देशपांडे, यशवंत वेणीमहादेव
यशवंत महाराज यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील व श्रीक्षेत्र पंढरपूर तालुक्यातील ‘भोसे’ या गावच्या वतनदार देशपांडे घराण्यात वेणीमहादेव व हीराबाई यांच्या पोटी पुणे येथे झाला. बालपणापासूनच त्यांना देवपूजेची, भजनाची विशेष आवड होती. देवाच्या मूर्ती घेऊनच ते खेळत. हा कोणी थोर योगभ्रष्ट पुण्यात्माच जन्मला असावा, अशा त्यांच्या बाललीला होत्या. लहानपणीच त्यांनी वेदाध्ययन केले. शालेय शिक्षण पूर्ण करीत कुलकर्णीपणाचे कार्यही शिकून घेतले. यशवंत महाराजांचा १८२७ साली टेंभूर्णी (सोलापूर जिल्हा) येथील जिवाजी देशपांडे यांच्या ‘सुंदरा’ नावाच्या मुलीशी विवाह झाला. त्यांना १८२९ साली सरकारी खात्यात बदली कारकून म्हणून नोकरी मिळाली. आपली निष्ठा, शिस्त, वक्तशीरपणा या गुणांमुळे बढती घेत ते मामलेदार पदापर्यंत पोहोचले व नोकरीबरोबरच त्यांची आध्यात्मिक साधना सुरू होती. त्यांचा नित्यनेम कधीही चुकत नसे. नोकरीच्या जबाबदार्या, कटकटीची कामे करीत त्यांनी ज्ञाननिष्ठा-वैराग्याची कटाक्षाने जोपासना केली. कोणत्याही मोहाला ते बळी पडले नाहीत. पदाचा, सत्तेचा, अधिकाराचा अहंकार त्यांना कधीच शिवला नाही. आपले माता-पिता हेच त्यांचे खरे देव होते. त्यांचा मातृपितृ- भक्तिभाव आदर्श व श्रेष्ठ दर्जाचा होता.
नामस्मरणांची अखंड साधना अनेक वर्षे चालू असताना त्यांच्या अंतर्मनाला मात्र सतत गुरुभेटीची ओढ लागलेली होती. अखेर सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजींच्या ‘मंगळवेढा’ येथे त्यांना अक्कलकोट स्वामी भेटले. स्वामींनी त्यांच्यावर अनुग्रह केला. या गुरुभेटीने व कृपेने पूर्वपुण्याई फळाला आली, सरकारी नोकरीमुळे त्यांच्या वारंवार बदल्या होत असत; पण प्रत्येक ठिकाणी नोकरी ही जनता जनार्दनाची पूजाच आहे अशा श्रद्धेने ते करीत. त्यांना १८५३ साली जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे मामलेदार म्हणून पदोन्नती मिळाली.
त्यांना तीन मुलगे व एक मुलगी झाली; पण ही सर्व अपत्ये बालपणीच निधन पावली. त्यांनी दुःखी पत्नीला सर्व जनताच आपली मुले आहेत असा उपदेश केला व त्यानंतर त्यांच्या पत्नीने कधीही अपत्यहीनतेचे दुःख केले नाही. मामलेदारपदाचा उपयोग ते लोकसेवेसाठी करीत त्यामुळे त्यांच्या पगारापेक्षा त्यांचा खर्च अधिक होऊन ते कर्जबाजारी झाले. काही स्वार्थी लोकांनी त्यांच्यावर काही खोटेनाटे आरोपही केले; पण हाही आपल्या परीक्षेचाच काळ आहे अशा भावनेने ते शांत राहिले. एकदा तर सरकारी चौकश्यांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता; पण हा पळपुटेपणा आहे, आपली नोकरी ही सेवा आहे, तर मग त्यापासून पळ काढणे योग्य नाही असा त्यांना दृष्टान्त झाला व पुनश्च ते मामलेदार झाले.
मामलेदार पदावर असताना त्यांनी केलेल्या परोपकारी कार्यामुळे व त्यांच्या वागण्या-बोलण्यातील संतत्वामुळे सर्व लोक त्यांना ‘देवमामलेदार’ म्हणत. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्यामुळे लोकांना अतर्क्य वाटणार्या, चमत्कार वाटाव्यात अशा घटना त्यांच्या जीवनात घडल्या. सरकारने १८७३ साली त्यांना ‘देववेडा’ ठरवून सक्तीने निवृत्त केले.
निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी गावोगावी जाऊन परमार्थ प्रचार केला. असंख्य लोकांना खर्या परमार्थाचा अर्थ सांगितला. नाशिक येथे त्यांना भेटण्यासाठी खुद्द शेगावचे गजानन महाराज आले होते, अशी त्यांची थोरवी होती. नाशिक येथे आजारपणाचे निमित्त होऊन देवमामलेदार यांचे बहात्तराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी त्यांच्या पत्नी सुंदराबाई यांचेही निधन झाले.