Skip to main content
x

देशपांडे, त्र्यंबक लक्ष्मण

        त्र्यंबक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथे झाला. ते १९३७मध्ये एडेड हायस्कूल, धामणगाव येथून  मॅट्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली व शिक्षणात खंड पडला. त्यांनी १९४३मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९४६ साली त्यांनी बी.एस्सी. (कृषी) परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांना सर आर्थर ब्लेवर हॅजेट चांदीचे पदक व चक्रदेव सुवर्णपदक प्राप्त झाले. महाविद्यालयात कृषी विषयातील प्रावीण्य, तसेच निबंध स्पर्धेत बक्षिसे मिळाल्यामुळे तृतीय व चतुर्थ वर्षात सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर दिल्लीच्या भा.कृ.सं.सं.त प्रवेश घेऊन कृषि-रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विषयात असोसिएट आय.ए.आर.आय. ही पदव्युत्तर पदवी प्रथम वर्गात मिळवली. त्यांनी संशोधन साहाय्यक या पदावर कृषी खात्यात नोकरीची सुरुवात करून व्याख्याता व प्राध्यापक या पदावर कृषी महाविद्यालय, नागपूर, पुणे व अकोला येथे काम केले. नोकरीत असतानाच त्यांनी ऑस्ट्रेलिया येथील अ‍ॅडलेड विद्यापीठातून प्रसिद्ध मृदाशास्त्रज्ञ ग्रीनलँड व क्वर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली व ‘नेचर’ (१९६४), ‘आंतरराष्ट्रीय मृदा काँग्रेस’ (१९६४) व ‘जर्नल ऑफ सॉइल सायन्स’ (१९६८) या प्रसिद्ध नियतकालिकांत त्यांचे संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले. जमिनीची घडण (स्ट्रक्चर) कशी होते, तसेच सेंद्रिय पदार्थामधील ह्युमिक अ‍ॅसिड, लोह, अ‍ॅल्युमिनियम ऑक्साइड, चुना व चिकणमाती यांचा या प्रक्रियेत कसा व किती सहभाग असतो; यावर त्यांनी मौलिक संशोधन केले. ऑस्ट्रेलियातून परतल्यावर मृदा विशेषज्ञ या पदावर व नंतर कृषि-रसायनशास्त्रज्ञ (कृषी महाविद्यालय, पुणे) व विभागप्रमुख मृदाशास्त्र (डॉ. पं.कृ.वि., अकोला) या पदावर काम केले. तसेच कृषी महाविद्यालय, अकोला व कृषी महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्यपद भूषवून १९७८मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी., पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. सोज्वळ, मृदू स्वभाव, सहृदयता व परोपकारी वृत्ती व अध्यापन कौशल्य यामुळे विद्यार्थ्यांत ते अतिशय लोकप्रिय होते. नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

देशपांडे, त्र्यंबक लक्ष्मण