Skip to main content
x

देशपांडे, विजय नारायण

         विजय नारायण देशपांडे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मलिग्रे गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेती व्यवसायात होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी व माध्यमिक शिक्षण आजरा व कोल्हापूर येथे झाले. ते १९६३मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणाकरता त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला. ते १९६७मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी उत्तीर्ण झाले. त्यांनी कृषी खात्यात नोकरी स्वीकारून पुढील दहा वर्षे फोंडाघाट, दापोली, रोहा येथे कृषी संशोधक म्हणून भात, नागली व गवत या पिकांसंबंधी संशोधन केले. या कालावधीत फोंडाघाट १-४-१, पालघर-१, पालघर-२ या भाताच्या जाती निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांची १९७७ ते १९७९मध्ये एम.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी १९७९ मध्ये बा.सा.को.कृ.वि.ची एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली.

         देशपांडे यांनी स्थानिक जातींवर संशोधन करताना पुसा बासमती-१ व कस्तुरी या जातींच्या चाचण्या घेऊन त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या माहितीसहित त्या जाती महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित केल्या. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके केली. महाराष्ट्रात ‘भात’ हे कोकण विभागातील महत्त्वाचे पीक आहे. भाताच्या पुष्कळ सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. भात पिकांमध्ये संकरित वाण निर्माण करून चीन देशाने क्रांती केलेली आहे. अशा प्रकारचे भाताचे संकरित वाण महाराष्ट्रात निर्माण करण्याचे प्रयोग व प्रयत्न झाले. या सर्व कामांत बिनीचे संशोधक म्हणून देशपांडे यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल.

         देशपांडे यांना शासनाने १९९५मध्ये मनिला (फिलिपाइन्स) येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमासाठी पाठवले होते. त्याचा उपयोग करून संकरित भाताच्या जाती निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे ‘सह्याद्री’ ही संकरित भाताची जात निर्माण झाली. या मालिकेत सह्याद्री - १, सह्याद्री - २, सह्याद्री - ३ व सह्याद्री - ४ असे चार प्रकारचे संकरित वाण प्रसारित केले. महाराष्ट्राबरोबरच हे वाण अन्य राज्यांतही तितकेच प्रभावी ठरलेले आहेत. या संकरित वाणांबरोबरच कर्जत - ५, कर्जत - ६, व कर्जत - ९ हे पारंपरिक सुधारित वाण प्रसारित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. २०००मध्ये मत्स्य बीजोत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी ते इस्राएल या देशात गेले होते.

         आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र, मनिला; भा.कृ.अ.प. आणि संयुक्त राष्ट्र सभेतर्फे त्यांना १९९८मध्ये भात संशोधन व विकास या कामाकरता दोन सन्मानचिन्हे प्रदान केली. तसेच बा.सा.को.कृ.वि.ने १९९८मध्ये भात संशोधनातील योगदानाबद्दलही त्यांचा सन्मान केला. संकरित भातविषयक संशोधनाबद्दल १ मे २००० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.  याबरोबरच ‘बळीराजा’ मासिक, मराठी विज्ञान परिषद, महाबीज या संस्थांतर्फेही त्यांना गौरवले. देशपांडे यांनी भात संशोधनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे विशेषतः संकरित भाताच्या संशोधनामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. देशपांडे हे भात-विशेषज्ञ म्हणून काम करताना विशेषतः संकरित भात बीजोत्पादनाकरता दापोली येथील बा.सा.को.कृ.वि. व खासगी संस्था ‘सिंजेन्टा इंडिया लि.’ यांच्यात करार होऊन बीजोत्पादनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला. त्यांनी संकरित भाताबद्दल इंग्रजी व मराठी या दोन भाषांमध्ये पुस्तिका प्रसिद्ध केलेल्या आहेत. विजय देशपांडे नोव्हेंबर २००२ मध्ये निवृत्त झाले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

देशपांडे, विजय नारायण