Skip to main content
x

देशपांडे, सुधाकर देवीदास

              सुधाकर देवीदास देशपांडे यांचा जन्म वरूड तालुक्यातील हातुर्णा येथे झाला. त्यांचे आईवडील शेतीकडे विशेष लक्ष देत असल्यामुळे त्यांना उपजतच शेतीची आस्था निर्माण झाली. त्यांचे इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण हातुर्णा येथेच झाले व माध्यमिक शिक्षण शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत झाले. कृषी शिक्षणात जास्त रुची असल्यामुळे त्यांनी शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे बी.एस्सी. (कृषी)साठी प्रवेश घेतला. पुढे त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून कृषि-अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केली आणि ते १९६९मध्ये अमरावतीच्या रुरल इन्स्टिट्यूटच्या कृषी शाखेत अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले व पुढे तेथेच ते प्राचार्य झाले. नंतर त्यांची शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवड झाली.

                देशपांडे यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेस वित्तीय साहाय्य मिळवून अल्पकाळात महाविद्यालयात उत्तम सुविधा निर्माण केल्या. या महाविद्यालयाची नवीन प्रशस्त वास्तू प्रयोगशाळेसह स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रक्षेत्रावर ऋतुनिहाय आयोजन करून कृषी तंत्रज्ञानावर आधारित पथदर्शी प्रयोग आयोजित केले. अमरावती जिल्हा हे संत्रा बागांचे एक अग्रगण्य स्थान आहे. संत्र्याच्या बागांचे पुनर्वसन करण्यासाठी व संत्रा बागायतदारांना उत्तम नागपुरी संत्र्याची कलमे पुरवण्यासाठी त्यांनी पंजीबद्ध रोपवाटिकेचा महत्त्वाकांक्षी प्रयोगही केला. तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माती परीक्षण करण्यासाठी एका फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेद्वारे परीक्षणाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना मदत केली. त्यांनी युरिआचे महत्त्व जाणून नत्रजन्य खताचा शेतकऱ्यांनी किफायतशीरपणे वापर करावा; म्हणून युरिआ ब्रिकेटची निर्मिती केली. त्यांच्याच कार्यकाळात सुसज्ज अशा डॉ. पंजाबराव कृषक भवनाची निर्मिती झाली. शिवाजी कृषी संस्थेच्या अधीनस्थ कृषि-जैवतंत्र महाविद्यालय व उद्यान महाविद्यालय ही दोन महाविद्यालये अनुक्रमे २००३ व २००४ मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्यपदही त्यांनी भूषवले. त्यांनी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोलाची संलग्नताही मिळवली. शेतकर्‍यांसाठी महत्त्वाच्या सेवा उपलब्ध केल्यामुळे शिवाजी कृषी महाविद्यालयासारख्या खासगी महाविद्यालयाला नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.प.ने सहाव्या क्रमांकाचे मानांकन देऊन राष्ट्रीय स्तरावर या संस्थेला गौरवले.

                देशपांडे यांनी कृषी पत्रकारिता व कृषी संलग्न विषयांवर सतत वैचारिक लेखन केले. कृषी अर्थकारणाचा शोध घेणारे चिकित्सक कृषी जगत हे सदर २००२पासून हिंदुस्थान या लोकप्रिय दैनिकात ते चालवतात. सामाजिक शल्यावर प्रहार करणारा ‘तरंग’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘कृषी भारत निर्माण भाग १ व २’ या खंडांच्या लेखनाचे मौलिक कार्य केले. या दोन्ही खंडांचे प्रकाशन २००५ मध्ये केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते झाले.

                देशपांडे यांच्या बहुआयामी कार्यामुळे त्यांना शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत उत्कृष्ट शिक्षक प्रशासक पुरस्कार (२००२), महाराष्ट्र कृषि-अर्थशास्त्र परिषदेचा पुरस्कार, राज्यस्तरीय अश्‍व साहित्यसेवा सन्मान (२००३), केशर वाङ्मय पुरस्कार (२००७), अंकुर साहित्य संघ महाराष्ट्राचा शोध पत्रकारितेचा प्रथम पुरस्कार (२००८), सद्गुरू दत्तधार्मिक व पारधार्मिक ट्रस्ट इंदोरचा शिक्षक गौरव पुरस्कार (२००९) आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी आशिया खंडातील प्रसिद्ध हनुमान प्रसारक मंडळ, अमरावती येथे २००७ सालापासून जागृती अभियानाची संपूर्ण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

                -शशांक देशमुख

देशपांडे, सुधाकर देवीदास