Skip to main content
x

देव, शंकर श्रीकृष्ण

शंकर देव

शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म धुळे येथे झाला. त्यांचे वडील अण्णासाहेब पुणे, सातारा व धुळे येथे कारागृह अधिकारी होते. त्यांना चार मुले होती. दोन मुलगे हरी व शंकर आणि दोन मुली समूताई व साळूताई. या दोघींचा विवाह धुळे येथेच झाला; अनुक्रमे शिदोरे व टकले यांच्याकडे. डॉ. हरी श्रीकृष्ण देव वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, १९१८ मध्ये धुळ्यातच मृत्यू पावले.

पोरबंदरला महात्मा गांधींचे घर त्यांच्या निवासस्थानाजवळच होते. महात्मा गांधी नानासाहेबांचे म्हणजे शंकर श्रीकृष्ण देवांचे समवयस्क. गांधी कुटुंबाचे व त्यांचे फार घरोब्याचे संबंध होते. डॉ. देवांबद्दल महात्मा गांधींनाही खूप आदर वाटे. चंपारण्य सत्याग्रहात डॉ. देवांकडे त्यांनी खूप मोठी कामगिरी सोपवली होती. डॉ. राजेंद्र प्रसादांचे ते आदरस्थान होते.

नानासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथल्या गरुड हायस्कूलमध्येच झाले. उत्कृष्ट व आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती होती. १८८९ मध्ये त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. आदिवासींबद्दल त्यांना विशेष ममता होती. १९०३ पासून नानासाहेबांनी जमा केलेला हस्तलिखितांचा संग्रह १९३० सालापर्यंत अक्षरश: प्रचंड झाला. सन १९३४ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी सत्कार्योत्तेजक सभा स्थापन केली. १९३४ पर्यंत त्यांनी अखिल भारताचे सहा वेळा दौरे केले. ‘केसरी’ आणि ‘नवाकाळ’ त्यांच्या पाठीमागे होते. त्यामुळे नानासाहेबांच्या संशोधनाला खूप बळ मिळाले. श्री समर्थ वाग्देवता मंदिराचा उद्घाटन सोहळा अपूर्व झाला. इंदूर महाराणी इंदिराबाई होळकर यांनी चांदीच्या किल्लीने मंदिराचे कुलुप उघडले.

जांबचे श्री समर्थ वाग्देवता मंदिर, दास विश्रामधाम, धुळ्याचे समर्थ वाग्देवता मंदिर, राजवाडे संशोधन मंदिर या सर्व कार्यांत महाराणींचा पाठिंबा होता. छत्रपतींचे निवाडे, समदा, मजहर, श्री संप्रदायाविषयी ८०० अधिक तत्कालीन संतांची हस्तलिखिते, १४०० पृष्ठांचे चार भाग असे साहित्य जमा झाले आहे. मंदिराला अनेक देणगीदार मिळाले व मामासाहेबांनी त्या सर्वांचे आभार मानले. शके १८३८ मध्ये नानासाहेबांनी ‘इतिहास आणि ऐतिहासिक’ मासिकाचा प्रारंभ केला. दादासाहेब मावळणकर त्या वेळचे अध्यक्ष होते. देशभर श्रीसमर्थांचे उत्सव, व्याख्याने यांची रेलचेल झाली.

नानासाहेब देवांनी ‘आता रजा पाहिजे’ असे जाहीरपणे सांगितले. तेव्हा महात्मा गांधींनी ‘राजकीय कार्य सोडू नका,’ अशी विनंती केली. वृत्तपत्रांत अनेक लेख आले. नानासाहेबांनी गांधीजींना उत्तर लिहिले, ‘स्वराज्य आज ना उद्या मिळेल; पण ही प्राचीन कागदपत्रे नाहीशी झाली तर पुनरपि मिळणार नाहीत.’ १९४० नंतर राजकीय वातावरण फारच गढूळ झाले. फाळणी झाल्यानंतर मनस्वी देव अतिशय उद्विग्न झाले.

नानासाहेब देवांचे राजकीय कार्यही खूप मोठे हातेे. १८९३ मध्ये काउन्सिलच्या निवडणुकीत लोकमान्य टिळक उभे होते. त्या वेळेला प्रचाराची धुरा नानासाहेबच सांभाळत. लोकमान्य टिळकांच्या प्रभावळीतील अति जहाल क्रांतिकारकांशी नानासाहेबांचा संबंध होता. अभिनव भारताच्या स्थापनेनंतर चाळीस वर्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकर श्री समर्थ वाग्देवता मंदिरास भेट देण्यासाठी आले. देवांना पाहताच ते अत्यंत श्रद्धेने व लीनतेने वाकले. सेनापती बापट पुण्यापासून देवांच्या मित्रमंडळीत होते. देवांच्या सल्लामसलतीने बाबू अरविंद घोषांकडे बॉम्ब तयार करण्याची विद्या आत्मसात करण्यासाठी गेले. बाबू अरविंद घोषांचा मुक्काम आठ दिवस देवांकडे होता. राष्ट्रीय सभेचे प्रांतिक अधिवेशन धुळ्याला झाले, त्याची सर्व व्यवस्था देवांकडे होती.

सत्कार्योत्तेजक संस्थेने केशव शास्त्री दामले यांचे ‘एकश्लोकी गीता’ हे पुस्तक छापले. त्यातल्या आठव्या अध्यायातील सातव्या श्लोकाबद्दल श्री. दामले व श्री. देव यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. देव व दामले शास्त्री यांना अटक झाली. काही काळ देवांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवले. पण अपिलानंतर देव निर्दोष सुटले. दामले शास्त्र्यांना सहा महिन्यांची सजा झाली.

१९१३ ते १९१८ या सहा वर्षांत नानासाहेब धुळे नगरपालिकेचे नगरसेवक होते. १९१७ मध्ये लोकमान्य टिळक पुन्हा धुळ्याला आले. होमरूलच्या प्रचारासाठी त्यांनी खानदेशाचा दौरा केला होता. १९२७ मध्ये महात्मा गांधींचा खानदेश दौरा ठेवला. महात्मा गांधींची धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

नानासाहेब देव हे एकच व्यक्तिमत्त्व असे आहे, की ज्यांनी श्रद्धाभावाने लोकमान्यांना २४ वर्षे मानले व त्याच उमेदीत महात्मा गांधींचे नेतृत्वही पुढे २४ वर्षे स्वीकारले.

संपादित

देव, शंकर श्रीकृष्ण