Skip to main content
x

देवबागकर, दिलीप

     डॉ. दिलीप देवबागकर यांच्या व्यक्तिमत्त्वात अंगभूत हुशारी, तडफदारपणा व मेहनती वृत्ती यांचा सुरेख मिलाफ दिसतो. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांनी ज. जी. कला महाविद्यालय येथे फाइन आर्ट्सचा अभ्यास केला होता. त्यांची आई संगीतकला संपन्न गोव्यातील घराण्यातली. साहजिकच देवबागकर संगीतप्रेमी, कलासक्त आहेत. 

      त्यांचे शालेय व विद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले. शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. ही पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी ते बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस्सी.) येथे गेले. ‘रेण्वीय जीवशास्त्र’ या विषयात १९७६ साली त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. पुढील शिक्षणासाठी फोगार्टी इंटरनॅशनल फेलोशिप मिळवून ते अमेरिकेस गेले. तेथे त्यांनी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ या जगप्रसिद्ध संस्थेत उंदरामध्ये रक्ताच्या कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या एबलसन विषाणूवर संशोधन केले. त्यानंतर अमेरिकेतील येल विद्यापीठात त्यांना घुंगुरटे या छोट्या प्राण्यांमधील जनुकांच्या प्रकटीकरणाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.

     परदेशातील अनुभव घेऊन ते स्वतंत्र संशोधक म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर बंगळुरू येथे रुजू झाले; परंतु नवीन काम करण्याची संधी मिळताच ते १९८२ साली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे या संस्थेत गेले. तेथे त्यांनी रेण्वीय संशोधनाचा पाया घातला. दोन वेगळ्या प्रजातींच्या जंतूंच्या मिलनामुळे त्यांच्यातील गुणधर्म एकत्र करता येतात व अशा तऱ्हेच्या प्रयोगांचा उपयोग जैवतंत्रज्ञान उद्योगात करता येतो, हे त्यांच्या कामातून दिसून आले. संशोधन व अध्यापन, दोन्हींत रुची असल्यामुळे १९८५ साली त्यांनी पुणे विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागात रेण्वीय जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून झालेली निवड स्वीकारली. तेथे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरले. प्राणिशास्त्राचे प्रमुख या पदाव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी सूक्ष्म जीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान या विभागाचे प्रमुखपद सांभाळले, तसेच विद्यापीठाच्या बायोइन्फरमॅटिक्स केंद्राचे संचालक म्हणूनदेखील काम केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे पुणे विद्यापीठात बारावीनंतर ५ वर्षांचा एम.एस्सी.चा अभ्यासक्रम देणारी ‘इन्स्टिट्यूट फॉर बायोइन्फरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी’ ही संस्था उभी राहिली. या केंद्राच्या निर्मितीपासून ते तिचे संचालक होते.

     प्राणिशास्त्र विभागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक विद्यार्थ्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी.साठी संशोधन केले. या संशोधनातून अनेक शोधनिबंध प्रख्यात जर्नल्समध्ये प्रसिद्ध  झाले. एडिस इजिप्ती या मलेरियाच्या जंतुवाहक डासांवरील त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानले जाते. या संशोधनामुळे जंतुवाहक डास व मलेरियाचे जंतू यांमधील परस्पर संबंधांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. प्राणिशास्त्र विभागात जैवतंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने त्यांनी एम.एस्सी. झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक पदविका कार्यक्रम सुरू करून औद्योगिक संस्थांना कुशल व प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळवून देण्याचे कार्य केले.

    शिक्षणक्षेत्रातील गाढा अनुभव आणि उत्तम संशोधनाची कारकीर्द असल्याने, २००५ साली डॉ. देवबागकरांची नियुक्ती गोवा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झाली. अवघ्या दोन वर्षांत गोवा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची दखल घेतली जाऊन तिथे केंद्रीय विद्यापीठासाठी संमती मिळण्याची घटना हा डॉ. देवबागकरांच्या नेतृत्वगुणाचा दाखलाच आहे.

डॉ. रजनी भिसे

देवबागकर, दिलीप