Skip to main content
x

देशपांडे, विनायक वामन

वामन विनायक देशपांडे यांचा जन्म दिग्रासला संगीतप्रेमी, श्रीमंत घरात झाला. नवसासायासाने झालेल्या पुत्ररत्नाला आजोबांचेच ‘वामन’ नाव ठेवले गेले. वडिलांना संगीताची आवड म्हणून त्यांनी वामनला सातव्या वर्षीच गणपत परांजपे यांच्याकडे संगीताभ्यासासाठी पाठविले. पण १९४० मध्ये विषमज्वर व ब्राँकोनिमोनिया झाल्याने छातीवर भयंकर दुष्परिणाम होऊन त्यांचे गायन कायमचे बंद झाले.

वामन देशपांडे १९४५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी वाद्यशिक्षणास सुरुवात केली. संगीतज्ञ स.भ. देशपांडे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुण्याला दिलरुबा खरेदी करून, दिग्रसला येऊन मेहनत सुरू केली. वामन देशपांडे बनारस येथून १९४६ मध्ये ‘जीवशास्त्र’ हा विषय घेऊन इंटरसायन्स उत्तीर्ण झाले. अमरावतीला त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण व संगीत, दोन्ही छंद चालू राहिले.

ते १९५१ मध्ये बी.एस्सी. झाले व १९५२ मध्ये वाद्यवादनात विशारद, १९५४ मध्ये अलंकार व १९५९ मध्ये प्रवीण परीक्षा देऊन गांधर्व महाविद्यालय मंडळातून देशपांडे संगीताचे ‘डॉक्टर’ झाले. पुढे दिलरुबा वाद्याला ध्वनिवर्धक जोडून त्यांनी त्यात नाविन्य निर्माण केले.

देशपांडे यांनी दिग्रस येथे ३१ ऑक्टोबर १९५६ रोजी ‘गंधर्व संगीत विद्यालय’ स्थापन केले व संगीत प्रचार, तसेच लेखनही सुरू केले. पाच वर्षे विद्यालय चांगले चालले. त्यांचा विवाह १९६९ साली शैलजा पिंपळीकरांशी झाला. नंतर त्यांना जयपूर व नागपूर या दोन्ही ठिकाणांहून संगीताध्यापकांचे नियुक्तिपत्र मिळाले. प्रा. प्रभाकर खर्डेनविसांच्या सल्ल्याने त्यांनी नागपूरला एल.ए.डी. महाविद्यालयामध्ये नोकरी पत्करली. तीन वर्षांनी बुटी संगीत महाविद्यालयात संगीत शिक्षणाचे काम १९६७ पर्यंत केल्यावर ते नागपूर महाविद्यालयात संगीताचे प्राध्यापक झाले व त्यांनी एम.ए. (संगीत) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांचे १९५० पासून नागपूर आकाशवाणीवर  तारशहनाईचे कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी १९५० मध्येच कलकत्ता येथे ‘तानसेन विष्णू दिगंबर’ स्पर्धांमध्ये तंतुवाद्यवादनातून प्रथम क्रमांकाने यशस्वी होऊन पारितोषिक मिळविले.

वामन देशपांडे कलेचे सच्चे उपासक, अभ्यासू होते, तसेच ते स्टाफ नोटेशन, लोकसंगीत, नवरागनिर्मिती, चिजांच्या बंदिशी, विविध लेखसंग्रह करीत होते. त्यांची वादनशैली पद्धतशीर, वक्तशीर होती.  ख्याल, ठुमरी, दादरा इत्यादी संगीत प्रकारांत ते तरबेज होते.

वि. ग. जोशी

देशपांडे, विनायक वामन