षकही झाले.

काही वर्षे हिंगण्याला संगीत शिक्षणाचे कार्य करून ते पुण्याला आले. त्याच वेळी हैदराबादच्या काही मंडळींवर त्यांचा चांगला प्रभाव पडून त्यांना हैदराबादला शिकवण्यासाठी बोलावणे आले. तेथील विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेत ते शिक्षक झाले आणि संध्याकाळी चालणार्‍या विवेकवर्धिनी संगीत विद्यालयाची स्थापना करून तेथे त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू केल्या. त्यांनी त्या संस्थेला नावारूपाला आणले.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव व कोषाध्यक्ष या पदांवर राहिलेले देशपांडे हे उत्तम संघटक व कार्यकर्ते होते. मंडळाच्या परिषदा भरवून त्या यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. मंडळाचे गुरुकुल स्थापन झाले, त्याचे काम त्यांनी मिरजेत राहून काही वर्षे केले. मराठवाडा, हैदराबाद येथे संगीताचे वातावरण तयार करण्याचे बरेच श्रेय त्यांना जाते. त्यांनी संगीत नाटकांमध्येही भूमिका केल्या. त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून महामहोपाध्याय या सर्वोच्च मानाच्या पदवीने मंडित केले गेले. देशपांडे यांचे नांदेड मुक्कामी निधन झाले.

सुधा पटवर्धन

देशपांडे, सखाराम भगवंत